गुलाब : (सं. शतपत्रा, तरुणी, महाकुमारी क. मुळुसे वंतिगे इं.रोझ लॅ.रोझा  कुल-रोझेसी). ही सुप्रसिद्ध वनस्पती मनुष्यापेक्षाही प्राचीन असावी असे मानतात. यूरोप व अमेरिका या प्रदेशांतील सु. तीन कोटी वर्षांपूर्वीच्या खडकांत (मायोसीन कल्प) गुलाबाच्या पानांचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) आढळले आहेत. थीओफ्रॅस्टस (इ. स. पू. ३७०–२८५) व प्लिनी (इ. स. २३–७९) या अनुक्रमे ग्रीक व रोमन शास्त्रज्ञांच्या लिखाणांत गुलाबाचा उल्लेख आढळतो. रोमन काळात गुलाबाच्या फुलांना व्यापारी महत्त्व होते. पीस्तम हे शहर गुलाबाच्या लागवडीसाठी प्रसिद्ध होते. पीस्तम रोझ ही गुलाबाची जात (रोझा दमास्केना बायफेरा ) अद्यापही यूरोपीय बागांतून ‘रोझ ऑफ फोर सीझन्स’ या नावाने लावलेली आढळते. तथापि गुलाबाचे मूलस्थान विवाद्यच आहे. आशिया मायनर आणि पश्चिम चीन यांमधील भूप्रदेश गुलाबाचे मूलस्थान मानले जाते. अरबांनी इ. स. सातव्या शतकात इराण काबीज केल्यावर त्या देशातून आठव्या शतकात स्पेनमध्ये आणि दहाव्या शतकात भारतात गुलाब नेला असेही मानतात. भारतात गुलाबाची लागवड फार प्राचीन आहे. बऱ्याच गुलाबांच्या जाती जंगली अवस्थेत हिमालयाच्या परिसरात आढळून येतात. पुराणकालीन संस्कृत वाङ्‌मयात शतदला, लक्ष्मीपुष्पा, पाटल, तरुणीपुष्प, अतिमंजूला आणि सेमांतिका ही नावे त्याला दिलेली आढळतात. मोगल राजे गुलाबाचे फार चाहते होते. जहांगीर बादशहा बेगम नूरजहान यांच्या विवाह प्रसंगी (इ. स. १६१२) गुलाबाच्या अत्तराचा शोध लागला. पुढे मोगलांनी भारतात गुलाबाच्या बागा वाढविल्या. 

ऊर्ध्वपातनाने (वाफ थंड करून घटकद्रव्ये अलग करण्याच्या पद्धतीने) गुलाबाच्या फुलाचा अर्क काढण्याची कला इराणातून बसरामार्गे पहिल्यानेच भारतात कनोज शहरी आली. नंतर गाझीपूरमध्ये तिची मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली.

पौराणिक कथांत, संतचरित्रांत, अनेक प्राचीन लोकगीतात, काव्यांत आणि संगीतात गुलाबाचा उल्लेख आढळतो. स्थापत्य सजावटीतील नक्षीकाम, जडावाचे दागिने, कुंभारकाम, कापडावरील वेलबुट्टीचे भरतकाम इत्यादींत शोभेकरिता गुलाबाचे फूल नमुना म्हणून वापरतात. हारतुरे, आकर्षक पुष्परचना व शरीरसौंदर्य वर्धन करणे यांमध्येही गुलाबाला महत्त्वाचे स्थान आहे. भारतात पूजेसाठी व हारांसाठी गुलाबाला विशेष महत्त्व आहे. 

आ. १. (१) पान (२) फूल (३) फुलाचा उभा छेद : (अ) संदल, (आ) प्रदले, (इ) केसरदले, (ई) किंजदले (४) अनेक पाकळ्यांची फुले.

वनस्पती वर्णन व उपयोग : गुलाबाची झुडपे काटेरी, काटक, सदापर्णी किंवा पानझडी, ताठ, सरळ वाढणारी किंवा वेलीप्रमाणे पसरणारी अथवा आधारावर चढणारी असतात. त्यांची सोपपर्ण (उपपर्णयुक्त) पाने एकांतरित (एकाआड एक), बहुधा संयुक्त व पिसासारखी असून दले पाच ते नऊ (क्वचित एक ते अकरा), अंडाकृती, दातेरी व पातळ असतात. फुले एकेकटी किंवा गुच्छासारख्या फुलोऱ्यात आणि पानांच्या बगलेत व लहान फांद्यांच्या टोकास येत असून विविध रंगछटांची व लहानमोठ्या आकाराची, उभयलिंगी, सुगंधी अथवा भिन्न वासाची असतात. संदले व प्रदले (पाकळ्या) प्रत्येकी पाच व सुटी असतात (दुहेरी अथवा अधिक पाकळ्या असलेल्या फुलांत मूळ पाकळ्यांची संख्या पाचच असते. परंतु काही केसरदलांचे पाकळ्यांत रूपांतर झाल्यामुळे पाकळ्यांची संख्या वाढलेली दिसते). केसरदले अनेक व सुटी किंजदले अनेक, सुटी व कुंभाकृती पुष्पस्थलीत अंतर्भूत असतात [→ फूल]. पुष्पस्थलीचे रूपांतर घोसफळांत होऊन त्यांत अनेक बीजे (कृत्स्नफळे : शुष्क, एकबीजी व न तडकणारी फळे) असतात [→ फळ]. पक्षी घोसफळे खातात त्यामुळे बीजांचा प्रसार पक्ष्यांमार्फत होतो. फुलांचे सौंदर्य व नाजुकपणा, सुंगध, फळांचा रंग, पानांचा नाजुकपणा यांवर गुलाबाचे महत्त्व अवलंबून असते. तसेच चांगल्या गुलाबामध्ये पुढील गुणधर्म अपेक्षित असतात : झाडाची संरचना मजबूत असावी व वाढ चांगली असावी झाडामध्ये रोग प्रतिकारक शक्ती असावी फुलाचा रंग सातत्याने तेजस्वी व पाहणारास संतोष होईल असा असावा फूल कोमेजल्यावर देखील त्याचा रंग डोळ्यांना न आवडणारा असा नसावा फुलाला पुष्कळ पाकळ्या असाव्या, त्याला सुगंध असावा आणि ते देठावर ताठ असावे.

