गोकर्ण —२ : (सुपली, गोकर्णी हिं. अपराजिता, कालिना गु. कोयला, खीसली, गरणी क. गिरिकर्णी बळ्ळी सं. गिरिकर्णीका अपराजिता, गोकर्णिका इं. बटरफ्लाय पी. लॅ. क्लिटोरिया टर्नेटिया  कुल-लेग्युमिनोजी, पॅपिलिऑनेटी). ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) शिंबावंत (शेंगा येणारी) वेल उष्ण कटिबंधात सर्वत्र आढळते. अनेक वेळा कुंपणावर वाढलेली व बागेत शोभेकरिता लावलेली दिसते. पाने संयुक्त, पिसासारखी आणि दले ५—७ फुले मोठी पतंगरूप [→ अगस्ता], एकेकटी, पानांच्या बगलेत जून ते जानेवारीमध्ये येतात. मोठी पाकळी (ध्वजक) गर्द जांभळी (निळी किंवा पांढरी) शिंबा गवारीप्रमाणे व बिया ५—१०, गोलसर लांब व साधारण चपट्या असतात. फुले गाईच्या कानासारखी दिसल्यामुळे ‘गोकर्णी’ नाव पडले आहे. मध्ये शेंदरी पण पांढरी फुले असलेला एक प्रकार असतो. शिवाय दुहेरी किंवा तिहेरी ध्वजक पाकळीचा प्रकार बागेत लावतात. एका प्रकारात पाचही पाकळ्या ध्वजक प्रकारच्याच आहेत. इतर शारीरिक लक्षणे शिंबावंत कुलात [→ लेग्युमिनोजी] वर्णिल्याप्रमाणे असतात. 

मूळ शीत, कडू, सारक, मूत्रल (लघवी साफ करणारे), कृमिनाशक, नेत्ररोग परिहारक व हस्तिपादरोगनाशक असते. पांढऱ्या गोकर्णीच्या मुळांचा रस अर्धशिशीवर नाकपुडीत सोडल्यास व्यथा कमी होते थंड दुधाबरोबर घेतल्यास हट्टी व जुनाट खोकल्यावर तो गुणकारी असतो. पानांचा फांट (थंड पाण्यात भिजवून काढलेला अर्क) जखमांवर लावतात. भाजलेल्या बियांचे चूर्ण दृष्टिदौर्बल्य, खवखवणारा घसा व कातडीच्या रोगांवर उपयुक्त असते.

परांडेकर, शं. आ.

ही वेल कोणत्याही प्रकारच्या जमिनीत वाढते. मृग नक्षत्राच्या सुमारास जमीन चांगली खणून खतवून बी पेरतात. बी उगवून आल्यानंतर ६-७ आठवड्यांनी वेलीला फुले येऊ लागतात. ही वेल लहान कमानी, छत्र्या वगैरेंवर चढवितात.  

चौधरी, रा. मो.

गोकर्ण : (१) कळ्या, फुले व शिंबा यांसह फांदी, (२) कळी, (३) छद, (४) फूल, (५) ध्वजक पाकळी, (६) बाजूच्या (पंख) पाकळ्या, (७) नौकातल पाकळ्या, (८) केसरदले, (९) किंजमंडल, (१०) पाच ध्वजक पाकळ्यांचे फूल.