गिंसेंग : (जिंसेंग कुल — ॲरेलिएसी). फुलझाडांपैकी (आवृत्तबीज, द्विदलिकित) एका वंशाचे सामान्य इंग्रजी नाव (ग्रीक नाव व आता वंशनाम पॅनॅक्स ). या वंशात सु. सात (किंवा आठ) जातींचा समावेश असून अमेरिकन गिंसेंग (पॅनॅक्स क्विक्वेफोलियम ) व चिनी गिंसेंग (पॅ. शिसेंग ) या दोन जातींशिवाय इतर लागवडीच्या दृष्टीने महत्त्वाच्या नाहीत. सर्व जातींचा प्रसार उ. गोलार्धाच्या समशीतोष्ण कटिबंधात (पू. आशियात व उ. अमेरिकेत) आहे. या जातींचे ⇨ॲरेलियाशी साम्य आहे. गिंसेंग भारतात आढळत नाही, परंतु काही जातींची (पॅ. कॉक्लिएटम व पॅ. फ्रुटिकोसम ) बागेत शोभेकरिता लागवड करतात. गिंसेंगच्या मुळ्या भारतात आयात होत असाव्या.

चिनी गिंसेंग मूळची पू. आशियातील असून उ. चीन, कोरिया व जपान या प्रदेशांत लागवडीत आहे. मर्यादित पुरवठ्यामुळे हल्ली अमेरिकेतून अमेरिकन गिंसेंगची आयात करतात. ही (अमेरिकन गिंसेंग) १५—४५ सेमी. उंच ⇨ ओषधी  असून हिच्या खोडावर ३—५ दली, तीन संयुक्त, हस्ताकृती पाने येतात व टोकास एक चवरीसारखा हिरवट पांढऱ्या ६—२० फुलांचा फुलोरा येतो. अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळ लाल असते. जमिनीत अर्धवट गोलाकार, चातीसारखी, शाखायुक्त, पिवळट पांढरी (१२ x २·५ सेंमी.) मांसल मुळे असतात. [→ अंबेलेलीझ]

मुळे सुगंधी, गोडसर, बुळबुळीत व किंचित कडवट (ज्येष्ठमधाप्रमाणे) असतात. पाच-सहा वर्षे वयाच्या झाडाची मुळे काढून, धुऊन सुकवितात व नंतर निर्यात करतात. मूळ उत्तेजक, दीपक (भूक वाढविणारे), शामक, आरोग्य पुनःस्थापक, वायुनाशी, पौष्टिक, कफनाशक व ज्वरनाशक असून मुखशुद्धीकरिता वापरतात. ते रक्तदाब नियंत्रित करते. पॅनॅक्स फ्रुटिकोसम  या जातीत स्तंभक (आकुंचन करणारे) व ज्वरनाशक गुण आहेत तसेच तिची पाने व मुळे यांचा काढा मूत्रल (लघवी साफ करणारा) असून अश्मरीवर (मुतखड्यावर) उपयुक्त आहे. या जातीचा अंतर्भाव हल्ली पॉलिसियाज  वंशात करतात.

जमदाडे, ज. वि.