वनस्पति, वाहिनीवंत अबीजी विभाग : (लॅ. टेरिडोफायटा इ. व्हॅस्क्युलर क्रिप्टोगॅग्स म. नेचाम पादप). स्थलवासी (जमिनीवर वाढणाऱ्या) व वाहिनीवंत (पाणी व अन्नरस यांची ने-आण करणारे स्वतंत्र घटक असणाऱ्या) वनस्पतींपैकी फार प्राचीन काळापासून पृथ्वीवर असणाऱ्या बीजहीन वनस्पतींचा गट, वाहिनीवंत वनस्पतींचे टेरिडोफायटा व स्पर्‌मॅटोफायटा असे दोन विभाग पूर्वी करीत. पहिल्यात बीजे नसणाऱ्या व दुसऱ्यात बीजे असणाऱ्या वनस्पतींचा समावेश असे परंतु सु. ५०वर्षापूर्वी टेरिडोस्पर्मी [अथवा सायकॅडोफिलिकेलीझ ⟶ बी जी नेचे] ह्या टेरिडोफायसारख्याच वनस्पतींच्या जीवाश्मांचा (शिळारूप अवशेषांचा) शोध लागला व त्यांवरून असे आढळले की, त्या वनस्पतींच्या नेचांसारख्या [⟶ नेचे] पानांवर बीजे होती तसेच ⇨लेपिडोडेंड्रेलीझ या पुराजीव महाकल्पात (सु. ६०ते २४कोटी वर्षापूर्वीच्याकाळात आढळलेल्या जीवाश्मरूम गणातही बीजे (गर्भ नसलेली) आढळली आहेत. म्हणून टेरिडोफायटा व स्पर्मर्मॅफायटा या दोन विभागांतील काटेकोर भिन्नता नाहीशी झाली. जुन्या पद्धतीत टेरिडोफायटाचे चार वर्ग (सायलोफायटीनी, लायकोपोडिनी, एक्विसीटीनाव व फिलिसिनी) केला होते. ई. डब्ल्यू. सिनो यांनी १९३५ मध्ये ट्रॅकिओफायटा हा नवीन विभाग करून त्यामध्ये सर्व वाहिनीवंत वनस्पती समाविषअट केल्या व त्याचे चार वर्ग (सायलोप्सिडा, लायकोप्सिडा, स्फेनोप्सिडा व टेरोप्सिडा) केले व ते अनेकांनी मान्य केले. तथापि जी. म्. जी. एम्‌. स्मिथ (१९५५) यांनी पहिले तीन परस्परांपासून बरेच भिन्न असल्याने त्यांचे खाली नमूद केलेले स्वतंत्र विभाग केले तसेच टेरोप्सिडाऐवजी टेरोफायटा हा स्वतंत्र विभाग कल्पून त्यामध्ये फक्त नेचांचा (फर्न्स फिलिसिनी) समावेश केला. जी. एम्. स्मिथ यांचे पुढे दिलेले वर्गीकरण बऱ्याच शस्त्रज्ञांनी मान्य केले आहे. 

टेरिडोफायटा : विभाग सायलोफायटा वर्ग सायलोफायटीनी. सायलोफायटेलीझ व सायलोटेलीझ हे यातील गण असून ह्या विभागात एकूणसहा कुले आहेत.  

विभाग लेपिडोफायटा : वर्ग लायकोपोडिनी. लायकोपोडिएलीझ, सिलाजिनेलेलीझ, लेपिडोड्रेंलीझ व आयसॉएटेलीझ हे यातील गण असून ह्या विभागात एकूण दहा कुले आहेत.  

विभाग कॅलॅमोफायटा : वर्ग एक्विसीटीनी. हेनिएलीझ,स्फेनोफायलेलीझ वएक्विसीटीलीझ हे यातील गण असून ह्या विभागात एकूण तीन कुले आहेत. 

विभाग टेरोफायटा : वर्ग फिलिसिनी. प्रायमोफिलिसीस, यूस्पोरँजिएटी व लेप्टोस्पोरॅंजिएटी (अथवा गण फिलिकेलीझ) हे यातील उपवर्ग असून ह्या विभागात एकूण ८गण व १९कुले आहेत.  

