पोडोकार्प : (लॅ. पोडोकार्पस कुल-पोडोकार्पसी). प्रकटबीज वनस्पतींपैकी [→वनस्पति, प्रकटबीज उपविभाग] ⇨कॉनिफेरेलीझ गणातील (शंकुमंत गणातील) दुसऱ्या मोठ्यात मोठ्या वंशाचे इंग्रजी नाव. ह्या वंशाचा अंतर्भाव कॉर्निफेरेलिझमध्ये काही शास्त्रज्ञ करतात तथापि ⇨ टॅक्सेलीझमध्ये कित्येकांनी केलेला आढळतो. यामध्ये सु. ७० जाती (जे. सी. विलिस यांच्या मते १००) असून या सर्व सदापर्णी रेझीनयुक्त वृक्ष  किंवा क्षुपे (झुडपे) आहेत व त्यांचा प्रसार मुख्यतः दक्षिण गोलार्धात, उष्ण कटिबंधीय ते उष्ण समशीतोष्ण प्रदेशांत (विशेषतः द. आफ्रिकेत व ऑस्ट्रेलियात) आणि क्वचित विषुववृत्ताच्या उत्तरेस (हिमालय व जपान येथे) आहे. यांची अधिकात अधिक उंची ७५ मी.पर्यंत जाते. पाने साधी, एकांतरित (एकाआड एक) किंवा संमुख (समोरासमोर), लहान देठाची किंवा बिनदेठाची, अखंड, रेषाकृती ते दीर्घवृत्ताकृती, विविध आकाराची व बहुधा सपाट व समांतर शिरांची असतात. खरे शंकू नसतात. एकलिंगी प्रजोत्पादक अवयव एकाच किंवा स्वतंत्र झाडांवर, पानांच्या बगलेत किंवा शाखांच्या शेंड्याजवळ येतात. फुलोरे छदयुक्त फुले एकेकटी किंवा नतकणिशात येतात [→पुष्पबंध]. पुं-पुष्पे कणिशाच्या दांड्यावर सर्पिल प्रकारे येतात. परागकोशात दोन कप्पे व पराग सपक्ष (पंखयुक्त) असतात. बहुतेक जातींत एका लहान उपशाखेवर तळाशी अनेक अंशतः जुळलेली वंध्य छदे [→ फूल] असून टोकाजवळच्या छदांच्या बगलेत विशिष्ट खवल्याने वेढलेली एक किंवा दोन अधोमुख बीजके असतात. हे बीजक पक्व होताना तळास सर्व छदे व उपशाखा फुगून मांसल व जांभळट बनते [→टॅक्सेलीझ]  व त्यावरून वर दिलेली नावे पडली आहेत तेच ‘अध्यावरण’ (बीजाबाहेरची वाढ) होय.

बीजावरण बाहेरून नरम व आतून कठीण होते. बीज लहान, गोलसर लांबट असून दलिका दोन असतात. नवीन लागवड कलमे लावून करतात.

पोडोकार्प (पोडोकार्पस मॅक्रोफिला) : (१) पाने व बीजांसह शाखा, (२) बीज, (३) अध्यावरण.

पोडोकार्पस इंब्रिकेटस हा ब्रह्मदेशातील वृक्ष सु. २४मी. उंच वाढतो त्यापासून उत्तम इमारती लाकूड मिळते. पो. नेरिफोलिया (हिं. हालिस) व त्याचा प्रकार ब्रेव्हिफोलियम हिमालयात, खासी टेकड्यांत व पूर्व भारतात इतरत्र आढळतात. पो. नेरिफोलिया हा सु. ४०मी. उंच असून त्याची साल तपकिरी व पाने साधी व चिवट असतात. पो. ब्रेव्हिफोलियमची पाने लहान असतात त्यांचे लाकूड फिकट रंगाचे व सुतारकामास चांगले असते त्याचा उपयोग वल्ही, नावेचे भाग, साधे सजावटी सामान, शिड्या, चहाची खोकी, फळ्या इत्यादींसाठी करतात. पो. नेरिफोलियाच्या पानांचा काढा संधिवात व सांधेदुखीवर देतात. पो. वालिचिनस (पो. लॅटिफोलिया) आसाम ते ब्रह्मदेशातून मलेशियापर्यंत आढळतो. भारताच्या द्वीपकल्पीय (दक्षिण) भागात आढळणारा हा एकमेव सदापर्णी व सु. २४मी. उंची व २मी. घेर असलेला तृतीय कल्पातील (सु. २कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) शंकुमंत वृक्ष आहे. याचे लाकूड करडे, सुगंधी व मध्यम कठीण असते हा बागेत शोभेकरिताही लावतात. याचे लाकूड पो. नेरिफोलियाप्रमाणे उपयोगात आहे. पो. टोतारा (न्यूझीलंडचा ‘टोतारा’) व पो. फाल्कॅटा (दक्षिण आफ्रिकेतील ‘यलोवुड’) यांसारख्या अनेक जाती आर्थिक दृष्ट्याफार महत्त्वाच्या ठरल्या आहेत, कारण त्यांपासून इमारती लाकूड मिळते. या वृक्षांच्या इंग्रजी व लॅटिन नावाचे ‘पादफल’ असे संस्कृत रूपांतर केलेले आढळते.

  जमदाडे, ज. वि.