चारोळी : (१) फुलोऱ्यासह फांदी, (२) फूल, (३) पाकळ्या काढलेले फूल, (४) किंजपुट, (५) किंजपुटाचा उभा छेद, (६) बी (चारोळी).

चारोळी : (चार, प्यालचार हिं. चिरोंजी, पियाल गु. चारोली क. मुरुकळ्ळी सं. राजादनू, स्नेहबीज लॅ. बूखनॅनिया लँझान कुल- ॲनाकार्डिएसी). सु. १२ ते १५ मी. उंचीच्या व १·२ मी. घेराच्या या मध्यम पानझडी वृक्षाचा प्रसार भारतात रुक्ष व विरळ जंगलांत सर्वत्र (वायव्य भारतात सतलज ते नेपाळपर्यंत सु. ९०० मी. उंचीपर्यंत) असून शिवाय तो ब्रह्मदेश, कंबोडिया, इंडोचायना व सयाम येथेही आढळतो. साल जाड, गडद करडी, भेगाळ व खरबरीत असते ती सुसरीच्या खवल्यांप्रमाणे दिसते. पाने साधी, एकाआड एक, मोठी, काहीशी लांबट, टोकाला गोलसर, चिवट व अखंड असून देठ पसरट, बळकट व लोमश (लवदार) असतो. फुले अनेक, हिरवट पांढरी, लहान, अग्रस्थ (टोकाकडील) किंवा कक्षास्थ (पानाच्या बगलेतील), लोकरी किंवा मखमली व बहुशाखित परिमंजरीवर जानेवारी-मार्चमध्ये येतात. छदे लहान व लवकर गळणारी संदले केसाळ, पाच व सतत राहणारी प्रदले (पाकळ्या) पाच, बाहेर वळलेल्या बिंब पाच दातांचे मांसल व गोल केसरदले दहा, पाकळ्यांपेक्षा लहान, पाच किंजदलांपैकी एकच कार्यक्षम, केसाळ व त्रिकोणी इतर चार तंतूंसारखी किंजपुट ऊर्ध्वस्थ व बीजक एक [⟶फूल]. इतर शारीरिक लक्षणे ⇨ॲनाकार्डिएसी  अथवा आम्रकुलात वर्णिल्याप्रमाणे. फळ ०·८-१·२ सेंमी., अश्मगर्भी (आठळीयुक्त), गुळगुळीत, काळे, लहान, तिरपे व मसुरासारखे असून आठळी कठीण व दोन शकलांची असते. फळे मार्च, एप्रिल व मेमध्ये येतात. बियांना ‘चारोळ्या’ म्हणतात. मेवा मिठाईत चारोळ्यांचा उपयोग करतात त्यामुळे मिठाईची चव वाढते. पाला जनावरांना चारतात. डिंक अतिसारावर उपयुक्त असतो. बियांचे तेल थंड असून बदामाच्या तेलाप्रमाणे औषधात वापरतात. त्वचारोगांवर मलमातून लावतात. लाकूड हलके मध्यम प्रतीचे कठीण असून पेट्या, खाटा, जू, खांब, दरवाजे इत्यादींस उपयुक्त असते त्यापासून आगपेट्या व कोळसा बनवितात. साल कातडी कमाविण्यास वापरतात कारण तीत तेरा टक्के टॅनीन असते. ही उपयुक्त झाडे उजाड टेकड्यांवर लावण्यास चांगली असतात. बियांत ६१·८% तेल, १२·१% स्टार्च, ३१·६% प्रथिन, ५% साखर इ. द्रव्ये असतात. बियांतील तेल फिकट पिवळे, मंद सुवासिक व गोड असून ते बदामाचे तेल आणि ऑलिव्ह तेलाऐवजी वापरतात. झाडाला जखम झाल्यास सालीतून पाझरणारा डिंक अतिसारावर वापरतात.

जमदाडे, ज. वि.