व्हार्मिंग, युहानेस एउजिनिउस ब्यूलाऊ : (३ नोव्हेंबर १८४१–२ एप्रिल १९२४). डॅनिश वनस्पतीवैज्ञानिक. वनस्पतींच्या परिस्थितीविज्ञानाचे (इकॉलॉजीचे) ते जनक मानले जातात.

व्हार्मिंग यांचा जन्म उत्तर फ्रिझियन मॅनो बेटावर झाला. त्यांचे शिक्षण बॉन व कोपनहेगन विद्यापीठांत झाले. १८७१ मध्ये त्यांना कोपनहेगन विद्यापीठाची पीएच.डी. पदवी मिळाली. १८८४ मध्ये पश्चिम ग्रीनलंडचा प्रवास करून त्यांनी तेथील मूळ वनस्पतींच्या परिस्थितीवैज्ञानिक अनुकूलनाचा (परिस्थितीशी जुळवून घेण्याचा) अभ्यास केला.

व्हार्मिंग १८८५ मध्ये कोपनहेगन विद्यापीठात वनस्पतीविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून परत आले. तेथील शास्त्रीय वनस्पती-उद्यानाचे ते संचालकही होते (१८८५-९१). Om Gronland Vegetation (१८८८ ‘ऑन द व्हेजिटेशन ऑफ ग्रीनलंड ) हा त्यांचा पहिला ग्रंथ असून त्यामध्ये त्यांनी वनस्पतींच्या परिस्थितीसापेक्ष संरचनात्मक अनुकूलनांचे वर्णन केले आहे. ‘लागोआसांता, ए काँट्रिब्यूशन टू बायॉलॉजिकल फायटोजिऑग्राफी’ (इं. शी. १८९२) हा त्यांचा आणखी एक प्रसिद्ध ग्रंथ. या व इतर पुस्तकांतून त्यांनी समशीतोष्ण तसेच उष्णकटिबंधातील व आर्क्टिक प्रदेशातील वनश्रींचा संपूर्ण आढावा सादर केलेला आहे. त्यांचा वनस्पतींच्या परिस्थितिविज्ञानावरील महत्त्वपूर्ण ग्रंथ Plante sanfund (१८९५ ‘इकॉलॉजी ऑफ प्लँट्स’ १९०९) हा होय. परिस्थितिवैज्ञानिक घटकांच्या आंतरक्रियेतून उद्भवणाऱ्या समान परिस्थितीत वाढणार्याऑ वनस्पतिसमुदायांच्या लक्षणांचे वर्णन व वर्गीकरण करण्याचा प्रयत्न त्यांनी या ग्रंथात केलेला आहे.

कोपनहेगन येथे त्यांचे देहावसन झाले.

जमदाडे, ज. वि.