सामान्य वर्णन : टेरिडोफायटा जुनी संज्ञा हल्ली थॅलोफायटा ब्रायोफायटा वगैरेंप्रमाणे सामान्य अर्थाने वापरली जाते, कारण ती सोयीस्कर ठरली आहे. नेचे व तत्सम इतर वनस्पती त्यात अंतर्भूत असल्याने ‘नेचाम पादप’ ही नवी मराठी संज्ञा सुचविली आहे. या विभागात एकूण सु. ३०० प्रजाती व १०,५२९ जाती (जी.एच्‌. एस्‌. लॉरेन्स यांच्या मते सु. २१५प्रजाती व ९,२९९जाती) आहेत. त्यांचा प्रसार मुख्यतः उष्ण व उपोष्ण कटिबंधात आहे. ह्यातील वनस्पतींचे पूर्वज सिल्युरियन व डेव्होनियन कल्पांत (सु.४२ते ३६.५कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) पृथ्वीवर अवतरले असावेत. यांचे ब्रायोफायटा [⟶ शेवाळी] व स्पर्‌मॅफायटा [⟶ वनस्पति, बीजी विभाग] या दोन्हींशी काही बाबतीत साम्य असल्याने वर्गीकरणात त्यांचे स्थान त्या दोहोंमध्ये आहे. ह्या वनस्पतींची काही लक्षणे विशेष उल्लेखनीय आहेत व त्यांवरून त्या शेवाळीपासून वेगळ्या दाखविता येतात. यांची बीजुकधारी (बीजुके अथवा अलैंगिक सूक्ष्म कोशिकांद्वारे−पेशींद्वारे−नवीन संतती निर्मिणारी) पिढी गंतुकधारी (लैंगिक कोशिका निर्मिणाऱ्या) पिढीपेक्षा अधिक प्रभाली, प्रमेदित व स्वतंत्र असते. ⇨औषधी, झुडपे व क्वचित वृक्ष, आरोही (वेलीप्रमाणे वर चढणारी),  ⇨अपिवनस्पती इ.तिची स्वरूपे आढळतात व सहसा या वनस्पती ओलावा व सावलीच्या ठिकाणी विशेषेकरून आढळतात. काही पाण्यात [उदा.मार्सिलिया, ॲझोला इ. ⟶जल नेचे], दलदलीच्या काठी [उदा., ऑस्मुंडा ⟶नेचे] तर काही सापेक्षतः रुक्ष जागी असतात. जमिनीवरच्या जीवनातील अनेक अनुयोजने (परिस्थितीशी जुळवून घेण्याची साधने किंवा रूपांतरे) त्यांच्या जीवनवृत्तात आढळतात. त्यांना खोड, मुळे (किंवा तत्सम साधे अवयव) व लहान किंवा क्वचित मोठी पाने असतात. फुले, फळे व बीजे नसतात. अनुयोजनेमध्ये वाहक घटक असलेले ऊतक तंत्र [प्रकाष्ठ, परिकाष्ठ इ.⟶ ऊतके, वनस्पतींतील], आधार-ऊतक तंत्र (समान रचना व कार्य असलेला कोशिकांचा समूह म्हणजे ऊतक), मूल तंत्र, ⇨अपित्वचा, वल्क (साल), ⇨वल्करंध्रे (सालीवरची छिद्रे) इत्यादींचा समावेश होतो. मुळे आगुंतक व सूत्रल (दोऱ्यासारखी) असून खोड अंशतः किंवा पूर्णतः जमिनीत वाढणारे (मूलक्षोड) व क्वचित पूर्णपणे जमिनीवर सरळ, उभे (उदा., वृक्षी नेचे) वाढणारे व शाखाहीन असते. ⇨आयसॉएटलीझमध्ये ते दृढकंद व लायगोडियम [⟶ नेचे] मध्ये आरोही असते. हिरवी पाने, शल्के (खवले) व बीजुकपर्णे (बीजुके धारण करणारी पाने) असे पानांचे तीन प्रकार काहीत आढळतात काहीत ती फक्त एकाच प्रकारची किंवा दोन प्रकारची, मोठी किंवा लहान, साधी किंवा संयुक्त (पिसासारखी किंवा हस्ताकृती विभागलेली), जिव्हिकावंत (तळाशी बगलेत जिभेसारखे लहान उपांग असलेली) किंवा अजिव्हकावंत [⟶यकोपोडिएलीझ] असतात परंतु अनेक नेचांमध्ये (फिलिकेलीझमध्ये) ती मोठी, संयुक्त व पिसासारखी [⟶ नेफ्रोलेपिस] विभागलेली असतात. काही नेचांमध्ये ती हस्ताकृती किंवा क्वचित साधीही असतात.  

