पानफुटी : (पान फुइ हिं. अस्थिभक्ष, जखम-ए.हयत क. लोन्नाहडकन गिड सं. अस्थिभक्ष्य, पर्णबीज इं. एअर प्लँट, लाइफ

 पानफुटी : (१) फांदी, (२) फुलोरा, (३) पुष्पमुकुट (उघडलेला) व केसरदले, (४) किंजमंडल (५) किंजपुटाचा आडवा छेद.

फ्लँट लॅ व्रायोफायलम कॅलिसीनम, कलांचो पिनॅटा कुल-क्रॅसुलेसी). सु. ०.३-१.२ मी. उंच वाढणारी ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) रसाळ ⇨ ओषधी  मूळची उष्ण आफ्रिकेतील असून उष्ण कठिबंधात सर्वत्र आढळते. भारतात व इतरत्र सामान्यपणे शोभेकरिता सापेक्षतः कमी पाणी असलेल्या जागी लावतात व रानटी अवस्थेतही आढळते. खोड साधारण चौधारी, लालसर व पोकळ पाने साधी, क्वचित संयुक्त, मांसल, लंबगोलाकृती, स्थूलदंतुर (बोथट दात्यांची), समोरासमोर, ७-१५ सेंमी. लांब फुले घंटेप्रमाणे लोंबती फुलोरा टोकाकडे समोरासमोर फांद्या असलेली परिमंजरी [→ पुष्पबंध] संवर्त व पुष्पमुकुट नलिकाकृती, हिरवट तांबडे [→ फूल] पेटिकाफळे चार व सुकलेल्या संवर्त आणि पुष्पमुकुटाने वेढलेली असतात. बिया अनेक, लहान व गुळगुळीत. तर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ क्रॅसुलेसी कुलात (धायमारी कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.

पाने कडू थोडी गरम करून जखमा, गळवे, सूज, कापणे, खरचटणे, विषारी कीटकदंश इत्यादींवर लावतात. पानांचा रस अतिसाकर, आमांश, पटकी आणि मुतखडा ह्या विकारांवर दुप्पट लोण्याबरोबर देतात. पाने रक्तस्तंभक (रक्तस्राव थांबविणारी), जंतुनाशक, स्तंभक (आकुंचन करणारी) असतात. पाने तोडून खाली टाकली असता त्यांच्या किनारीपासून नवीन रोपे उगवतात. [→ पुनर्जनन].

जमदाडे, ज. वि.