कोका :(इं. कोकेन प्लँट लॅ. एरिथ्रोझायलॉन कोका) कुल-एरिथ्रोझालेसी). या लहान वृक्षाचे मूलस्थान दक्षिण अमेरिका (पेरू व बोलाव्हिया) असून त्याची लागवड तेथे, तसेच चिली, जावा, श्रीलंका व थोडी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील प्लॉरिडा व कॅलिफोर्निया येथे केली जाते.

कोका : पाने, फुले व फळे असलेली फांदी

अँडीज पर्वताच्या पूर्व उतारावर समुद्रसपाटीपासून ४६५–१,८६० मी. पर्यंतच्या उंचीवरही लागवड केली आहे.भारतात तमिळनाडू, म्हैसूर, बंगाल व रांची येथे लागवडीचे प्रयोग करण्यात आले, परंतु व्यापारी दृष्ट्या फायदेशीर ठरले नाहीत सध्या बागेत शोभेकरिता हा वृक्ष लावलेला आढळतो. दमट व गरम हवेत तो चांगला वाढतो जंगली अवस्थेत सु.२·५–५·५ मी. पर्यंत उंची आढळते, परंतु लागवडीत २ मी. पेक्षा जास्त वाढू देत नाहीत. फांद्या बारीक, सरळ व तांबूस असून टोकाला लहान, साधी, हिरवीगार, पातळ, दीर्घवृत्ताकृती व केसाळ पाने येतात. फुले लहान व पिवळट पांढरी असून ती गतसालच्या फांदीच्या भागावर झुबक्यांनी येतात किंजदले तीन असून किंजपुटात तीन कप्पे असतात [→ फूल]. फळे लाल आणि अश्मगर्भी (आठळीयुक्त) असून बी एकच असते.

याची लागवड बियांपासून व सु. १९०–२०० सेंमी. पाऊस वर्षभर पडणाऱ्या भागात (उदा., श्रीलंकेत) करतात ताजे बी सावलीत पेरून त्यांची रोपे १·५ X१·७५ मी. अंतरावर लावतात. पुढे सावलीची जरूरी नसते. साधारणतः झाडे अडीच वर्षांची झाल्यावर (कधी चार वर्षांनंतर) पाने खुडून गोळा करतात वर्षांतून तीनदा खुडतात व नंतर गरम कपड्यावर पण सावलीत वाळवतात, म्हणजे त्यांना सुरकुत्या न पडता हिरवेपणा कायम राहतो. वाळलेली पाने पिशवीत भरून किंवा गठ्ठे करून निर्यात करतात.

पानांत ‘कोकेन’ हे ⇨ अल्कलॉइड असते बिया व सालीतही हे सापडते. पानांना ‘हुआमको कोका’ हे व्यापारी नाव आहे. कोकेनसाठीच या झाडाची लागवड करतात. भारतातील कोकाच्या पानांपासून ०·४-०·८ टक्के कोकेन मिळते कोकेन काढून घेतल्यावर पानांचा उपयोग ‘कोला’ या पेयांसाठी करतात. कोका या वर वार्णिलेल्या जातीशिवाय आणखी त्याच वंशातील एक-दोन जाती (ट्रुक्सिला कोका व पेरूव्हियन कोका) कोकेनकरिता उपयोगात आहेत. पानांचा उपयोग चहाप्रमाणे उत्तेजक पेय बनविण्यास करतात. ती कडू व विशिष्ट स्वादयुक्त असतात. फार थोड्या प्रमाणात कोकेन पचनशक्ती आणि तंत्रिका तंत्रास (मज्जासंस्थेस) पौष्टिक म्हणून देतात.

पहा : कोकेन.

जमदाडे, ज. वि.