जुंकेसी :  (प्रनड कुल). फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृत्तबीज उपविभाग] एकदलिकित (बियांत एक दलिका असलेल्या ) वनस्पतींचे एक लहान कुल. याचा अंतर्भाव एंग्लर व प्रांट्‌ल यांनी पलांडू गणात [→ लिलीएलीझ (लिलिफ्लोरी)] आणि बेंथॅम व हूकर यांनी कॅलिसीनी या गणात केला असून हचिन्सन यांनी जुंकेसी : (अ) जुंकस आर्टिक्युलेटस: (१) फुलोऱ्यासह फांदी, (२) किंजमंडल (आ) जुंकस ॲक्युटिफ्लोरस : फुलाचा उभा छेद (इ) प्रिओनियम सेरॅटम : (१) पाने व फुलोऱ्यासह वनस्पती, (२) फुलोऱ्याचा भाग, (३) फूल, (४) किंजमंडल, (५) फळाचा आडवा छेद, (६) तडकलेले बोंड.

जुंकेलीझ (प्रनड गण) ह्या स्वतंत्र गणात केला आहे. ह्या कुलात नऊ वंश व सु. चारशे जाती ( लॉरेन्स यांच्या मते आठ वंश आणि तीनशे पंधरा जाती) असून त्यांचा प्रसार मुख्यतः थंड आणि समशीतोष्ण प्रदेशांत आहे. ध्रुवीय प्रदेशांतही काही जाती आढळतात बहुतेक वनस्पती गवतासारख्या दिसणाऱ्या व अनेक वर्षे जगणाऱ्या ⇨ओषधी  आहेत. त्यांचे जमिनीतील खोड (मूलक्षोड) आडवे वाढणारे व  संयुतपद (अनेक अक्षांचे बनलेले) असून शिवाय सरळ हवेत वाढणारे व फांद्या नसलेले खोडही असते काही वंशांत लहान झुडुपे किंवा लहान वृक्षही आढळतात काही जातींत हवेत वाढणारा भाग एकच वर्ष जगतो व दुसऱ्या वर्षी नवीन प्ररोह (कोंब) भूमिगत खोडापासून वर वाढतो आणि हा भाग बहुधा पुष्पधारी असतो. पाने साधी, एकाआड एक, लांबट, गवतासारखी व  खोडास तळाशी वेढून राहणारी किंवा सपाट रुंद खवल्यांप्रमाणे असतात कधी ती शलाकाकृती (उभी, टोकास निमुळती व खाली दंडगोलाकृती), मूलज (मुळाच्या माथ्यावरून वाढल्यासारखी) किंवा नेहमीप्रमाणे सरळ खोडावर येतात. फुलोरे कुंठित [→ पुष्पबंध] बहुधा गुच्छाप्रमाणे एकत्र किंवा विविध प्रकारच्या वल्लरीप्रमाणे फुले द्विलिंगी, नियमित, वायुपरागित (वायूच्या साहाय्याने परागकणांचा प्रसार होणारी), क्वचित कीटकपरागित, क्वचित एकेकटी परिदले क्वचित तीन, बहुधा सहा (दोन मंडलांत), हिरवट संदलाप्रमाणे किंवा रंगीत पाकळ्यांप्रमाणे छदांप्रमाणे किंवा तुसांप्रमाणे व सुटी केसरदले बहुधा तिन्हींच्या दोन मंडलांत सहा, क्वचित तीन तंतू त्रिकोनी, बारीक, लांब किंवा आखूड परागकणांच्या चौकड्या बनतात तीन जुळलेल्या किंजदलांच्या ऊर्ध्वस्थ किंजपुटात तीन कप्पे व थोडी  किंवा बहुधा अनेक अधोमुखी बीजके अक्षलग्न असतात किंवा एकाच कप्प्यात ती तटलग्न असतात किंजले कधी नसतात, पण किंजल्के तीन व केसाळ किंवा पिसासारखी असतात [→ फूल]. फळ (बोंड) कप्प्यावर तडकते बिया अनेक व लहान गर्भ सरळ व पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश) स्टार्च असतो.

समशीतोष्ण हिमालयात (२,५००–४,००० मी. उंचीवर ) जुंकसच्या जाती आढळतात. सिक्कीम, खासी व अक्का टेकड्यांत जुं. एफ्यूसस  आढळते तिचा उपयोग चटया, बुट्ट्या, खुर्च्यांवरील बैठकी यांकरिता करतात जुं. एफ्यूससच्या भेंडाचा दिवे व मेणबत्त्यांकरिता वातीसारखा उपयोग करतात भेंडाचा काढा अश्मरी (मूत्रपिंडातील अथवा इतर अवयवांतील खडा) रोधक, अर्बुदनाशक (नवीन पेशींच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण झालेल्या व शरीरक्रियेस निरुपयोगी असणाऱ्या गाठींचा नाश करणारा) व हृदयविकारावर गुणकारी समजतात. चीनमध्ये भेंडाचा उपयोग मूत्रल (लघवी साफ करणारा) व शरीर शुद्धीकारक असा करतात. ही वनस्पती गुरांना विषारी असते. जुंकसच्या जगभर पसरलेल्या एकूण २२५ जातींपैकी सु. तीस जाती भारतात आढळतात. तमिळनाडू, सह्याद्री व केरळ येथे जुं. प्रिस्मॅटोकार्पस  ही जाती पाणथळ जागी आढळते व तिच्यात हायड्रोसायानिक अम्ल असते. यूरोपात जुं. स्क्वॅरोसस  ही जाती गवताअभावी शेळ्यांना चारतात. जुं. टेक्स्टिलीस  ही जाती काथ्या व चटयांकरिता आणि उशा भरण्यास उपयोगात आहे. लुझुला  वंशातील एकूण ८० जातींपैकी ४ जाती भारतात आढळतात व त्यांपैकी एक जाती (लु. कँपेस्ट्रिस  हिमालय, खासी टेकड्या, निलगिरी व अन्नमलई टेकड्या यांमध्ये आढळते व ती मूत्रल आहे, तिला गुच्छासारखे फुलोरे येतात. जुंकेसी कुलातील जुंकस  व लुझुला  यांखेरीज मार्सिपोस्पर्मम, रॉस्टकोव्हिया  व प्रिओनियम  या वंशांतील काही जाती धागे, औषधे वगैरेंकरिता उपयोगात आहेत. मोथा कुल [→ सायपेरेसी] व तृण कुल [→ ग्रॅमिनी] ही कुले जुकेसीसारख्या पूर्वजांपासून क्रमविकासाने (उत्क्रांतीने) अवतरली असावीत व पलांडू गणातील वनस्पतींना (लिलिएलीझना) त्यांच्याशी जोडणारा जुंकेसी हा दुवा असावा, असे काही शास्त्रज्ञ मानतात. ह्या कुलातील वनस्पती तृतीय (सु. ६·५ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात व तत्पूर्वीच्या क्रिटेशस (सु. १४ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळीही आढळल्याने हे कुल फार जुने असावे, हे उघड आहे.

संदर्भ : 1. C.S.I.R. The Wealth of India, Vol. V, Vol. VI, New Delhi, 1959–1963.

   2. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

   3. Mitra, J. N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

परांडेकर, शं. आ.