प्रजोत्पादन : बीजुकपर्णे साधी किंवा संयुक्त असून नेहमीच्या हिरव्या पानासारखी असतात परंतु कधी कधी ती थोडीफार निराळी असतात. त्यांवर एकेकटे किंवा पुंजक्यांनी बीजुकोश (बीजुके निर्माण करणाऱ्या पिशव्या) असतात. बीजुके एकाच प्रकारची किंवा दोन प्रकारची असतात. सारखी असल्यास [⟶ नेचे] वनस्पतींना समबीजुक व भिन्न असल्यास असमबीजुक किंवा विषमबीजुक म्हणतात. ⇨सायलोफायटेलीझ, ⇨सायलोटेलीझ व ⇨लायकोपोडिएलीझ समबीजुकअसून ⇨सिलाजिनेलेलीझ, ⇨यसॉएटेलीझ व ⇨जल नेचे असमीबीजुक आहेत व त्यांची बीजुकपर्णे लघुबीजुककोशधारी व गुरुबीजुककोशधारी (म्हणजेच लघुबीजुकपर्णे व गुरुबीजुकपर्णे) अशी दोन प्रकारची असतात. बीजुककोशांची रचना, विकास पद्धती, त्यांवरचे स्फोट करणारे वलय, त्यांचे तडकण्याचे प्रकार (स्फुटन), पुंजक्यावरचे आच्छादन (पुंजत्राण) व बीजुकांची संख्या यासंबंधीच्या लक्षणांना वर्गीकरणात फार महत्त्व असते. ह्यासंबंधीचा तपशील वर उल्लेख केलेल्या त्या त्या गणावरील नोंदीत वर्णन केलेला आहे.  


 बीजुककोशांची विकासाची पद्धत पाहिल्यात तीत दोन प्रकार आढळतात : एक यूस्पोरँजिएट (स्थूलबीजुकोशिक) व दुसरी लेप्टोस्पोरॅंजिएट (तनुबीजुककोशिक). यापैकी पहिल्या पद्धतीने बनलेल्या बीजुककोशाचे आवरण जाड (अनेक थरांचे) असल्याने त्याला स्थूल बीजुककोश म्हणतात व ते ज्या गटा (उपवर्गात) आढळतेते गट स्थूलबीजुककोशी (यूस्पोरॅंजिएटी) होत. त्यांच्या बीजुककोशाचाविकास बीजुकधारीच्या पृष्ठभागावरच्याअनेक कोशिकांपासून झालेलाअसतो. तसेच बीजुकांची संख्या सापेक्षतः मोठी असते.प्रायमोफिलिसीस [⟶सोनॉप्टेरिडेलीझ] या प्राचीन नेचांत यूस्पोरॅंजिएट प्रकार आढळतो परंतु हल्ली आधुनिक नेचे व पर्मियन कल्पानंतरचे प्राचीन नेचे यांमधील दोन प्रकारांनाच फक्त ह्या संज्ञा वापरात आहेत. या दृष्टीने कमी प्रगट असलेल्या व वर सांगितलेली स्थूलबीजुककोशिकांची लक्षणे असणाऱ्या ⇨फिओरलॉसेलीझ व ⇨मॅरॅटिएलीझ या नेचांचा अंतर्भाव यूस्पोरँजिएटीत करतात. दुसऱ्या पद्धतीने बनलेल्या बीजुककोशाचे आवरण पातळ (एका थराचे) असून त्याला ‘तनुबीजुककोश’ म्हणतात व ज्या गटात (उपवर्गात) ते आढळतात त्यांना ‘तनुबीजुककोशी’ (लेप्टोत्पोस्पोरँजिएटी) म्हणतात. यांचे बीजुककोश बीजुकधारीच्या पृष्ठभागावरील फक्त एका कोशिकेपासून बनतात व त्यातील बीजुकांची संख्या मर्यादित असते. ज्यांना ‘खरे नचे’ (अथवा फिलिकेलीझ) म्हणतात, त्यांचा अंतर्भाव या गटात होतो. यांचे वर्णन ⇨नेचे या नोंदीत असून ⇨नेफ्रोलेपिस (नेचा) हे त्याचे उदाहरण आहे. वरील दोन उपवर्गांत पक्व बीजुककोशाची संरचना, रेतुकाशये (पु-जननेंद्रिये) व गर्भविषयक लक्षणांतही काही फरक आढळतात त्यामुळे ते उपवर्ग (किंवा त्यांतील वनस्पती) परस्परांपासून वेगळे ओळखणे शक्य असते.  

