डार्विन, सर फ्रान्सिस : (१६ ऑगस्ट १८४८ ते १९ सप्टेंबर १९२५). इंग्लिश वनस्पतिवैज्ञानिक जन्मस्थान–डाऊन, केंट (इंग्लंड). चार्ल्‌स डार्विन [⟶ डार्विन, चार्ल्‌स रॉबर्ट] यांचे हे पुत्र. सेंट जॉर्ज हॉस्पिटल, लंडन येथून डॉक्टर झाले, तथापि त्यांनी वैद्यक व्यवसाय केला नाही. डाऊन येथे आपल्या वडलांना मदतनीस म्हणून त्यांच्या लेखनात (मूव्हमेंट इन प्लँट्स, १८८०) साहाय्य केल्यावर त्यांची केंब्रिज येथे वनस्पतिविज्ञानाचे प्रपाठक म्हणून नेमणूक झाली तत्पूर्वी त्यांनी तेथूनच (ट्रिनिटी कॉलेज) त्या विषयाची पदवी संपादन केली होती. ते आपल्या वडलांचे चरित्रलेखक असून फौंडेशन्स ऑफ द ओरिजिन ऑफ स्पिशीज या नावाने १९०९ मध्ये त्यानी पूर्वी (१८८२, १८४४) वडलांनी लिहिलेल्या दोन निबंधांना प्रसिद्धी दिली. त्यांचे मुख्य संशोधनक्षेत्र वनस्पतींतील क्रियाविज्ञान असून १८९४ मध्ये ई. हॅमिल्टन ॲक्टन यांच्या सहकार्याने त्यांनी प्रॅक्टिकल प्लँट फिजिऑलॉजी  हा ग्रंथ प्रसिद्ध केला. १९१३ मध्ये त्यांना सरदारकी मिळाली होती. वडलांच्या मृत्यूनंतर त्यांनी केंब्रिजमध्ये सिडनी व्हाइन्स यांनी सुरू केलेल्या वानस्पतिक शिक्षणाच्या पुनरुज्जीवनात मदत केली. हवेतील आर्द्रता व वनस्पतींचा बाष्पोच्छ्‌वास यांचे संबंध शोधून काढून त्यांनी असे सिद्ध केले की, ⇨ अपित्वचेच्या कोशिका (पेशी) आणि संरक्षक कोशिका या दोन्हींत बदल होण्यानेच त्वग्रंध्रांत (पानांवरील बाह्य त्वचेतील छिद्रांत) बदल होतात पोरोमीटर (छिद्रमापक) हे उपकरण त्यांनी शोधून काढले, तसेच अनुवर्तनी (वाढीच्या रूपाने उत्तेजकाला वनस्पतींच्या अवयवांनी दिलेला प्रतिसाद) चलनवलन व वनस्पतींच्या अवयवांची सरळ रेषेत वाढण्याची प्रवृत्ती यांसंबंधी माहिती प्रसिद्ध केली.

पहा : वनस्पतींचे चलनवलन.

 जमदाडे, ज. वि.