कंगुणी : (मालकांगोणी, करड कांगोणी हिं. मालकाकनी गु. वेलो क. कंगोडी सं. ज्योतिष्मति, स्वर्णलता इं. ब्‍लॅक ऑइल ट्री, इंटलेक्ट ट्री लॅ. सीलॅस्ट्रस पॅनिक्युलॅटा कुल-सीलॅस्ट्रेसी). सु. १८ मी. पर्यंत वाढणाऱ्या या मोठ्या पानझडी वेलीचा प्रसार हिमालयाच्या खालच्या पट्ट्यामध्ये झेलमपासून पूर्वेस १,८६० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात आणि महाराष्ट्र, दक्षिण गुजरात, मध्य प्रदेश, तमिळनाडू इ. राज्यांच्या डोंगराळ भागात सर्वत्र आहे. श्रीलंका, ब्रह्मदेश, मलाया, फिलिपीन्स ह्या देशांतही ती आढळते. फांद्या खरबरीत, तांबूस, वल्करंध्रयुक्त (छिद्रयुक्त साल), पाने साधी, एकांतरित (एकाआड एक), अंडाकृती, स्थूलदंतुर, वरच्या बाजूस चकचकीत फुले लहान, पिवळसर हिरवी, सामान्यतः एकलिंगी असून नोव्हेंबर – फेब्रुवारीत लोंबत्या परिमंजिरीत येतात [→ फूल]. बोंड गर्द पिवळे व गोलसर असून त्यात लाल अध्यावरणाने (बीजाच्या उपांगाने) वेढलेल्या एक — सहा बिया असतात.

कंगुणी : (१) फांदी (२) फुलोरा (परिमंजिरी) (३) फूल (उभा छेद) अ-संदल, आ-बिंब, इ-प्रदल,ई-केसरदल,उ-किंजल (४) तडकलेले फळ.

साल गर्भपातक बी उष्ण, कडू, सारक, वांतिकारक, उत्तेजक व वाजीकर (कोमोत्तेजक) असून संधिवात, कुष्ठ, संधिवायू (गाऊट), ज्वर, पक्षाघात यांमध्ये अंतर्बाह्य उपचारावर उपयुक्त. बियांचे तेल ‘कंगुणी तेल’ (ब्‍लॅक ऑइल) बाहेरून लावण्यास चांगले. बेंझोइन, कंगुणी तेल, लवंगा, जायफळ व जायपत्री यांच्या मिश्रणाच्या ऊर्ध्वपातनाने (वाफ थंड केल्याने ‘ओलियम नायग्रम’ हा पदार्थ मिळतो, तो बेरीबेरी रोगावर गुणकारी असतो, तसेच तो स्वेदकारी (घाम आणणारा) व तीव्र उत्तेजक असतो. बियांचे पोटीस व्रणावर लावतात. बुद्धीला चालना देण्यास व स्मरणशक्ती अधिक तीव्र करण्यास बी उपयुक्त असते. कोकणात पानांचा रस अफूच्या अतिसेवनावर उतारा म्हणून देतात. पानांचा चारा गुरांना घालतात.

जमदाडे, ज. वि.