अनुकूल परिस्थितीत (तापमान, पाणी इ.) बीजुके रुजून त्यांपासून एकपट रंगसूत्रांची (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढील पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांची) संख्या असलेली व लिंगभेदयुक्त जननेंद्रिये असणारी पिढी (गंतुकधारी) जन्मास येते. समबीजुक वनस्पतींत गंतुकधारी बीजुकावरणाबाहेर वाढतो परंतु असमबीजुकांमध्ये ती पिढी अंशतः किंवा पूर्णतः बीजुकात वाढते (उदा., सिलाजि नेला). ही गंतुकधारी पिढी शेवळींच्या तत्सम पिढीशी तुलना केल्यास ऱ्हासित (लहान व कमी प्रभेदित) असते ती जमिनीत किंवा जमिनीवर वाढते. आत वाढल्यास ती हिरवी नसून आणखीच ऱ्हसित असते व तिच्या पोषणात तिला कवकतंतुचे [बुरशीसारख्या हरित द्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतीच्या−कवकाच्या−शरीरातील तंतुचे ⟶वक] सहाय्य लागते. जमिनीवर वाढ झाल्यास ती सपाट, हिरवी, स्वावलंबी, परंतु पर्णहीन व मूलहीन असून तिला फक्त मुळांसारखे पण साधे अवयव (मूलकल्प) असतात शिवाय बहुधा तिच्या खालच्या पृष्ठावर गंतुके बनविणारी इंद्रिये (गंतुकाशये) असतात एक्विसीटमध्ये ती सपाट व अनेक खंडयुक्त असून गंतुकधारी बीजुकात वाढल्याने फारच संक्षिप्त बनतो तो एकलिंगी असून लघुवीजुकात रेतुकाशय व गुरबीजुकात अंदुककलश (स्त्री-जननेंदिय) बनवितो. 

