माल्व्हेसी : (भेंडी कुल). फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] या द्विदलिकित (बियांत दोन दलिका असलेल्या) कुलाचा समावेश ⇨ माल्व्हेलीझ गणात केला असून याशिवाय आणखी चार कुले या गणात आहेत व त्यांचे परस्परांशी आप्तभाव आहेत. या कुलातील वनस्पती ⇨ ओषधी, क्षुपे (झुडपे) व वृक्ष आहेत. त्यांच्या खोडावर सूत्रल, काष्ठमय व शरीरावर शल्करूप (खवल्यासारखे), तारकाकृती व प्रपिंडीय (ग्रंथीयुक्त) केस असतात. अतिथंड प्रदेशांखेरीज इतरत्र या कुलातील सु. ५० प्रजाती व १,००० जाती विखुरलेल्या आढळतात. पाने एकाआड एक, साधी, अंखड किंवा विविध प्रकारे खंडित, हस्ताकृती-सिराल (शिरा असलेली) व सोपपर्ण (तळाशी उपांगे असलेली) असतात. फुले नियमित (अरसमात्र), अवकिंज, द्विलिंगी, एकाकी किंवा अकुंठित फुलोऱ्यात [→ पुष्पबंध] असतात. संदले बहुधा ३–५ जुळलेली काही प्रजातींत त्यांखाली छदकांचे (फुलाच्या तळाजवळच्या उपांगांचे) मंडल (अपिसंवर्त) असते. प्रदले (पाकळ्या) ५, सुटी तथापि तळाशी केसरदलांना चिकटलेली व परिहित किंवा परिवलित [→ पुष्पदलसंबंध] केसरदले असंख्य, एकसंघ (एकत्र जुळलेली) परागकोश एकच, मूत्रपिंडाकृती, एकच कोटर (कप्पा) असलेला परागकण मोठे व काटेदार किंजदले बहुधा ५–१० किंजपुट ऊर्ध्वस्थ, ५–१० कप्प्याचा [→ फूल]. बीजकविन्यास (अपक्व बीजांची मांडणी) अक्षलग्न, फळ बोंड किंवा पालिभेदी (निसर्गतः खंड होऊन तुकडे होणारे), क्वचित मृदूफळ बी सपुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश असलेले). श्लेष्मयुक्त कोशिका (बुळबुळीत पदार्थयुक्त पेशी) कोश शरीरात सर्वत्र आढळतात. परागण बहुधा कीटकांमार्फत होते. या कुलातील कापूस, अंबाडी, भेडी इ. उपयुक्त वनस्पती पिकविल्या जातात, मुद्रा, जास्वंद, पारोसा पिंपळ, गुलखेरा (ॲल्थिया रोझिया) इ. शोभेकरिता बागेत लावतात. कस्तुरी भेंडी, मुद्रा इ. औषधी उपयोगाच्या आहेत आणि चिनी ताग, मुद्रा, कसीली वगैरे धाग्याकरिता उपयुक्त आहेत. याला कार्पासादि-कुल असेही म्हणतात.

पहा : माल्व्हेलीझ .

संदर्भ : 1. Mitra, J. N. An Introduction to Systematic Botany and Ecology. Calcutta, 1964.

             2. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol. II, Cambridge, 1963.

जोशी, गो. वि.