उन्हाळी : (उधडी; हिं. सरफोंका; गु. सरपुंखो; क. फंकी, काग्‍गिफणिके; सं. शरपुंखा, प्लीहारी; इं. पर्पल गोट्स र्‍यू; लॅ. टेफ्रोसिया पुर्पुरिया; कुल- लेग्युमिनोजी). ही सु. ३०–६० सेंमी. उंच, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) व पसरट फांद्यांची ⇨ ओषधी  मलायात व भारतात सर्वत्र, जंगलांच्या, रस्त्याच्या किंवा शेतीच्या कडेने उघड्यावर आढळते. पाने संयुक्त, पिसासारखी, एकांतरित (एकाआड एक) विषमदली, ५–१० सेंमी. लांब उपपर्णे आराकृती; दले ११–२१, संमुख (समोरासमोर), भाल्यासारखी परंतु तळाशी अरुंद, टोकास रुंद व खालून लवदार. फुले पानांसमोरच्या विरळ मंजरीवर ऑक्टोबर जूनमध्ये येतात; ती पतंगरूप [→ फूल; लेग्युमिनोजी, पॅपिलिऑनेटी] असून मोठी पाकळी लाल व खाली लवदार असते. शिंबा (शेंग) अरुंद, ३–४·५ सेंमी. लांब, थोडी वाकडी, बारीक व टोकदार आणि तीत पाच सहा बिया असतात.

मूळ अग्‍निमांद्यावर व जुनाट अतिसारावर घेतात; ताज्या मुळाच्या सालीचे पीठ मिरीबरोबर गोळी करून घेतल्यास हट्टी शूलावर उपयुक्त; ही वनस्पती रक्तशोधक (रक्त शुद्ध करणारी), बलप्रद व सारक आहे. फ्रेंच गिनीत मत्स्यविषाकरिता वापरतात. बिया खाद्य व उंदरामुळे होणाऱ्या विषबाधेवर गुणकारी.

परांडेकर, शं. आ.