टेरिडोफायटामध्ये रेतुकाशये लहान, विविध व गोल असतात ती गंतुकधारीत रूतलेली किंवा अंशतः अथवा पूर्णतः पृष्ठावर असून त्यांना बहुधा कोशिकांच्या एका थराचे किंवा अधिक थरांचे आवरण असते व आतील कोशिकांपासून २०ते ५०सर्पिलाकृती (फिरकीसारखे) सकेसल (सूक्ष्म केसासारखे जीवद्रव्याचे धागे असलेली) रेतुके (चल पुं-जनन कोशिका ⟶कोशिका] किंवा साधी, दोन केसले असलेली रेतुके तयार होतात असमबीजुक वनस्पतीत गंतुकाशयांची व त्यांतील गुंतकांची संख्या यापेक्षा फारच कमी असते. रेतुकाशयाचा विकास [⟶ नेफ्रोलेपिस] गंतुकधारीच्या एका पृष्ठवर्ती कोशिकेपासून होतो प्रथम त्या कोशिकेची आडवी विभागणी होऊन दोन कोशिका बनतात. एकीपासून रेतुकाशयाचे आवरण बनते व दुसरीपासून अनेकदा विभाजन होऊन रेतुके बनतात पूर्ण वाढ झाल्यावर आवरण फुटून ती बाहेर येतात व पाण्यात पोहू लागतात. अंदुककलश लहान व लांबट मानेच्या चंबुसारखा असून त्याचे अंदुस्थली (तळभाग) व ग्रीवा (मान) असे दोन भाग असतात. अंदुस्थली फुगीर असून तिचा बराचसा भाग गंतुकधारीत रुतलेला असतो. ग्रीवा त्याबाहेर डोकावते. अंदुस्थलीत तळाशी एक अंदुक (अचल स्त्री-जनन कोशका)असून तिच्यावर एक वंध्य कोशिका (औदरमार्ग कोशिका) असते. ग्रीवेमध्ये ग्रीवामार्ग कोशिका असून त्यांची संख्या कमी जास्त असते.अंदुककलशाचा विकास गंतुकधारीच्या एका पृष्ठवर्ती कोशिकेपासून होतो. उभ्या व आडव्या अशा अनेक पडद्यांनी हिची विभागणी होऊन वर उल्लेख केलेले सर्व भाग (अंदुस्थली, अंदुक, ग्रीवा इ.) बनतात भिन्न गटांमध्ये आकार व संख्या यांबाबतीत फरक आढळतात. अंदुक-कलशाची पूर्ण वाढ झाल्यावर रेतुकास ग्रीवेत प्रवेश देण्यास मार्ग मोकळा होतो. तसेच ग्रीवा मार्ग कोशिका व औदर मार्ग कोशिका यांचे त्याच वेळी चिकट श्लेष्मल (बुळबुळीत) द्रवात रूपांतर होऊन तो द्रव अंदुककलशाच्या तोंडाशी येतो व त्यामुळे रेतुकांवर रासायनिक आकर्षण निर्माण होते.  

या वनस्पती जमिनीवर वाढत असल्या, तरी नेचे व ⇨शेळीप्रमाणे रेतुके व अंदुक यांचा संयोग (फलन) बाहेरील पाण्यावर अवलंबून असतो. रेतुके त्या गंतुकधारीजवळच्या पाण्यात पोहत जाऊन अंदुककलशातील अंदुकाशी एकरूप होतात व रंदुक (संयुक्त कोशिका) बनते. या फलनक्रियेमुळे रंदुकातील व त्यापासून बनणाऱ्या बीजुकाधारीतील रंगसूत्रांची संख्या दुप्पट होते. पुढे त्याचा विकास होऊन गर्भ बनतो. त्याची सामान्य रूपरेखा [⟶फ्रोलेपिस] अशी : रंदुकाची प्रथम आडवी विभागणी होऊन अध्वस्तल व अपितल असे दोन विभाग होतात. नंतर उभ्या विभागणीने चार केशिका बनतात. दोन अपितल कोशिकांपासून दलिका व खोड आणि दोन अधस्तल कोशिकांपासून प्राथमिक मूळ व पद हे गर्भाचे अवयव बनतात. टेरिडोफायटातील भिन्न गटांत यांबाबत काही फरक आढळतात. काहींच्या गर्भामध्ये या चारीशिवाय ‘आलबक’ या नावाचा एक तंतूसारखा भाग अपितलापासून तयार होतो व उरलेल्या गर्भास खालच्या गंतुकधारीत ढकलतो. पूर्ण बनलेला हा गर्भ लवकरच अधिक विकास पावून बीजुकधारी म्हणून वाढतो. बीजी वनस्पतीप्रमाणे तो सुप्तावस्थेत काही वेळ राहत नाही. शेवाळी व नेचे यांच्याप्रमाणे येथेही बीजुकधारी व गंतुकधारी पिढ्यांचे एकांतरण (एकाआड एक निर्मिती होणे ⟶एकांतरण, पिढ्यांचे] स्पष्ट दिसते.  

