शेवंती : [हिं. गुलदौंडी सं. शेवंती क. शेवंती लॅ. क्रिसँथेमम इंडिकम कुल-ॲस्टरेसी (कंपॉझिटी)]. ही बहुवर्षायू ओषधी ६०- ९० सेंमी. उंच वाढते. तिचे मूलस्थान चीन व जपान मानतात. विविधरंगी आकर्षक फुलांसाठी तिची लागवड भारतात सर्वत्र मोठया प्रमाणावर होते. पाने साधी, एकाआड एक, सुवासिक व पिसासारखी, पण थोडी विभागलेली, साधारण केसाळ असतात. फुलोरे स्तबक प्रकाराचे एक एकटे किंवा कमी अधिक गुलुच्छाप्रमाणे नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये येतात.

पाने, कळ्या व फुलांसह शेवंती (क्रिसँथेमम इंडिकम या जातीचा जंगली प्रकार). फुले कडू , दीपक (भूक वाढविणारी) व सौम्य रेचक असतात. चीनमध्ये पाने निर्मलीकारक म्हणून वापरतात व अर्धशिशीवर देतात. शेवंती काळ्या मिरीबरोबर परम्यावर देतात. फुलांचे विविध रंग त्यांतील कॅरोटिनॉइडांमुळे येतात. लाल प्रकारच्या फुलांत क्रिसँथेमिन हे ग्लुकोसाइड असते व पिवळ्या फुलांत फ्लॅव्होन हे रंगद्रव्य ल्यूटिओलिन या ग्लुकोसाइडाच्या रूपात असते. बियांपासून अर्धशुष्क तेल मिळते.

क्रिसँथेमम सिनेरॅरिफोलियम (पायरेथम सिनेरॅरिफोलियम), कि. कॉक्सिनियमकि.मार्शली या तीन जातींच्या वाळलेल्या स्तबकांना पायरेथम हे नाव आहे.त्यात कीटक नाशक गुण असतात. कि. कॉरोनॅरियम या जातीची फुले लिंबासारखी पिवळीकिंवा जवळजवळ पांढरी असतात.

शेवंतीची लागवड निमदुष्काळी भागात जास्त केली जाते. महाराष्ट्रात ती विशेषतः पारनेर, अहमदनगर, श्रीगोंदे या तालुक्यांत आढळते. बहर संपल्यावर वनस्पतीच्या फांद्या जमिनीपासून ५-६ सेंमी. ठेवून कापतात. फांद्यांचे शेंडे कापून मधल्या भागाचे ३-४ डोळे असलेले फाटे बियाणे म्हणून वापरतात. धुमाऱ्यापासूनही लागवड करतात. शेवंतीला हलकी, सुपीक, उत्तम निचऱ्याची जमीन लागते. उत्तम मशागत करून तीत शेणखत किंवा कंपोस्ट खत आवश्यक त्या प्रमाणात मिसळून देतात. तसेच हेक्टरी १०० किग्रॅ. नायट्रोजन, ७५ किग्रॅ. फॉस्फरस व १०० किग्रॅ. पोटॅश ही वरखते विभागून देतात. ४५-६० सेंमी. अंतरावर सरी काढून तीच्या बगलेला ३०-४५ सेंमी. अंतरावर बियाणे ऊसाच्या च्या कांड्याप्रमाणे आडवे लावतात. नियमित हलक्या पाण्याच्या पाळ्या देतात.

संकराने शेवंतीचे अनेक प्रकार तयार करण्यात आले आहेत. त्यांतील झिपरी, पिवळी रेवडी, पांढरी रेवडी, राजा हे प्रकार लागवडीत आहेत. त्यांच्या फुलांचे हेक्टरी उत्पादन ९,५०० किग्रॅ.पर्यंत मिळते. उन्हाळी लागवडीचे उत्पादन जास्त येते.

जुलै-ऑगस्टमध्ये येणाऱ्या मुद्‌गल किड्यांवर एंडोसल्फान व भुरी रोगावर पाण्यात विरघळणाऱ्या गंधकाची फवारणी करतात.

चौधरी, रा. मो. जमदाडे, ज. वि.

 

शेवंती : विविध रंगी व आकारमानाचे तीन संकरित प्रकार.