गोटलीप हाबरलांटहाबरलांट, गोटलीप : (२८ नोव्हेंबर १८५४–३० जानेवारी १९४५). ऑस्ट्रियन वनस्पतिशास्त्रज्ञ. शरीरक्रियात्मक दृष्टीने वनस्पती शरीररचनाशास्त्राचा विकास करणारे व १९२१ मध्ये वनस्पतीं-तील ऊतक-संवर्धनावर संशोधन करणारे हाबरलांट हे पहिलेशास्त्रज्ञ आहेत.

 

हाबरलांट यांचा जन्म उंगारिश-आल्टन्बर्ग (हंगेरी) येथे झाला.त्यांना व्हिएन्ना विद्यापीठाची पीएच्.डी. ही पदवी १८७६ मध्ये मिळाली. १८७७ मध्ये ट्यूबिंगेन विद्यापीठात झीमोन श्व्हेंडेनर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करीत असताना हाबरलांट यांनी १८७८ मध्येव्हिएन्ना विद्यापीठात सन्मान्य अध्यापकाचे काम केले. त्यानंतर त्यांनीग्रात्स येथील टेक्निकल ॲकॅडेमीमध्ये वनस्पतिविज्ञानाचे प्राध्यापकम्हणून काम केले (१८८०–१९०९). १८९१-९२ मध्ये त्यांनी जावा (बिटेनझोर्ग) येथील शास्त्रीय उद्यानास भेट दिली व त्याचा वृत्तांत Eine Botaniche Tropenriese (१८९३, तिसरी आवृत्ती १९२६) या ग्रंथातप्रसिद्ध केला. त्यानंतर ते बर्लिन विद्यापीठात वनस्पती शरीरक्रियाविज्ञान या विषयाचे प्राध्यापक (१९०९–२३) व नंतर तेथेच त्यांनी स्थापलेल्या क्रियावैज्ञानिक संस्थेच्या संचालकपदी (१९१० पासून) होते. त्यांनी १९०२ मध्ये वनस्पतींच्या ऊतकांचे स्वतंत्रपणे संवर्धन करण्याची कल्पना काढली, परंतु तत्संबंधीचे प्रयोग अयशस्वी झाले. वनस्पतींच्या जखमांशी संबंध असणाऱ्या हॉर्मोनांचे अस्तित्व प्रायोगिक रीत्या प्रथमच त्यांनी सिद्ध केले (१९१३ व१९२१). वनस्पतींतील प्रकाशानुवर्तन व गुरुत्वानुवर्तन यांचे स्पष्टीकरण देण्यास संतुलनाश्म (स्टॅटोलिथ) सिद्धांत त्यांनी मांडला [→ वनस्पतींचे चलनवलन]. त्यांनी शरीररचनाशास्त्राचा (शारीराचा) शरीरक्रियाविज्ञानाशी जोडलेल्या निकट संबंधामुळे त्यानंतरच्या संशोधनकार्यावर व अध्यापनावर बराच परिणाम झाला. त्यांनी लिहिलेल्या Physiologische Pflanzen-anatomie(१८८४ तिसरी आवृत्ती १९२६, इं. शी. ‘फिजिऑलॉजिकल प्लँट ॲनॉटॉमी’) या उत्कृष्ट ग्रंथात ऊतकांच्या कार्यांच्या संदर्भात (यांत्रिक, अभिशोषण, प्रकाशसंश्लेषण इ.) वर्गीकरण करण्यात आलेले आहे. त्यांची पद्धती इतर वनस्पतिवैज्ञानिकांनी मान्य केली नाही. हाबरलांट यांनी संरचना, कार्य व पर्यावरण यांच्यामधील संबंधाचे जे विश्लेषण केले, ते विविध अधिवासांतील वनस्पतींचे अनुकूलन याच्या अभ्यासासाठी उपयोगी आहे.

 

हाबरलांट यांचे बर्लिन-विल्मर्सडॉर्फ येथे निधन झाले.

जमदाडे, ज. वि.