गुलाबाच्या पुष्कळ जातींच्या फुलांच्या पाकळ्या गुलकंद करण्यासाठी वापरतात. गुलाबाच्या फळांत क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आढळते. काही जातींची फळे आकर्षक रंगांची असल्यामुळे झाडांच्या शोभेत भर पडते. 

गुलाबाच्या फुलांत प्रकाराप्रमाणे सु. ०·०१५ ते ०·०४०६% अत्तर असते. अत्तर काढण्याकरिता वापरलेल्या पाण्यापैकी अत्तर काढून उरलेल्या पाण्याला ‘गुलाबपाणी’ म्हणतात. गुलाबपाणी तंबाखू, तपकीर तसेच सौम्य मद्ययुक्त पेये इत्यादींत घालतात. गुलाबकळ्या स्तंभक (आकुंचन करणाऱ्या), सारक, हृद्‌बल्य, शीतकर आणि शक्तिवर्धक असून फुले वाजीकर (कामोद्दीपक), सारक व क्षुधावर्धक असतात. गुलकंद थंड, सारक व पौष्टिक असतो. ज्वर, नेत्रदाह, दातदुखी, डोकेदुखी, अपचनामुळे उत्पन्न होणारे आतड्यातील व्रण इत्यादींवर फुले गुणकारी असतात. फळे आणि बी यांचे चूर्ण रक्तस्त्रावावर व जुलाबावर गुणकारी आहे. चहा (वाळलेली पाने) सुगंधित करण्यासाठीही गुलाबाच्या फुलांचा उपयोग करतात. भिजविलेल्या तिळांत गुलाबाची फुले काही वेळ ठेवून नंतर त्या तिळांपासून काढलेले तेल केसांना लावण्यासाठी वापरतात [→ गुलकंद सुवासिक द्रव्ये]. 


जाती व प्रकार : गुलाबाच्या सु. १२० जाती असून त्यांतील ८०% मूळच्या आशियातील, १५% अमेरिकेतील आणि बाकीच्या मुख्यत्वेकरून यूरोप आणि वायव्य आफ्रिकेतील आहेत. यांपैकी बहुसंख्य जाती पृथ्वीच्या उत्तर समशीतोष्ण व उपोष्ण भागांत आढळून येतात काही उत्तर ध्रुवाच्या प्रदेशात व काही उष्ण कटिबंधातील डोंगराळ भागांत आढळतात. हिमालयाच्या प्रदेशात, चीन व जपान देशांतील डोंगराळ भागांत गुलाबाच्या पुष्कळ जाती जंगली अवस्थेत वाढतात. गुलाबाची लागवड मुख्यतः उत्तर गोलार्धात (अमेरिकेत उत्तर मेक्सिकोपर्यंत, आफ्रिकेत ॲबिसिनियापर्यंत आणि आशियात भारतापर्यंत) आढळून येते. परंतु अलीकडे दक्षिण गोलार्धातही त्याची लागवड होऊ लागली आहे. 

बगीच्यांत शोभेसाठी लावण्यात येणारे गुलाबाचे असंख्य प्रकार निरनिराळ्या जंगली अवस्थेतील जाती-जातीतील संकरांपासून निर्माण झाले आहेत. १९६३ च्या सुमारास अशा प्रकारांची संख्या १६,००० च्या वर होती आणि तीत दरवर्षी भर पडत आहे.

गुलाबाच्या सर्वच जातींची अगर प्रकारांची फुले सुगंधी असतात असे नाही. गुलाबपाणी आणि अत्तरासाठी काही जातींची व्यापारी प्रमाणावर लागवड करण्यात येते. रोझा द्रमास्केना (दमास्क रोझ), रोझा सेंटिफोलिया (कॅबेज रोझ) आणि रोझा अल्बा  या अत्तरासाठी प्रमुख जाती आहेत. रोझा दमास्केनाची फुले मोठ्या आकाराची व गुलाबी रंगाची असतात. या जातीची लागवड बल्गेरिया, इराण आणि भारत या देशांत केली जाते. रोझा सेंटिफोलिया  ही जात फ्रान्समध्ये लागवडीत असून हिची फुले बहुतांशी गुलाबी असतात. रोझा अल्बा  ह्या जातीची फुले पांढरी असून मुख्यतः बल्गेरियात लागवडीत आहे.

भारतात अत्तरासाठी गुलाबांचे दोन प्रमुख प्रकार लागवडीत आहेत. (१) बसरा (याला ‘बखाना’ असेही म्हणतात) हा रोझा दमास्केनाचा प्रकार आहे आणि (२) एडवर्ड (याला ‘बारामासी’ अथवा ‘चिनिया’ असेही म्हणतात) हा बर्बन संकराचा प्रकार आहे.

यूरोप आणि अमेरिकेमध्ये शोभिवंत गुलाबाच्या बागा लावण्याची विशेष हौस असल्यामुळे संकर पद्धतीने गुलाबाचे हजारो प्रकार निर्माण करण्यात आले. भारतात अशा पद्धतीचे काम अगदी अलीकडील काळापर्यंत क्वचितच झाले. यूरोप आणि अमेरिकेतील सुप्रसिद्ध गुलाबांचे प्रकार आणून भारतातील बागांत लावण्यात आले. 

भारतातील थंड हवेची ठिकाणे आणि डोंगराळ भागांतील दऱ्या वगळता, फार मोठ्या भागाचे हवामान आणि गुलाबाची लागवड मोठ्या प्रमाणावर असलेल्या समशीतोष्ण कटिबंधांतील देशांतील हवामान यांत फार अंतर आहे. दक्षिण भारतातील हवामानांत काही प्रकारांच्या फुलांमध्ये ( विशेषतः नारंगी आणि पिवळ्या प्रकारांमध्ये) रंग पूर्णपणे विकसित होत नाहीत. समुद्रकिनाऱ्याजवळील उष्ण, दमट हवा आणि वाऱ्याबरोबर येणारे खाऱ्या पाण्याचे तुषार यांमुळे काही ठराविक गुलाबाचे प्रकारच त्या हवामानात वाढू शकतात. भारतात संकर पद्धतीने गुलाबांचे प्रकार अलीकडील काळात निर्माण करण्यात आले आहेत.

एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत यूरोपातील लागवडीखालील गुलाबाच्या प्रकारांचे मूळ रोझा गॅलिका (फ्रेंच रोझ) आणि रोझा दमास्केना  या जातींत आहे. या प्रकारच्या गुलाबांना फक्त उन्हाळ्यात फुले येत. या सुमारास रोझा चायनेन्सिस  आणि रोझा जायगॅन्टिया  या जातींचे काही लागवडीतील प्रकार अतिपूर्वेतून यूरोपात नेण्यात आले. या नवीन प्रकारांना एकामागून एक असे फुलांचे बहार येत आणि त्यांतील काही प्रकार पिवळ्या रंगाचे होते, तर काही प्रकारांच्या फुलांना चहाचा सुगंध होता. सम्राट नेपोलियन यांची राणी जोझेफीन यांनी गुलाबाच्या लागवडीला चालना देण्याचे फार महत्त्वाचे कार्य केले. त्यांनी आपल्या पदरी असलेल्या द्यू पाँ नावाच्या वनस्पतिशास्त्रज्ञांमार्फत फ्रेंच साम्राज्यात मिळाले तेवढे सर्व गुलाबांचे प्रकार आणून ला मालमेझाँन येथील राजवाड्यात लावले. राणी जोझेफीन यांची बाग गुलाबाच्या विविध प्रकारांसाठी त्या वेळी फार प्रसिद्ध होती. या बागेत गुलाबाच्या मूळ जाती, मूळ झाडामध्ये एकाएकी बदल घडून आल्यामुळे (उत्परिवर्तनामुळे) निर्माण झालेले प्रकार आणि जातीजातींमध्ये निसर्गतः संकर होऊन निर्माण झालेले प्रकार यांचाच फक्त समावेश होता. द्यू पाँ यांनी १८१२ मध्ये तयार केलेल्या यादीप्रमाणे या बागेत २१२ जाती अथवा प्रकार होते. गुलाबाच्या फुलांचे पहिले प्रदर्शन या बागेत १८१० मध्ये भरले. परंतु कृत्रिम तऱ्हेने संकर करून नव्या गुलाबाच्या जाती अथवा प्रकार निर्माण करण्याचे ज्ञान त्यावेळेपर्यंत अवगत झाले नव्हते. त्या काळी गुलाबाच्या बीजांपासून हजारो रोपे वाढवून ती लावण्यात येत असत. अशा प्रकारच्या झाडांत सर्वसाधारणपणे त्या त्या मूळ जातीचे गुणधर्म आढळून येत. परंतु काही प्रसंगी निसर्गतः दोन जातींमध्ये संकर घडून येई. फ्रेंच साम्राज्यातील मादागास्करच्या (मॅलॅगॅसीच्या) पूर्वेला बर्बन बेटावर कुंपणासाठी लावलेल्या रोझा चायनेन्सिस  आणि रोझा गॅलिका  या दोन जातींमध्ये निसर्गतः संकर घडून आला (काही शास्त्रज्ञांच्या मते हा संकर रोझा चायनेन्सिस  आणि रोझा दमास्केना  या जातींमध्ये घडून आला). एका फ्रेंच वनस्पतिशास्त्रज्ञांनी १८१७ मध्ये तो प्रथम ओळखला व त्याला बर्बन रोझ (रोझा बर्बनिका ) हे नाव देण्यात आले. पुढे हा संकरित गुलाब ‘रोझ एडवर्ड’ या नावाने फ्रान्समध्ये नेण्यात आला. हा फार सुवासिक प्रकार असून तो भारतातही पुष्कळ ठिकाणी लागवडीत आहे. बर्बन रोझमुळे नवीन गुलाबाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचे पाऊल निसर्गामध्ये टाकले गेले.

इंग्लंडमध्ये १८३० साली रोझा चायनेन्सिसचा  एक प्रकार (ब्लश स्वीट सेंटेड) आणि चहाच्या पानांचा वास असणारी जात रोझा ओडोराटा  यांमध्ये संकर करून ‘टी’ नावाचा गुलाबाचा गट निर्माण करण्यात आला. या गटातील प्रकारांना पुष्कळ आणि दीर्घकाळपर्यंत फुले येतात. यूरोपात त्या काळी गुलाबाला सर्वसाधारणपणे एकदाच फुलांचा बहर येत असे त्यामुळे या गटाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. परंतु त्यामध्ये रंगाच्या विविध छटा आणि सुगंध नसल्यामुळे व हिवाळ्यातील हवामानाचा प्रतिकूल परिणाम होत असल्यामुळे हा गुलाबाचा गट विशेष लोकप्रिय झाला नाही. भारतात अद्यापही या गटातील पुढील लोकप्रिय प्रकार लागवडीत आहेत : लेडी हिलिंग्डन, मॉली शर्मन आणि मादाम फल्कॉट.

लाफे या फ्रेंच शास्त्रज्ञांनी १८३७ मध्ये रोझा दमास्केना, रोझा चायनेन्सिस  आणि रोझा बर्बनिका  यांमध्ये संकर करून ‘हायब्रिड पर्पेच्युअल’ हा गुलाबाचा गट निर्माण केला. फुलांचा मोठा आकार आणि सुगंध ही या गटातील प्रकारांची वैशिष्ट्ये आहेत. शिवाय हिवाळ्यातील अतिशीत हवामानाचा प्रतिकूल परिणाम या गटावर होत नाही. १८४०–१९०० या काळात या गटातील गुलाब लोकप्रिय होते. फिलाडेल्फियामध्ये या गटातील कमीतकमी १०० वर्षांची झाडे अस्तित्वात आहेत.


पेअर गुलॉट या फ्रेंच शास्त्रज्ञांनी १८६५ मध्ये मादाम व्हिक्टर व्हर्डिअर (हायब्रिड पर्पेच्युअल) आणि मादाम ब्रेव्ही (टी गटातील गुलाब) यांचा संकर करून ‘हायब्रिड टी’ हा नवीन गट निर्माण केला. सुंदर, लांब, टोकदार फूल असलेला ‘ला फ्रान्स’ हा ‘हायब्रिड टी’ या गटातील पहिला गुलाब आहे. ह्या गटातील प्रकारांमध्ये काटकपणा असून दीर्घकाळपर्यंत फुले येतात. फुलांचा आकारही मोठा आणि आकर्षक असतो. गुलाबाचा हा गट अद्यापही फार लोकप्रिय आहे.

