लॉरेल : पानाफुलांसह फांदी

लॉरेल : (लॅ. लॉरस ; कुल-लॉरेसी). हे इंग्रजी नाव भिन्न कुलांतीली व प्रजातींतील अनेक सदापर्णी झुडपांना किंवा वृक्षांना पानांतील साम्यामुळे दिलेले आढळते. तथापि खरा लॉरेल वृक्ष लॉरस नोबिलीस या शास्त्रीय नावाने ओळखला जातो. त्याला इंग्रजीत ‘बे ट्री, ट्रू लॉरेल व स्वीटबे’ अशीही नावे आहेत. बाजारात ह्या लॉरेलची सुरकुतलेली काळपट उदी रंगाची व ठिसुळ फळे मिळतात ती ईजिप्तमधून येतात. व त्यांना ‘हब एल घार’ असे हिंदी नाव आहे ती तिखट व दुर्गंधीयुक्त असतात व त्यांत बाष्पनशील (उडून जाणारे) तेल असते. ती औषधी असतात. लॉरस प्रजातीत फक्त दोन जाती असून खऱ्या लॉरेलखेरीज लॉ. कॅनॅरिएन्सिस ही दुसरी जाती हिच्यात आहे व ती कॅनरी बेटांत आढळते. ज्या इतर दुसऱ्या कुलांतील व प्रजांतातील वनस्पतींना लॉरेल म्हणतात त्यांमध्ये प्रुनस प्रजातातील (रोझेसी अथवा गुलाब कुलातील) चेरी लॉरेल, पोर्तुगाल लॉरेल अशा काही जाती, ⇨ सॅसॉफ्रस, कापूर वृक्ष (लॉ. कॅम्फोरा अर्थात सिनॅमोमम कॅम्फोरा), ⇨ उंडण (आलेक्झांड्रियन लॉरेल) इत्यादींचा समावेश करतात. उंडणाच्या लाकडास ‘लॉरेलवुड’म्हणतात. ग्रीक व रोमन काळात कवी, शूर वीर व उत्तम खेळाडू यांना खऱ्या लॉरेल वृक्षाच्या पानांचे हार –गजरे देऊन त्यांचा सन्मान करीत लॉरेलला यशाचे प्रतीक मानीत त्यावरून ‘लॉरेल’ हे इंग्रजी आणि ‘जयपत्र’ हे मराठी नाव सार्थ वाटते. इतिहास, लोककथा, पुराने व काव्ये यांमध्ये लॉरेलचे उल्लेख आढळतात.

खरा लॉरेल हा मूळचा भूमध्य सामुद्रिक प्रदेशातील (इटली, ग्रीस व उत्तर आफ्रिका येथील) असून हे वृक्ष युरोपात व अमेरीकेत शोभेकरीता पिपांमध्ये लावतात व त्यांना भिन्न आकार देऊन उद्यानांतील सौंदर्यात भर घालतात. भारतातही बागेत अनेक ठीकाणी हे लावलेले आढळतात.

खरा लॉरेल वृक्ष सु. १२-१८मी. उंच व सरळ वाढतो याला साधी, चिवट, फिकट हिरवी, सुगंधी, सु. १० सेंमी. लांब, तळाकडे व टोकाकडे निमुळती होत गेलेली, भाल्यासारखी व एकाआड एक पाने असतात. त्याच्या बगलेत गोलसर व चवरीसारखे फुलोरे येतात व त्यावर चतुर्भागी (पुष्पदलांची चार मंडले असलेली) पिवळट हिरवी, लहान, एकलिंगी किंवा द्विलिंगी फुले येतात [⟶ फूल]. पुढे मांसल, गर्द जांभळी, सु. १.५ सेंमी. लांब, लंबगोल, एकबीजी, सुरकुतलेली मृदूफळे येतात प्रत्येक फळास तळाशी परीदलांचे (काही पुष्पदलांचे) सतत वेष्टन असते. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लॉरेसी अथवा तमाल कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

लॉरेलची पाने व फळे सुगंधी, उत्तेजक व मादक असून पूर्वी ती गर्भपात, अतिसार, श्वेतकुष्ठ, जलसंचय इत्यादींवर देत असत. पानांचा उपयोग स्वादाकरीता करतात. पानांतील उडून जाणाऱ्या सुगंधीतेलाचा वापर सुगंधी द्रव्यांत करतात. फळात २० -३४%स्थिर तेल असते ते अवयव लचकल्यास किंवा मुडपल्यास त्यांवर लावण्यास वापरतात. औषधे, पशुवैद्यक व साबणादी सुगंधी द्रव्ये यांमध्ये तेलाचा उपयोग करतात. लॉरेलचे लाकूड ⇨ अकोडाच्या लाकडासारखे असून ते शोभिवंत (कलाकुसरयुक्त) कपाटे व पेट्यांकरिता फार उपयुक्त असते. लॉरेलची नवीन लागवड बिया आणि कलमे लावून करतात.

पूर्व क्रिटेशस कल्पातील (सु. १४ ते १२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) पोर्तुगालमधील खडकांत लॉरेलच्या पानांसारखे पर्णजीवाश्म (पानांचे शिलारूप अवशेष) आढळले आहेत.

संदर्भ : 1. Bailey, L. H. The Standard Cyclopedia of Horticulture, Vol. II, New York, 1960.

2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VI, New Delhi, 1962.

परांडेकर, शं. आ.