गजकर्णी : (गजकरण हिं. जोईपाणी, पालकजुही क. नागमळ्ळिगे, दोड्डापत्तिके सं. युथिकपर्णी लॅ.ऱ्हिनॅकँथस हिर्स्युटा कुल-ॲकँथेसी). हे लहान क्षुप (झुडूप) डोंगराळ भागात ०·९–१·५ मी. उंच वाढते श्रीलंका, जावा, मॅलॅगॅसी (मादागास्कर), आफ्रिका व भारत (महाबळेश्वर, खंडाळा, बेळगाव) येथे याचा प्रसार आहे. प.व द. भारतात लागवड केली जाते. पाने साधी, संमुख (समोरासमोर), लहान, भाल्यासारखी फुले एकाकी (एक एकटी) किंवा २-३ च्या झुबक्याने फांदीच्या टोकास येतात. रंग पांढरा व सामान्य संरचना ⇨ॲकँथेसी  कुलात वर्णन केल्याप्रमाणे. फळ (बोंड) लहान टोकदार व केसाळ असते. पाने, मुळे व बी यांचा उपयोग गजकर्ण, नायटा इ. त्वचारोगांवर होतो. पान चुरगळून हुंगल्यास वास वाईट येतो व रुची तिखट असते. पाने मिठाबरोबर चुरगळून नायट्यावर चोळतात.   

पाटील, शा. दा.