आ. २. (अ) जुन्या प्रकारच्या गुलाबाच्या फुलाचा उभा छेद : (१) केसरदले, (२) किंजपुट (३) किंजल्क (आ) ‘हायब्रिड टी’ गटातील गुलाबाच्या फुलाचा उभा छेद : (१) घोसफळ, (२) कृत्स्नफळे (बिया).

पर्नेट या प्रसिद्ध फ्रेंच गुलाबतज्ञांनी १९०० मध्ये रोझा फिटिडा पर्शिआना (जंगली अवस्थेतील पर्शिअन पिवळा गुलाब) आणि अँटोनी डचर (लाल रंगाचा हायब्रिड पर्पेच्युअल) यांचा संकर करून सोलिल द ओर हा पर्नेशिआना गटातील पहिला पिवळा गुलाब निर्माण केला. पुढील चाळीस वर्षांत पर्नेशिआना गटातील प्रकारांचे हायब्रिड टी गटातील प्रकारांशी अनेक संकर करून अनेक विविध आणि आकर्षक रंगांचे प्रकार निर्माण करण्यात आले. पहिला पिवळा संकरित गुलाब निर्माण करण्यासाठी पर्नेट यांना फार परिश्रम पडले. हजारो संकर केल्यावर आणि दहा वर्षांच्या अवधीनंतर फक्त एक संकर यशस्वी झाला आणि संकरित फळांत फक्त दोन बीजे मिळाली. त्यांतील एका बीजापासून आधुनिक काळातील पिवळे, नारिंगी, लाल ज्योतीची छटा असलेले आणि द्विरंगी फुलांचे गुलाब निर्माण झाले आहेत. हायब्रिड पर्पेच्युअल आणि टी या गटांतील गुलाब आता फारसे लागवडीत आढळत नाहीत. पर्नेशिआना गटातील प्रकारांचे हायब्रिड टी गटाशी पुनःपुन्हा संकर झाल्यामुळे या गटाचे स्वतंत्र अस्तित्व जवळजवळ नष्ट झाले आहे. इंग्लंडमधील नॅशनल रोझ सोसायटीने पर्नेशिआना, हायब्रिड पर्पेच्युअल, टी आणि इतर मोठ्या आकारांच्या फुलांचे प्रकार हे सर्व हायब्रिड टी या गटात समाविष्ट करण्याचे ठरविले. शार्लाट आर्मस्ट्राँग, क्रिम्झन ग्लोरी, पीस, सुपरस्टार आणि मॅक्‌ग्रीडीज सनसेट हे या गटातील सुप्रसिद्ध परदेशी प्रकार आहेत. राजा राममोहन रॉय, डॉ. होमी भाभा, चंदेरी, बेली ऑफ पंजाब आणि सोनिया हे प्रकार दिल्ली येथील भारतीय कृषिसंशोधन संस्थेत निर्माण झाले आहेत.

हायब्रिड टी हा गट अस्तित्वात आला त्याच सुमाराला ‘ड्‌वार्फ पॉलिअँथा’ हा गुलाबांचा गट रोझा पॉलिअँथा  या जातीतून अस्तित्वात आला. रोझा पॉलिअँथा  ही मूळची जपानातील उंच वाढणारी गुलाबाची जात आहे. ही फ्रान्समध्ये नेण्यात आली तेव्हा तिच्या प्रजेमध्ये काही ठेंगणे आणि सतत फुले येणारे प्रकार आढळून आले. त्यांना ड्‌वार्फ पॉलिअँथा हे नाव देण्यात आले. १९१० मध्ये पाउलसन या डॅनिश गुलाब प्रजनकांनी या गटाचे हायब्रिड टी गटाशी संकर सुरू केले व त्यातून निर्माण झालेले प्रकार ‘हायब्रिड पॉलिअँथा’ या गटनामाने ओळखले जाऊ लागले. कालांतराने अनेक प्रकारच्या संकरांनंतर निर्माण झालेले गुलाबाचे प्रकार फ्लोरिबंडा या गटनामाने ओळखले जाऊ लागले. अलीकडील काही वर्षांत या गटातील गुलाबांची पुष्कळ प्रगती झाली आहे आणि हायब्रिड टी गटाएवढेच त्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. या गटातील गुलाब जोमदार वाढणारे, काटक व झुडपांसारखे असतात आणि त्यांना दीर्घकाळपर्यंत पुष्कळ फुले येतात. फुले विविध प्रकारची असतात. थोड्या जागेत चांगल्या प्रकारची मोठ्या प्रमाणावर फुले मिळण्याच्या दृष्टीने या गटाला महत्त्व आहे. आइसबर्ग, डीअरेस्ट व ऑरेंज सेन्सेशन हे या गटातील लोकप्रिय प्रकार परदेशांतून आणून भारतात लावले गेले आहेत आणि दिल्ली प्रिन्सेस, फ्युजिटिव्ह, सेलेशिअल स्टार, स्टान्झा, अप्सरा, चंबा प्रिन्सेस व हिमांगिनी हे प्रकार भारतात निर्माण करण्यात आले आहेत.

वेली गुलाब या गटामध्ये दोन उपगट आहेत. त्यांना क्लाइंबर आणि रँब्लर अशी नावे आहेत. क्लाइंबर उपगटातील गुलाबांना फुले एकएकटी किंवा दोन अगर तीन फुलांच्या समुहात परंतु सातत्याने येतात. पुष्कळशा हायब्रिड टी गटातील प्रकारांतून उत्परिवर्तनाने वेली गुलाब निर्माण झाले आहेत. भारतातील सपाट प्रदेशासाठी शॉट सिल्क व पीस या गुलाबांचे उंच वाढणारे प्रकार वेली गुलाबासाठी योग्य आहेत. जंगली अवस्थेतील काही जाती वेलीसारख्या वाढतात त्यांचाही उपयोग या कामासाठी होतो. रॅंब्लर उपगटातील गुलाबांना फुलांचे गुच्छ धरतात, पाने फिकट हिरवी असून उपपर्णे ७ ते ९ असतात. या गुलाबांना वर्षातून फक्त एकदाच फुले येतात, परंतु फुलांचा बहर काही आठवडे टिकतो. कोरियातील रोझा विचुरैआना  या काटक व वेलीप्रमाणे वाढणाऱ्या जातीपासून निर्माण केलेले रॅंब्लर गुलाब प्रसिद्ध आहेत. अमेरिकन पिलर, एक्सेल्सार, सॅँडर्स व्हाईट, डोरोथी पर्किन्स आणि एमिली ग्रे हे रँब्लर गुलाबाचे प्रसिद्ध प्रकार आहेत. खांबांवर अथवा भिंतीवर चढविण्यासाठी क्लाइंबर गुलाबांचा आणि मोठ्या कमानी अगर बागेतील रस्त्यावरील कमानींसाठी रँब्लर गुलाबांचा उपयोग करतात. 

