काकमारी : (वातोळी हिं. जर्मिक गु. काकफल क. कक्कीसोप्पुगिड सं.गरफल, काकनाशिका इं. क्रो-फिश किलर, फिश-बेरी, लेवंट बेरी लॅ.ॲनामिटो कॉक्यूलस कुल-मेनिस्पर्मेसी). ही गुळवेलीसारखी मोठी वेल भारतात बहुतेक सर्वत्र दाट जंगलात आढळते. शिवाय श्रीलंका, मलाया इ. उष्णकटिबंधातील प्रदेशातही आढळते. साल राखी व उभ्या भेगांनी व्याप्त पाने थोडी, साधी, चिवट, मोठी, एकांतरित (एकाआड एक) अंडाकृती किंवा हृदयाकृती फुलोरा लांब परिमंजरी फुले लहान, अनेक, हिरवट, एकलिंगी, बिनपाकळ्यांची व भिन्न वेलीवर सप्टेंबर-ऑक्टोबरात येतात [→ फूल] . फळ अश्मगर्भी (आठळीयुक्त) गोलसर, गोलसर, काळे आणि किंजधरावर वाढलेले बी एकच. फळ कडवट व कफोत्सारक. फळाचा रस खरूज व चिघळलेल्या जखमांवर लावतात. बंगालमध्ये ताज्या पानांचा तपकिरीप्रमाणे तसेच तापावर उपयोग करतात. बियांच्या गराचे मलम डोक्यातील उवांवर, नायटे व तत्सम चर्मरोगांवर गुणकारी बियांत पिक्रोटॉक्सिन नावाचे विषारी द्रव्य असते. फळे व बिया मत्स्यविष म्हणून वापरतात. त्यावरुन इंग्रजी नावे पडली आहेत. ०.४-०.६ ग्रॅ. इतके विषारी द्रव्य कुत्र्याला ठार मारण्यास पुरते.

पहा : महालता मेनिस्पर्मेसी वनस्पति, विषारी.

पाटील, शा. दा.