होल्मस्किओल्डिया सँग्वीनिया : (इं. चायनीजहॅट प्लँट कप अँड सॉसर प्लँट कुल-व्हर्बिनेसी) . हे सु. ३ मी. उंचीचे सदाहरित शोभिवंत क्षुप हिमालयाच्या समशीतोष्ण भागात सस. पासूनसु. १,२०० मी. उंचीपर्यंत आढळते. सर्वत्र बागेतून याची लागवडकरतात. फांद्या लांब, बारीक, चतुष्कोणीय, करड्या व लोमश पाने संमुख, १० × ६ सेंमी., दंतुर व अंडाकृती कक्षस्थ वल्लरीवर फिकट शेंदरी लाल फुले (ऑक्टोबर – मेपर्यंत) येतात. संवर्त शेंदरी, पसरट वबशीसारखा (२.५ सेंमी.) असून त्यावर तशाच रंगाचा उथळ पेल्या-सारखा पुष्पमुकुट असतो. यावरूनच वरील इंग्रजी नावे पडली आहेत. बहिरागत दीर्घद्वयी चार केसरदले असून फळ अश्मगर्भी, व्यस्त अंडाकृती आणि संवर्तावर सहवर्धिष्णू असते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ व्हर्बिनेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. या वनस्पतीचा पिवळ्या फुलाचा सिट्रिना हा प्रकार खासी टेकड्यांत आढळतो. फुले अधिक टिकाऊ असल्याने घरी पुष्पपात्रात शोभेकरिता ठेवण्यास योग्य असतात. कलमे व बियांपासून या वनस्पतीची नवीन लागवड करता येते.

चौगले, द. सी.

 

होल्मस्किओल्डिया सँग्वीनिया
होल्मस्किओल्डिया सँग्वीनिया