उत्तम प्रकारच्या गुलाबांची लागवड करणे हा छंदच नव्हे, तर तो एक धंदाही आहे. अनेक देशांत गुलाबांची लागवड करणाऱ्यांच्या संस्था आहेत. इंग्लंडमधील अशा प्रकारच्या संस्थेच्या सभासदांची संख्या १९६३ मध्ये सु. ९१,००० होती. भारतातही अशा प्रकारची संस्था (रोझ सोसायटी ऑफ इंडिया) आहे. या संस्थांतर्फे गुलाबाची प्रदर्शने भरविण्यात येतात व उत्कृष्ट नमुन्यांना बक्षिसे दिली जातात.


प्रजनन : गुलाबाचे नवीन प्रकार दोन पद्धतींनी मिळवितात. (१) प्रचलित प्रकारांतून उत्परिवर्तनाने नवीन प्रकार निसर्गामध्ये निर्माण होतात. यात गुलाबाच्या झाडाची एखादी फांदी मूळ प्रकाराहून निराळे गुणधर्म असलेली आढळून येते. झाडात जननिक बदल होऊन अशा प्रकारची फांदी फुटते. ही फांदी मूळ झाडापासून अलग करून शाकीय अभिवृद्धीच्या (एरवी फक्त पोषणाचे कार्य करणाऱ्या अवयवांपासून, येथे फांदीपासून, नवीन वनस्पती निर्माण करण्याच्या) पद्धतीने वाढविल्यास त्यापासून गुलाबाचा नवीन प्रकार मिळतो. हायब्रिड टी गटातील प्रकारांपासून अशा पद्धतीने अनेक वेली गुलाब निर्माण झाले आहेत. क्ष-किरण आणि किरणोत्सर्गी समस्थानिकांचा (मूलद्रव्याचा अणुक्रमांक तोच पण अणुभार निराळा असलेल्या व कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या त्या मूलद्रव्याच्या प्रकारांचा) वापर करूनही वनस्पतींत उत्परिवर्तन घडवून आणता येते. (२) दुसऱ्या आणि महत्त्वाच्या पद्धतीत गुलाबाच्या दोन प्रकारांमध्ये कृत्रिम अगर नैसर्गिक संकरापासून तयार झालेल्या बीजांपासून झाडांची अभिवृद्धी करतात. निसर्गामध्ये कीटक ( विशेषतः मधमाशा) दोन गुलाबांच्या जातींमध्ये अगर प्रकारांमध्ये संकर घडवून आणण्याचे कार्य करतात. गुलाबाची फुले उभयलिंगी असतात आणि त्यांतून सहसा मकरंद बाहेर पडत नसल्यामुळे रंग, सुवास आणि अन्न म्हणून उपयोगी पडणारे पराग यांमुळे कीटक या फुलांकडे आकर्षिले जातात. कीटकांमार्फत एका जातीच्या फुलांतील पराग दुसऱ्या जातीच्या किंजल्कावर (स्त्रीकेसराच्या पराग ग्रहण करणाऱ्या भागावर) पडतात आणि अशा प्रकारच्या फुलांपासून तयार होणाऱ्या काही फळांत संकरित बीजे असू शकतात. बीजांपासून झाडांची अभिवृद्धी केल्यावरच नवीन झाड संकरित जातीचे आहे अगर मूळ जातीचे आहे हे कळून येते. निसर्गामध्ये जे कार्य कीटक करतात तेच कार्य वनस्पतिप्रजनक कृत्रिम तऱ्हेने करून दोन इच्छित जातींमध्ये (अगर प्रकारांमध्ये) संकर घडवून आणतो. सर्वच कृत्रिम संकरांपासून बीजनिर्मिती होते असे नाही. (त्याला अनेक कारणे आहेत). संकर करावयाच्या दोन जातींपैकी एका जातीच्या फुलाची प्रदले व परागकोश परागकण बाहेर पडण्यापूर्वी कात्रीने काढून टाकतात. त्यानंतर दुसऱ्या जातीच्या फुलातील पूर्ण वाढ झालेले व फुटण्याच्या बेतात असलेले परागकोश पहिल्या जातीच्या फुलातील किंजमंडलावर हळूवार रीतीने चोळतात किंवा बोटाने अथवा नाजूक ब्रशाच्या साहाय्याने पराग किंजमंडलाला लावतात. अशा रीतीने संकर केलेल्या फुलावर पांढऱ्या चिवट कागदाची पिशवी घालून पिशवीचे तोंड दोऱ्याने फुलाच्या देठाला बांधतात. यशस्वी संकरांत ३ ते ४ महिन्यांनंतर फलधारणा व बीजधारणा झालेली आढळून येते. तयार झालेल्या फळांतील बी लाकडी पेट्यांत माती घालून किंवा वाफ्यांमध्ये लावतात. रोपे काही सेंमी. उंच वाढल्यावर मोठ्या मातीच्या कुड्यांत लावतात. रोपे लहान असताना येणाऱ्या फुलांच्या कळ्या तोडाव्या लागतात. झाडे मोठी झाल्यावर त्यांना फुले येऊ देतात आणि त्यांतील चांगल्या झाडांची निवड करून त्यांचे डोळे ‘एडवर्ड’ अगर अन्य प्रकारच्या खोडावर भरतात. अशा रीतीने डोळे भरून अभिवृद्धी केलेल्या झाडावर फुले आल्यानंतर मूळ प्रकाराशी तुलना करून नवीन प्रकार मूळ प्रकारापेक्षा चांगला आहे किंवा कसे हे ठरवितात. परदेशांतील व्यापारी कंपन्या एक लक्ष अगर त्याहून अधिक संकरित रोपे लावतात आणि शेवटच्या कसोटीला त्यांतील फारच थोडी झाडे उतरतात.

