सहानी, बिरबल रूचिराम : (१४ नोव्हेंबर १८९१-१० एप्रिल १९४९). सुप्रसिद्ध भारतीय पुरावनस्पतिविज्ञ व भारतीय वनस्पतिविज्ञान परिषदेचे संस्थापक. जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या भेडा या गावी. वडील रसायनशास्त्राचे प्राध्यापक असल्यामुळे त्यांना योग्य शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली. वडिलांसोबत हिमालय व इतर ठिकाणच्या सहली करताना त्यांना वनस्पती, खडक, जीवाश्म यांचा संग्रह करण्याचा छंद जडला. त्यांच्या या छंदाला स्वीडिश शास्त्रज्ञ ⇨ स्व्हेन आंडर्स हेडीन यांच्यामुळे अधिक गती व प्रेरणा मिळाली.

बिरबल सहानीबिरबल सहानी यांचे प्राथमिक शिक्षण लाहोरच्या मिशन अँड सेंट्रल मॉडेल स्कूल्स येथे व महाविदयालयीन शिक्षण तेथीलच शासकीय महाविदयालयात झाले. १९११ साली त्यांनी पंजाब विदयापीठाची बी.एस्सी. पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी केंब्रिज विदयापीठाचा ट्रायपॉस मिळविला. ह्या विदयापीठात ए.सी. सीवर्ड यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी जीवाश्मवनस्पतिविज्ञानाविषयी ( प्राचीन जीवाश्म -शिळारूप -वनस्पतींच्या संबंधी ) बरेच मौलिक संशोधन केले. त्यांच्या वनस्पती जीवाश्मांवरील संशोधनासाठी लंडन विदयापीठाने डी.एस्सी. ही पदवी देऊन त्यांना सन्मानित केले (१९१९). केंब्रिज विदयापीठातून एस्‌सी.डी. ही पदवी मिळविणारे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ होते (१९२९).

भारतात परतल्यावर पंजाब विदयापीठात प्राध्यापक व बनारस विदयापीठात वनस्पतिविज्ञानाचे विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. १९२१ मध्ये नवीनच स्थापन झालेल्या लखनौ विदयापीठातही ते वनस्पतिविज्ञानाचे विभागप्रमुख होते. पुरावनस्पतिविज्ञानाच्या अभ्यासासाठी भूविज्ञानाचे ज्ञान आवश्यक असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी लखनौ विदयापीठात भूविज्ञान विभाग स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले (१९४३). याच विदयापीठाच्या विज्ञानशाखेचे ते कित्येक वर्षे अधिष्ठाता होते. सदर विदयापीठात त्यांनी वनस्पतींच्या जीवाश्मांचा मोठा संग्रह केला होता.

इंडियन सायन्स काँगेसच्या वनस्पतिविज्ञान विभागाचे १९२१ व १९३८ ह्या वर्षी व १९२६ साली भूविज्ञान विभागाचे ते अध्यक्ष होते. पॅरिस येथे १९३५ साली झालेल्या नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या तृतीय दशवार्षिक समारंभासाठी आपल्या देशाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनाच पाठविण्यात आले होते. १९३६ साली लंडनच्या रॉयल सोसायटीचे अधिछात्र होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. १९३७-३८ मध्ये ते नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सचे अध्यक्ष होते व १९४० साली इंडियन सायन्स काँगेसचे अध्यक्ष झाले. नॅशनल इन्स्टिटयुट ऑफ सायन्सचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजाविली. बर्कले व सी. आर्. रेड्डी पारितोषिकांचे ते मानकरी ठरले (१९४७). १९५० साली होणाऱ्या आंतरराष्ट्रीय वनस्पतिविज्ञान परिषदेकरिता त्यांची सन्माननीय अध्यक्ष म्हणून निवड झाली होती परंतु सदर परिषद होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.

सहानी यांनी वनस्पतिविज्ञानाच्या अनेक शाखांत बहुमोल संशोधन केले. ⇨ पेंटोझायली या नावाचा एक नवीन व विलुप्त प्रकटबीज वनस्पतींपैकी जीवाश्म वनस्पतींचा गट त्यांनी शोधून काढला. तृतीय कल्पातील ( सु. ६.५० कोटी ते १.२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील ) ॲझोला या ⇨ जलनेचाचा शोध व पूर्वपर्मियन युगातील ( सु. २७.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील ) झायगॉप्टेरिस प्रायमॅरिया या वृक्षी नेचासंबंधीची काही महत्त्वाची माहिती त्यांनीच करून दिली इंटॅप्टेरिसझा. प्रायमॅरिया यांच्या पानांच्या देठांचे सारखेपणही त्यांनी दाखवून दिले. भारतातील विविध भागांतील वनस्पतींवर त्यांनी अपूर्व संशोधनकार्य केले. त्यांनी दक्षिणेच्या पठाराचा इतिहास, हिमालयाचा इतिहास व गोंडवनासंबंधीचा इतिहास उत्खननाव्दारे शोधला. पुरावनस्पतिविज्ञानास वाहिलेले पॅलिओबॉटनी नावाचे मासिकपत्र त्यांनी १९३९ साली सुरू केले. प्राचीन भारतातील नाणी पाडण्याच्या पद्धतींविषयीही त्यांनी गंथ लिहिला.

पेंटोझायलॉन सहानीआय, सहानिया निपॅनिएन्सिस, लायकोपोडाइट्स सहानीआय, ऱ्हॅकोप्टेरिस सहानीआय, क्लॅडोफ्लेबिस सहानीआय इ. अनेक जीवाश्मांच्या शास्त्रीय नावांत त्यांच्या नावाचा अंतर्भाव करून पुरावनस्पतिविज्ञांनी त्यांचा उचित गौरव केला आहे.

अखेरच्या दहा वर्षांच्या काळात पुरावनस्पतिविज्ञानाचा अभ्यास करणारी संस्था स्थापन करण्यासाठी सहानी यांनी भरपूर प्रयत्न केले. या कामी त्यांच्या पत्नीने त्यांना खूप मदत केली. ३ एप्रिल १९४९ रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या संस्थेचा पाया घातला. या संस्थेत जगाच्या विविध खंडांतून गोळा केलेल्या वनस्पती जीवाश्मांचा संग्रह आहे. पुढे या संस्थेचे नामकरण ‘ बिरबल सहानी इन्स्टिटयुट ऑफ पॅलिओबऑटनी ’ असे करण्यात आले. लखनौ येथे त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

कुलकर्णी, सतीश वि.