जहरी नारळ (अ) नर स्थूलकणिशाचा भाग व त्यावर नर-पुष्पे (आ) नर पुष्पांचा झुबका (इ) नर-पुष्प (ई) स्त्री-पुष्प (उ) फळ (ऊ) अष्ठी (ए) अष्ठीचा छेद : (१) अंतःकवच, (२) पुष्क, (३) गर्भ.

नारळ, जहरी : (हिं. दर्याका नारियल गु. दर्यानु नारियल सं. अब्धि-नारिकेल इं. डबल कोकोनट पाम, सी कोकोनट पाम, कोको द मेर लॅ. लोडोइसिया माल्दिविका कुल-पामी). हा फार मोठा तालवृक्ष सेशेल बेटांतील असून भारतीय उद्यानांत शोभेकरिता लावलेला आढळतो. माल्दिविका या जातिवाचक संज्ञेवरून त्याच्या मूलस्थानाविषयी गैरसमज होतो. याची उंची सु. १८–३० मी. व खोडाचा व्यास ०·३ मी. पर्यंत असतो. खोड गुळगुळीत पण त्यावर वलयाकृती वण (किण) असतात ताल कुलातील इतर वृक्षांप्रमाणे याला शाखा नसतात [→पामी, पामेलीझ]. शेंड्यावर दहा ते वीस मोठ्या साध्या, पंख्यासारख्या जाड पानांचा झुबका असतो. पान अंशतः हस्ताकृती विभागलेल असून देठ सु. तीन मी. लांब व पात्याचा व्यास १·८ मी. असतो. नर व मादी असे स्वतंत्र वृक्ष असून पानांच्या बगलेत स्थूलकणिशावर [→ पुष्पबंध] फुले येतात अनेक छेदित (सपाट टोके असलेल्या) महाछदांनी (फुलोऱ्याच्या तळाजवळच्या पानांसारख्या उपांगांनी) त्यांचे संरक्षण होते. नर वृक्षावर स्थूलकणिशाच्या अक्षाच्या पोकळीत अनेक नर-पुष्पांचे झुबके असून स्त्री वृक्षावर स्त्री-पुष्पे थोडी व छदकांनी बनलेल्या चषकात (पेल्यासारख्या अवयवात) येतात. नर-पुष्पात सु. छत्तीस केसरदले व वंध्य (वांझ) किंज असतो. स्त्री-पुष्पात तीन कप्प्यांचा ऊर्ध्वस्थ किंजपुट असून काही वंध्य केसरदले असतात [→ फूल]. फळ (अश्मगर्भी म्हणजे आठळीयुक्त)एकबीजी, फार मोठे (१·२ मी. घेराचे) व हिरवे असते. ते उघडल्यावर दोन नारळ परस्परांस ‘सयामी जुळ्या’प्रमाणे चिकटल्यासारखे दिसतात. अष्ठी (कोय, आठळी, करवंटीसह बीज) द्विखंडी, क्वचित त्रिखंडी, कठीण आणि बाहेरील मध्यकवचास पूर्णपणे चिकटलेली असते. अंतःकवच (करवंटी) जाड व काळे. करवंटीसह बीज आकारमान व वजन यांत वनस्पतिकोटीत पहिल्या क्रमांकाचे असून कधी २७·२ किग्रॅ. (परंतु सर्वसाधारणपणे ११·४ किग्रॅ.) असते. या वृक्षाला तीस वर्षांनी फुले येऊ लागतात. फुले आल्यापासून फळ पिकून बी तयार होण्यास सु. दहा वर्षे लागतात व बियांना अंकूर फुटण्यास सु. तीन वर्षे लागतात. अंकुरणात आदिमूळ (मोड) साधारण एक मी. खोल जाईपर्यंत आदिकोरक (कोंब) वाढत नाही. भरपूर जागा, कडक ऊन, दमट हवा, हलकी व सुपीक दमट जमीन इत्यादींशिवाय अंकुरण आणि नंतरची वाढ होत नाही. वृक्षाची वाढ होत असताना कित्येक वर्षे बीजाचे अवशेष नवीन खोडाच्या तळाशी राहिलेले आढळतात. समुद्रकिनाऱ्यापासून ते डोंगरमाथ्यापर्यंत कोठेही हा वृक्ष वाढतो तथापि खोल दरीत त्याची अधिक चांगली वाढ होते. सु. ५०–८० वर्षांपर्यंत खोडाची वाढ चालू राहते.

अष्ठीच्या करवंटीपासून कटोरे, बश्या, पेले, अलंकार वगैरे दागिने बनवितात. अपक्व खोबरे व खोडाचे टोक (कोंब) खाद्य असते. पूर्ण पक्व खोबरे फार कठीण व हस्तिदंताप्रमाणे उपयुक्त असते. हिरव्या फळातील पाणी व मऊ खोबरे (जेवणानंतर घेतल्यास) पित्तरोधक व अम्लताविरोधक असते. फळावरील काथ्या उकळून प्याल्यास मधुमेह तात्पुरता कमी होतो. अपक्व फळ पौष्टिक, विषाचा परिणाम घालविणारे व ज्वरनाशी असते पटकीच्या आजारात अतिसार व वांत्या कमी करण्यास उपयुक्त असते. पानांचा उपयोग छपराकरिता आणि टोपल्यांकरिता करतात. कोवळी पाने सुकवून व त्यांच्या पट्ट्या काढून हॅटकरिता वापरतात. पानांच्या शिरा व देठ केरसुण्या व टोपल्यांकरिता वापरतात. खोडापासून हातातील काठ्या, घराचे कठडे व पाण्याची कुंडेही बनवितात. कोवळ्या पानांवरील लव उशा व गाद्या यांत भरण्याकरिता वापरतात. भारतात या नारळांची आयात होते.

परांडेकर, शं. आ.