यूरोपात पॅरिस, जिनिव्हा, लंडन, माद्रिद येथे आणि अमेरिकेत हार्टफर्ड व हर्शी येथे फार मोठ्या प्रसिद्ध बागा आहेत. भारतात एवढ्या विस्तीर्ण बागा नाहीत परंतु बंगलोर, मुंबई, कलकत्ता, इंदूर, कुलू खोरे, पाटणा, पुणे आणि सिमला येथे काही चांगल्या बागा आहेत. तसेच पतियाळाच्या महाराजांची बागही प्रसिद्ध आहे.

बी. पी. पाल यांनी रोझ इन इंडिया  या पुस्तकात दिल्लीसारख्या हवामानात योग्य अशा बगीच्यांत लावण्यायोग्य निरनिराळ्या गटांतील विविध रंगांच्या प्रकारांची यादी दिली आहे. कुंड्यांत लावण्यासाठी त्यांनी पुढील प्रकारांची शिफारस केली आहे.

हायब्रिड टी गट : मॅक्‌ग्रीडीज सनसेट, फ्लेमिंग सनसेट, मार्गारेट स्मॉल, माँतेझुमा, कॅप्रिस, निग्रेट पिक्चर आणि जून ब्राईड. 

फ्लोरिबंडा गट : आइसबर्ग, रुंबा, ऑलगोल्ड, गोल्डमेरी, मास्करेड, फ्युसिलिअर आणि फ्लॅमेन्को.

भारतातील व्यापारी लागवडीची केंद्रे : अत्तरासाठी उत्तर प्रदेशात गुलाबाची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. अलीगढ जिल्ह्यातील सिकंद्र राव आणि हाथरस या ठिकाणी सु. ३०० हेक्टरमध्ये मुख्यत: बसरा या प्रकाराची लागवड होते. तसेच फरुकाबाद जिल्ह्यातील कनौज भागात सु. १४० हेक्टरांत मुख्यतः ‘एडवर्ड’ या प्रकारच्या गुलाबाची लागवड होते. सिकंदरपूर, गाझीपूर आणि कानपूर या ठिकाणी थोडीफार लागवड होते. अमृतसरच्या आसपास मुख्यतः गुलकंदासाठी मोठ्या प्रमाणावर गुलाबाची लागवड केली जाते. चंडीगढ येथे ४०० हे. क्षेत्राची बाग असून त्यातील फुले परदेशी पाठविली जातात. दक्षिण भारतात गुलाबाचा उपयोग मुख्यतः हारासाठी आणि पुजेसाठी करतात. तमिळनाडू आणि कर्नाटक राज्यांतील डोंगरी भागातच गुलाबाच्या बागा असून त्यांत मुख्यत्वेकरून ‘एडवर्ड’ हा प्रकार लागवडीत आहे. तसेच महाराष्ट्रात पुणे आणि बिहारमधील देवगढ यांच्या आसपास गुलाबाच्या बागा आहेत.

जमीन : साधारणपणे एक मी. खोल असलेल्या मृदुकण संरचनेच्या आणि पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या कसदार जमिनीत गुलाब चांगले वाढून लागवड किफायतशीर होते. पावसाचे जादा पाणी लागवडीत न साचता ताबडतोब निचरून जाईल अशी व्यवस्था करावी लागते. गुलाबाला ६·०–७·५ pH मूल्य [→ पीएच मूल्य] असलेली म्हणजे किंचित अम्लीय, उदासीन किंवा किंचित क्षारीय (अल्कलाइन) जमीन मानवते. पण जास्त लवणीय किंवा क्षारीय जमिनीचा त्यावर ताबडतोब विपरीत परिणाम होतो म्हणून तशा प्रकारच्या जमिनीत लागवड करीत नाहीत. इतर सर्व गोष्टी अनुकूल असून जमीन फक्त पुरेशी खोल नसेल, तर बाहेरून आणलेल्या चांगल्या मातीची तिच्यात भर घालून ती गुलाबाच्या लागवडीसाठी योग्य बनवितात. तसेच जमिनीत योग्य प्रमाणात चिकणमाती किंवा रेती घालून अनुक्रमे रेताड किंवा चिकण जमीन सुधारून घेतात. जमिनीचे pH मूल्य ६·० पेक्षा कमी असेल, तर तिला उदासीन बनविण्याकरिता तिच्यात चुना घालतात.

लागवड : छाट (फाटे), दाब, गुटीकलमे, डोळे भरून केलेली कलमे वापरून गुलाबाची लागवड करतात [→ कलमे]. पण संशोधन करून निरनिराळे संकरज प्रकार आणि वाण उत्पन्न करण्याकरिता बियांपासून रोपे तयार करून ती लावणे आवश्यक असते. हे कष्टाचे आणि खर्चाचे काम असते.

थोडीशीच झाडे लावावयाची असल्यास ती कुंड्यांत किंवा बागेतील जमिनीतही लावतात. जमिनीत लावावयाची असल्यास निवडलेली जमीन झुडपे व तण काढून साफ करतात. नंतर तिच्यात आखणी करून ६०–७५ सेंमी. अंतरावर, ६०–९० सेंमी. व्यासाचे व ६०–७५ सेंमी. खोल खड्डे खणतात. खड्ड्यातून निघालेल्या मातीपैकी अर्ध्या मातीत ५ किग्रॅ. शेणखत व मुठभर हाडांचा चुरा मिसळून ते मिश्रण खड्ड्यात घालतात. बाकीच्या राहिलेल्या मातीने तो खड्डा भरून काढतात. काही काळ तो उन्हात तापू देतात. 


मोठ्या क्षेत्रात लागवड करण्यासाठी वाफे करतात. त्यासाठी निवडलेली जमीन ६०–७५ सेंमी. खोल खणतात किंवा नांगरतात. ढेकळे फोडून जमीन नरम करतात. प्रथम ३० सेंमी. खोल व ४०–६० सेंमी. रुंद सरी पाडतात. तिच्यात साधारणपणे १० किग्रॅ. पर्यंत शेणखत व दोन मुठी हाडांचा चुरा घालून ती खते मातीत चांगली मिसळावीत म्हणून पुन्हा खणतात. या सरीला लागून दुसरी सरी काढताना ती माती पहिल्या सरीत टाकली जाते. या सरीत पहिल्या सरीप्रमाणे खत मिसळतात. याप्रमाणे लागवड करावयाच्या क्षेत्रात वाफे तयार करतात.

