पारिजातक : ( हिं. हरसिंधर गु. जयपार्वती क. हरसिंग, पारिजात सं. प्राजक्त, पारिजातक , खरपत्रक इं. नाइट जॅस्मिन लॅ. निक्टँथस आर्बर – ट्रिस्टिस कुल – ओलीएसी ) . सु. १० मी. पर्यंत उंचीच्या या चिवट मोठ्या झुडपाचे किंवा लहान वृक्षाचे मूलस्थान भारत असून उपहिमालयी प्रदेश ( चिनाब ते नेपाळमध्ये १,५०० मी. पर्यंत ), छोटा नागपूर, राजस्थान, मध्य प्रदेश येथे व दक्षिणेस गोदावरीपर्यंत त्याचा प्रसार आहे. सातपुड्यातील ( खानदेश ) रुक्ष जंगलातही तो आढळतो. तथापि त्याच्या सुवासिक व नाजूक फुलांकरीता तो सर्वत्र बागेत लावतात. पाने समोरासमोर व जात्यसम [ →पर्णविन्यास ], अंडाकृती, काहीशी दातेरी, वर खरबरीत व खाली लावदार असतात ती एप्रिल – मे मध्ये गळतात. फुले लहान , पांढरी, ३-७ च्या झुबक्यात ( त्रिपाद वल्लरी ) ऑगस्ट – डिसेंबरात येतात. पाकळ्या चार ते आठ, वर पांढऱ्या व सुट्या आणि खाली नारिंगी नळीत जुळलेल्या असतात. फुले सायंकाळी उमलतात  सकाळी फक्त पुष्पमुकुट गळून त्यांचा सडा पडतो. फळ ( बोंड ) गोलसर पण सपाट व चेपाल्यासारखे बिया १-२ व सपाट असतात. इतर सामान्य लक्षणे ⇨ओलीएसी   कुलात ( पारिजातक कुलात ) वर्णिल्याप्रमाणे  असतात. पुष्पमुकुटाच्या नारिंगी भागात ०.१% निक्टँथीन हे रंगद्रव्य असते. त्याचा उपयोग रेशीम रंगविण्यास पूर्वी होत असे. केशर, हळद, नीळ व कात यांत मिसळून  ते वापरीत. फुलात डी-मॅनिटॉल, टॅनीन व ग्लुकोज असते.

पारिजातक : लखनौ येथील नॅशनल बोटॅनिकल गार्डनमध्ये केलेल्या पारिजातकाच्या मोठ्या लागवडीत आढळून आलेले काही नवीन नैसर्गिक प्रकार क्रमांक वरून खाली : (१) कर्णफुल, (२) चक्र , (३) सीया शृंगार , (४) ध्रुव, (५) तारा.

बियांपासून १२-१६%  फिकट, पिवळे भुरे, स्थिर सुगंधी तेल निघते. पानांमध्ये कॅरोटीन व अस्कॉर्बिक अम्ल असते . लाकूड भुरे, मध्यम कठीण छपराकारीता उपयोग करतात. कोवळ्या फांद्यांच्या टोपल्या बनवितात. साल कातडी कमाविण्यास आणि पाने लाकडाला व हस्तिदंताला झिलई आणण्यास वापरतात . तान्ह्या मुलास पानांचा रस रेचक म्हणून देतात. ती पित्तशामक, कफोत्सारक ( कफ पाडून टाकणारी ) असून ताप व संधिवातावर गुणकारी असतात. हिंदू लोक याला ‘ स्वर्गीय वृक्ष ‘ मानतात फुले देवांच्या पुजेस पवित्र ठरली आहेत. विवाह प्रसंगीच्या मंगलाष्टकांत पारिजातकाचा उल्लेख आहे. तसेच महाभारतातही त्याचा उल्लेख आहे. देव-दानवांनी केलेल्या  समुद्रमंथनातून मिळालेल्या चौदा रत्नांपैकी हे एक आहे.

                                                           जमदाडे, ज. वि.

पारिजातकाची झाडे त्यांच्या वसतिस्थानी घनदाट वाढून शुष्क टेकड्यांच्या बाजू आणि खडकाळ जमीन झाकून टाकतात. किंचित सावलीही मानवते. बकऱ्या, पाला खात नसल्याने झाडीचे रान बनते .

झाडाची लागवड बियांपासून रोपे करून अथवा छाट किंवा दाबाच्या कलामांनी करतात.

                             चौधरी, रा. मो.

पारिजाताकावर पडणारा ‘भुरी’ हा एकच महत्त्वाचा रोग आहे. तो ओइडियम  वंशाच्या कवकामुळे ( बुराशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे) होतो. रोगाचा प्रसार हवेतून होतो. या रोगामुळे पानांच्या वरच्या बाजूवर राखेसारखी पांढरी कवकाची वाढ आढळते. त्यामुळे पाने गळतात. ३०० मेशची गंधकाची भुकटी पिस्कारल्याने या रोगास आळा बसतो. ( चित्रपत्र ५७).

रुईकर, स. के.

पारिजातक : फुलोरे व फळे यांसह फांदी