 

बीजुकापासून बनलेल्या गंतुकधारीवर गंतुकांच्या मदतीशिवाय बीजुकधारी बनणे (अगंतुक जनन), बीजुकधारीच्या अवयवांपासून शाकीय पद्धतीने बीजुकधारींची पुनर्निर्मिती होणे अथवा बीजुकधारीपासून बीजुकांच्या मदतीशिवाय गंतुकधारी निर्माण होणे (अबीजुकजनन) हे अनित्य प्रजोत्पादनाचे प्रकार टेरिडोफायटा विभागातील अनेक जातींत आढळतात.


शरी र : शरीराच्या भिन्न अवयवांचा विचार केला असता त्यात फक्त प्राथमिक स्वरूपाची वाढ आढळते कोणत्याही विद्यमान जातीत द्वितीयक (नंतर घडून येणारी) स्वरूपाची वाढ नसते. [अपवाद : बॉट्रिकियम, आयसॉएटिस ⟶ऑफिओग्लॉसेलीझ आयसॉएटेलीझ). प्राचीन जातीत ती होती, असे जीवाश्मांवरून दिसून येते. खोड, पाने व मुळे यांच्या अंर्तरचनेत बीजी वनस्पतीप्रमाणे सर्व प्रकारचे ऊतके आढळतात ऊतक तंत्र सामान्यतः तसेच असते किरकोळ फरक मात्र दिसतात, उदा., वाहिन्या व आडव्या चाळणीच्या कोशिका (चालनी नलिका) क्वचितच आढळतात. वाहिक व बाजूवर चाळणी असलेल्यानलिका आढळतात. या वनस्पतींत सर्व प्रकारचे ⇨रं (खोड, फांद्या किंवा मुळे यांतील मध्यवर्ती वाहक भाग) आढळतात. मुळात आद्यरंभ असतो. ई.सी. जेफ्री (१८९८) यांनी प्रतिपादन केलेल्या रंभ-सिद्धांतानुसार [⟶ रंभ] आद्यरंभ साधे व प्रारंभिक असून त्यापासून पुढे क्रमविकासाने वा उत्क्रांतीमुळे नलिका रंभ, खंडित रंभ, बहुमंडलित रंभ, बहुलाय रंभ इ. निर्माण झाले. रंभ-सिद्धांतानुसार आद्यरंभी (उदा., सायलोटम) वनस्पती प्राचीन व बहुलाद्य रंभी[उदा., ⟶नेफ्रोलेपिस] किंवा बहुमंडलित रंभ असणाऱ्या वनस्पती अधिक प्रगत व विकसित होत.  

उगम व विकास : टेरिडोफायटांच्या उगम व विकासाबाबत शास्त्रांमध्ये एकमत नाही. यातील सर्वात साध्या व प्राचीन म्हणजे सायलोफायटा यांच्या पूर्वजांचे जीवाश्म मध्य सिल्युरियन ते उत्तर डेव्होनियनपर्यंतच्या काळातील खडकांच्या थरात सापडतात परंतु ते नेमक्या कोणत्या पूर्वजापासून आले असावेत, याचा अंदाज करणे कठीण गेले आहे. त्याबाबतीत दोन सिद्धांत प्रचलित आहेत. एका सिद्धांताप्रमाणे या वनस्पती ⇨शैवलापासून [पाण्यात वाढणाऱ्या अतिशय साध्या, स्वतंत्र कायक वनस्पतीपासून ⟶ कायक वनस्पति] उत्क्रांत झाल्याअसाव्यात. दुसऱ्याप्रमाणे त्या ⇨शेवाळीपासून झाल्या असाव्यात.  