कलमे लावताना ती हमचौरस ६० –७५ सेंमी. अंतरावर लावतात. लावताना वरीलप्रमाणे खड्डे करून त्यांत लावतात. वेली गुलाबांची जास्त अंतरावर लागण करतात. साधारणपणे एका हेक्टरमध्ये ५,००० ते ६,००० झाडे लावतात. भारतात पठार भागात पावसाळा संपल्यावर सप्टेंबर-ऑक्टोबर हा काळ लागणीसाठी उत्तम मानला जातो. क्वचित नोव्हेंबरमध्ये सुद्धा लागवड करतात. योग्य प्रकारची काळजी घेतल्यास गुलाबाची लागवड केव्हाही करता येते. परंतु गरम वाऱ्याने लावलेली झाडे सुकतात म्हणून एप्रिल–जूनमध्ये लागवड न करणे श्रेयस्कर असते. डोंगराळ भागात ऑक्टोबर-नोव्हेंबर हा काळ उत्तम समजला जातो.

कलमे लावण्यासाठी खड्ड्यातील किंवा वाफ्यातील माती उकरून काढून (आधी नमूद केल्याप्रमाणे खड्डा किंवा वाफा) खळगा करून त्यात कलमाच्या मुळ्या, ती जेथे वाढविली असतील तेथे जशा पसरलेल्या असतील तशा या खळग्याच्या तळाशी पसरवून नंतर त्यांच्यावर माती पसरवून खळगा पूर्णपणे मातीने भरून काढतात. खोडाशेजारची माती हाताने व पायाने घट्ट दाबतात आणि भरपूर पाणी देतात. सुरुवातीला वारंवार पाणी देतात आणि पुढे जरूरीप्रमाणे दर ८–१० दिवसांनी पाणी देतात.

आंतर मशागत : पिकातील तण वारंवार काढावे लागते. तण खुरपून काढताना झुडपाच्या मुळ्या तुटून त्यांना अपाय होणार नाही अशी काळजी घेतात. लावलेल्या झुडपाच्या बुंध्याशी अधश्चर (जोमदार वाढणारी फूट) येतात ते मूळ झाडांचा जोम कमी होऊ नये म्हणून मूळ झुडपाला अपाय न होऊ देता वारंवार काढून टाकतात.

फुले : लागवडीपासून सु. ८ महिन्यांनी फुले येण्यास सुरुवात होते (अर्थात जातीनुसार या काळात फरक पडतो). पहिल्या फुलांचा बहर संपल्यावर कोमेजलेली फुले व फळे छाटून टाकली म्हणजे पुढील बहर मार्च ते एप्रिलमध्ये उत्तम येतो. मार्च-एप्रिलचा बहर संपल्यावर गुलाबाखालच्या जमिनीवर कुजलेले शेणखत अगर पाल्यापाचोळ्याचे खत पसरून ती झाकल्यास तिच्यामधील ओल उडून जात नाही आणि तणही फारसे उगवत नाही. उन्हाळा संपल्यावर हे पसरलेले खत जमीन खणून मातीत मिसळून टाकतात.

छाटणी : कमजोर, रोगट, निकामी फांद्या काढून टाकण्यासाठी आणि दर्जेदार फुले येणारी नवीन फूट झाडावर यावी म्हणून, तसेच झाडांचा आकार आणि आकारमान योग्य प्रमाणात राखण्याकरिता गुलाबाची छाटणी करतात. यूरोप, अमेरिका व बर्फ पडणाऱ्या प्रदेशांत बहुतेक हिवाळ्यात झाडांनी विश्रांती घेण्याच्या हंगामानंतर आणि भारतामध्ये साधारणतः पावसाळा संपल्यानंतर छाटणी करतात. त्यामुळे पुढे उत्तम आणि भरपूर फुले येतात. भारतात उत्तर प्रदेशामध्ये सामान्यपणे डिसेंबरच्या मध्याला छाटणी सुरू करून ती जानेवारीच्या मध्यापर्यंत संपवितात. बंगालमध्ये ऑक्टोबरअखेर ते नोव्हेंबरच्या मध्यापूर्वी छाटणी संपवितात. बिहारमध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वी छाटणी करण्याची शिफारस केली जाते. छाटणी वर्षातून एकदाच करतात. जास्त वेळा छाटणी केल्यास झाडे कमजोर बनतात. तथापि फुलांना पुरेसे लांब देठ ठेवून फुले तोडल्यास झाडे नीट-नेटकी राहून नवीन फूटही जोमदार निघते. ही एक प्रकारे अपरोक्ष छाटणीच असते. त्यामुळे झाडांना अपाय होत नाही. बंगलोर भागात हवामान वर्षभर गुलाबाला पोषक आणि उत्तेजक राहत असल्यामुळे तेथे दोन वेळा छाटणी करतात. एक फेब्रुवारीतील बहरासाठी आणि दुसरी ऑगस्टमधील बहरासाठी. बहर यावयास पाहिजे असेल त्यावेळेच्या आधी ४०–४५ दिवस छाटणी करतात.

खत : आधी उल्लेख केल्याप्रमाणे शेणखत, पालापाचोळ्याचे खत किंवा कंपोस्ट, पेंड ही जैव (सेंद्रिय) खते छाटणीच्या वेळी गुलाबाला देतात. हाडांचा चुराही घालतात. हिरवळीच्या खताचाही उपयोग करतात. कृत्रिम खत-मिश्रणे घालण्याची शिफारस केली जाते. अशी काही खत-मिश्रणे पुढीलप्रमाणे आहेत : भुईमूग पेंड ५ किग्रॅ., हाडांचा चुरा ५ किग्रॅ., अमोफॉस २ किग्रॅ., सल्फेट ऑफ अमोनिया १ किग्रॅ., सुपर फॉस्फेट २ किग्रॅ. आणि पोटॅशियम सल्फेट १ किग्रॅ. याप्रमाणे केलेले मिश्रण दर झाडाला ५० ते १०० ग्रॅ. प्रमाणे दिल्यास चांगला परिणाम होतो, असे आढळून आले आहे. दक्षिण भागातील सपाट जमिनी आणि बंगलोरसारख्या गुलाबाच्या जमिनीसाठी शिफारस केलेले खतमिश्रण नायट्रेट ऑफ पोटॅश ६ भाग, सल्फेट ऑफ अमोनिया २ भाग, कॅल्शियम सुपर फॉस्फेट २ भाग, सल्फेट ऑफ पोटॅश ८ भाग, मॅग्नेशियम सल्फेट २ भाग व आयर्न सल्फेट / भाग याप्रमाणे तयार करून ते दर झाडाला १०० ग्रॅ. दिल्यास फायदा होतो. हे खत-मिश्रण गुलाबाला दिल्याबरोबर त्याला पाणी देतात. 

