अस्मानिया : ( हूम हिं. खांडा फाग लॅ. एफेड्रा जिरार्डिआना, कुल–एफेड्रेसी ). हे लहान व साधारण उंचीचे रुक्ष ठिकाणी वाढणारे झुडूप समशीतोष्ण व आल्पीय हिमालयात काश्मीर ते सिक्कीम (सु. २,२००–५,००० मी. उंचीवर) पर्यंत आढळते.⇨प्रकटबीज वनस्पतींपैकी ⇨ एफेड्रा  या वंशातील ही एक जाती असून हिची सर्वसामान्य लक्षणे ⇨ नीटेलीझ  गणात वर्णिल्याप्रमाणे आहेत. हिच्या बारीक, पर्णहीन व गोलसर फाद्यां गर्द हिरव्या असून त्यांवर रेषा असतात व त्यांचे झुबके येतात. बीजे मांसल खवल्यांनी वेढलेली, अंडाकृती, लाल, गोड व खाद्य असतात. या वनस्पतीपासून (व तिच्या वंशातील आणखी काही जातींपासून) एफेड्रीन हे औषधी अल्कलॉइड मिळवितात. झाड जून होते तसतसे त्याचे प्रमाण वाढते. भारतातील एफेड्रा मेजर  या जातीत ते सर्वांत अधिक असते. पाश्चात्त्य वैद्यकात याचा बराच उपयोग करतात. ते सर्दी, दमा, परागज्वर इत्यादींवर फार गुणकारी असते. चीनमध्ये ५,००० वर्षांपूर्वीपासून ते उपयोगात आहे. भारतातल्या तीन जातींपासून हे औषध मिळविण्याचे प्रयत्न चालू आहे. एफेड्रा इंटरमेडिया  या जातीपासून वेदकाली ‘सोमरस’ काढीत असावे असा अंदाज व्यक्त केला गेला आहे [ → सोमलता]. अस्मानियाला ‘सोमलता’ असेही म्हटलेले आढळते.

पहा : नीटेलीझ (आकृती).

परांडेकर, शं. आ.