अंतस्त्वचा : (एंडोडर्मिस). वाहिनीवंत (पाणी अथवा अन्नरसांची ने-आण करणारे शरीरघटक असणाऱ्या) वनस्पतींत सामान्यपणे सर्व मुळांत ⇨ ओषधीय व ⇨ वाहिनीवंत अबीजी वनस्पतींच्या खोडात, तसेच ⇨प्रकटबीज वनस्पतींच्या पानांत, मध्यत्वचेच्या सर्वांत आतील कोशिकाथरास ‘अंतस्त्वचा’ म्हणतात. हा वर्तुळाकार थर विशेषत्व पावलेला असतो व संरचनावैशिष्टयामुळे तो ओळखता येतो. याच्या आतील बाजूस वाहक (रंभाचा) भाग असतो.

अंतस्त्वचा. (१) कोशिका(आडवा छेद), कॅस्पेरीय बिंदू (२) त्रिमितीय कोशिका, कॅस्पेरीय पट्टासह(३) पृष्ठदृशय, मार्गकोशिका (कळ्या).

अंतस्त्यवचेतील कोशिका जिवंत असून त्यात स्टार्चचे कण, श्लेष्मा (काही चिकट पदार्थ), टॅनिन, गोंद इत्यादींपैकी काही पदार्थ आढळतात. या कोशिका  लांबट व त्यांची टोके सपाट असून त्या ज्या इंद्रियात असतात, त्याच्या अक्षाशी समांतर असतात. त्यांची कोशिकावरणे कमी जास्त जाड असतात व तो जाडीचा भाग लिग्निन मेणचट पदार्थाने (लिग्नोसुबरिन) भरलेला व त्यामुळे अपार्य बनलेला असतो. सर्व कोशिकांच्या बाजूच्या भिंती परस्परांना पूर्णपणे चिकटून असल्याने अंतराकोशिकी (कोशिकांमधून) पोकळ्यांचा अभाव असतो. आडव्या छेदात प्रत्येक कोशिका पिपासारखी दिसते. कोशिकावरणाच्या जाडीच्या संदर्भात त्यांचे दोन प्रकार ओळखता येतात. एका प्रकारात वर उल्लेखिलेल्या सुबेरिन (त्वक्षी) पदार्थाचा एक अरूंद पट्टा कोशिकेच्या बाजूच्या व दोन्ही टोकांच्या भिंतीवर चिकटलेला आढळतो, त्याला ‘कॅस्पेरीय पट्ट’ म्हणतात. दोन कोशिकांच्या मधल्या बाजूच्या भिंतीवरच्या दोन संलग्न पट्टांचा जाड थर बहिर्गोल भिंगाप्रमाणे दिसतो. त्याला ‘कॅस्पेरीय बिंदू’ म्हणतात. दुसऱ्या प्रकारात (उदा, केळ) प्रत्येक कोशिकेच्या बाजूच्या व आतल्या सर्वच भिंती जाड असतात कधी (उदा, चोपचिनी) तर सर्व भिंतीवर सुबेरिनाचे जाड थर आढळतात. अशा कोशिका-थरातील काही एकेकट्या कोशिकांच्या भिंती पातळ राहतात त्यांना ‘मार्गकोशिका’ किंवा ‘संचरण-कोशिका’ म्हणतात. मुळातल्या मार्गकोशिका आदिप्रकाष्ठासमोर (पहिल्याने बनलेल्या काष्ठासमोर) असतात. पहिल्या प्रकारातल्या कोशिका द्विदलित व वाहिनीवंत अबीजी वनस्पतींत व दुसऱ्या प्रकारातल्या एकदलिकितांत आढळतात.

अंतस्त्वचेचे कार्य निश्चितपणे समजलेले नाही तथापि तिच्या स्थानावरुन व संरचनेवरून ते पाण्याच्या हालचालीशी संबंधित असावे व पाण्याची त्रिज्येच्या दिशेने होणारी हालचाल कोशिकेतील जीवद्रव्याच्या (प्राकलाच्या) नियंत्रणाखाली असावी, असे मानतात. उपमुळांचा व आगंतुक कळ्यांचा उगम व त्वक्षा बनविणाऱ्या ऊतककराचा उगम अंतस्त्वचेतून होतो, असे आढळले आहे.

पहा : त्वक्षा मध्यत्वचा ऊतककर रंभ शारीर, वनस्पतींचे.

परांडेकर, शं. आ.