डी.एच्‌. स्कॉट (१९००), ए.एच्‌.चर्च (१९१९), ए. जे. इम्स (१९३६), एफ्‌, ई. फ्रिट्‌श (१९४५) व सी. ए. आर्नल्ड (१९४७) या सर्वांच्या मते टेरिडोफायटा शैवलांपासून उत्पन्न झाले आहेत. काहीच्या मते तपकिरी सागरी शैवलांपासून आणि इतरांच्या मते हिरव्या शैवलांपासून त्यांची उत्पत्ती झाली [के. बुलीन (१९०१) व जे. पी. लॉटसी (१९०९) ]असावी. एफ्‌. ओ. बॉबर (१९३५) व डब्ल्यू. त्सिमरमान (१९३८) यांच्या मतेशेवाळीपासूनटेरिडाफायटा उत्क्रांत झाले असावेत. या दोन्हींचे गंतुकधारी, रेतुकाशये, अंदुककलश व पिढ्यांचे एकांतरण यांमध्ये भरपूर साम्य आहे. अँथोसिरॉस या शृंगकाची (शेवाळीपैकी एका प्रजातीची) व सायलोफायटाची बीजुकधारी पिढी यात बरेच साम्य आहे, म्हणून डी. एच्. कॅम्बेल (१८९५) यांच्या मते अँथोसिरसारख्या पूर्वजापासून टेरिडाफायटा उत्क्रांत झाले असावेत. जीवाश्मांच्या अभ्यासाने असे आढळले आहे की, वाहिनीवंत अबीजी वनस्पती शेवाळीपेक्षा प्राचीन आहेत. सिल्युरियन व डेव्होनियन कल्यांत त्यांचे जीवश्म आढळतात परंतु शेवाळींचे जीवाश्म त्यानंतरच्या कार्बॉनिफेरस कल्पातील (सु.३५ते ३१कोटी वर्षांपूर्वींच्या कालखंडातील), पेनसिल्व्हेनियन (सु. ३१कोटी वर्षापूर्वीच्या) खडकाच्या थरात प्रथम सापडतात. यावरून शेवाळींपासूनच्या उत्क्रांतीला प्रत्यक्ष आधार फार अपुरा आहे.  

टेरिडोफायटातील सर्वांत साध्या व प्राचीन वनस्पती म्हणजे सायलोफायटा असून त्यांपासून लेपिडोफायटा, कॅलॅमोफायटा यांचा क्रमविकास इतका जलद झाला की, कॉर्बॉनिफेरस कल्पात लेपिडोफायटा व कॅलॅमोफायटा यांचे भव्य वृक्ष भरभराटीस आले. त्यांचा ऱ्हास पुढे पर्मियन कल्पात (सु. २७.५ते २४.५कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) झाला. सध्या असलेल्यापैकी एक्विसीटमलायकोपोडियम हे त्या जीवाश्मरूप पूर्वजांचे जिवंत वंशज होत. सायलोफायटापासू निर्माण झालेल्या टेरोफायटा (फर्न) वनस्पतींचा क्रमविकास मात्र बराच सावकाश झाला. आज बहुसंख्येने आढळणारे फर्न पर्मियनंतरच्या ट्रायासिक व जुरासिक कल्पात (सु. २३ते १५.५कोटी वर्षापूर्वीच्या काळात) उदयास आले. सर्व वाहिनीवंत वनस्पतीतील भिन्न भिन्न गट यांचे परस्परसंबंध तसेच शेवाळी व शैवले यांच्याशी असलेले संबंध दर्शविणारी आकृती⇨क्रमविकास नोंदीत पहावी.  

पहा: ऑफिओग्लॉसेलीझ:एकांतरण, पिढ्यांचे कॅलॅमोइटेलीझ पर्मियन व पर्मोट्रायासिक पादपपति पुरावनस्पतिविज्ञान स्फेनाफायलेलीश.

संदर्भ : 1. Arnold, C. A. An Introduction to paleobotany, New York, 1947.  

           2. Bold, H. C. Plant Kingdom, London, 1961.  

           3. Eames, A. J. Morphology of Vascular Plants, Lower groups, London, 1936.  

           4. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.  

           5. Smith, G. M. Cryptogamic Botany, Vol II, Tokyo, 1955.

मुजुमदार, शां. व. परांडेकर, शं. आ.