जॅक्विमाँशिया पेंटँथा : (लॅ. जॅ. व्हायोलेशिया कुलकॉन्व्हॉल्व्ह्युलेसी). ही लवदार किंवा काहीशी गुळगुळीत, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी), १·८ ते २·५ मी. उंच ओषधीय [⟶ ओषधि] वेल उष्ण कटिबंधीय अमेरिकेतील असून अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत उत्तरेस फ्लॉरिडापर्यंत तिचा प्रसार आहे. ही इतरत्र बागेत शोभेकरिता लावली जाते. फ्रेंच निसर्गशास्त्रज्ञ व्हिक्तॉर झाकमाँ (व्हिक्टर जॅक्विमाँट) यांच्यावरून तिचे नाव पडले आहे. हिचे खोड बुंध्याशी झुडपासारखे असते. पाने साधी, एकाआड एक, रुंद, हृदयाकृती ते अंडाकृती व निमुळत्या टोकाची असतात. फुलोऱ्यात बारीक दांड्याला पाच ते बारा फुलांच्या विरल वल्लरींचे झुबके जून ते सप्टेंबरात येतात. फुले तीन सेंमी. रुंद, आखूड, नसराळ्यासारखी किंवा घंटेसारखी, पंचकोनी व गर्द निळसर जांभळी असतात संरचना व इतर सामान्य लक्षणे हरिणपदी कुलात [⟶ कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी] वर्णिल्याप्रमाणे. नवीन लागवड बिया किंवा कलमे यांपासून करतात. कमानी, उभ्या जाळ्या किंवा पादपगृहे (काचघरे) यांवर चढविली असता ही फार आकर्षक दिसते. हिला ‘नीलपुष्पी’, ‘निळी घंटी’ असेही म्हणतात.

जमदाडे, ज. वि.