पाणी : गुलाबाला नियमित पाणी द्यावे लागते. परंतु त्याच्या खोडाच्या बुंध्याशी साचून राहिलेले पाणी त्याला सोसत नाही. तसेच त्याच्या बुंध्याच्या आसपासची माती कोरडी ठणठणीत पडलेली त्याला चालत नाही. दुमट पोयट्याच्या जमिनीत उन्हाळ्यात आठवड्यातून एकदा आणि हिवाळ्यात पंधरवड्यातून एकदा सावकाश जिरत जिरत वाफा भरेल इतके पाणी दिले तरी चालते. पावसाळ्यात पावसाच्या साचलेल्या जादा पाण्याचा निचरा करावा लागतो. कुंड्यांमधून केलेल्या लागवडीत कुंड्यांमध्ये थोडीशीच माती मावत असल्याने पाणीही थोडेच मावते त्यामुळे मातीतील ओल लवकर उडून जाते म्हणून उन्हाळ्यात कुंड्यांना दररोज पाणी द्यावे लागते. इतर दिवसात तारतम्याने पाणी देतात. जादा पाण्याच्या निचऱ्यासाठी कुंडीच्या तळाला भोक ठेवलेले असते. उन्हाळ्यात झुडपावर बारीक धुळीचा थर बसलेला असतो. ती धूळ पंपाद्वारे पाण्याच्या फवाऱ्याने वा झारीने मधून मधून धुवून काढल्यास गुलाबाची झाडे टवटवीत होतात व त्यांची वाढही चांगली होते. 

फुले तोडणे : यूरोप व अमेरिकेमध्ये कडाक्याची थंडी संपल्यावरच गुलाबाला फुलांचा बहर येतो. अलीकडे तयार केलेल्या नवीन संकरज जातींना पावसाळ्यापर्यंत फुले येत राहतात. भारतात फारशी थंडी नसल्याने साधारणपणे गुलाबाला वर्षभर फुले येत राहतात. कलकत्ता, मुंबई, मद्रास यांसारख्या समुद्रकिनाऱ्यावरील शहरांत उष्ण दमट हवामानामुळे व जोराच्या खाऱ्या वाऱ्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्याच गुलाबाच्या जाती चांगल्या येतात.

उत्तर भारतात नोव्हेंबरअखेर ते मार्चअखेरपर्यंत गुलाबाच्या फुलांचा हंगाम असतो. त्यात प्रकाराप्रमाणे काहींना दोन, काहींना तीन व काहींना जास्त फुलाचे बहर येतात. बसरा गुलाबाच्या जातीला फेब्रुवारीअखेर ते एप्रिलच्या मध्यापर्यंत फुलांचा बहर येतो. तमिळनाडूमध्ये फुलांचा बहर ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत असतो.


फुलांच्या विक्रीकरिता लावलेल्या गुलाबाच्या बागेतील फुलांची तोडणी सूर्योदयापूर्वी संपवून शक्य तितक्या लवकर ती मागणी करणाऱ्या ग्राहकांकडे किंवा विक्री केंद्राकडे रवाना करणे आवश्यक असते. फुले पुरेसा लांब देठ ठेवून धारदार कात्रीने व्यवस्थितपणे कापून घेतात. साधारणपणे एक हेक्टर क्षेत्राच्या गुलाबाच्या लागवडीमधून हंगामात झाडांची संख्या व गुलाबाच्या प्रकारांप्रमाणे दररोज ४५ ते १८० किग्रॅ. फुले मिळतात. एक किग्रॅ. वजनात ४०० ते ५०० लहानमोठी फुले मावतात. एक हेक्टर क्षेत्राच्या गुलाबाच्या लागवडीमधून मार्च-एप्रिलच्या सबंध हंगामात ९२५ ते २,३०० किग्रॅ. फुले मिळतात. दररोज एका झुडपापासून कमीत कमी १५ फुले मिळतात. 

वय : जर्मनीमधील लोअर सॅक्सनीतील हिल्डेशहाईम येथील कॅथीड्रलमध्ये एक मोठे गुलाबाचे झुडूप असून ते एक हजार वर्षांपेक्षा जास्त वयाचे असावे असे म्हणतात. यूरोप आणि अमेरिकेमध्ये बरीचशी गुलाबाची झुडपे व वेली बऱ्याच वर्षे वयाच्या आहेत असे म्हणतात. समशीतोष्ण हवामानातील बगीच्यात लावलेली झुडपे ३०–४० वर्षे टिकतात. भारतात हिवाळी हंगामात गुलाबाच्या झुडपांना फुले येतात आणि थंड प्रदेशातल्यासारखी हिवाळ्यातील विश्रांती मिळत नाही त्यामुळे त्यांचे आयुष्य घटते व ती अदमासे १० वर्षे टिकतात. अर्थात त्यांचा प्रकार आणि त्यांची लागवडीमधील राखलेली निगा यांवर ही मुदत अवलंबून राहते.

रोग : गुलाबावर बरेचसे कवकजन्य (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतिजन्य) रोग पडतात. त्यांपैकी काही महत्त्वाच्या रोगांबद्दल खाली माहिती दिली आहे.

मर : झुडपांची फांदी शेंड्याकडून बुंध्याकडे वाळत जाते. रोगाला अनुकूल परिस्थिती असल्यास रोग झुडपाच्या मुळांपर्यंत पसरून झुडूप मरून जाते. हा रोग डिप्लोडिया रोझारम  या कवकामुळे उद्‌भवतो. फांदी रोगट भागाखाली ५ सेंमी. पर्यंत छाटून त्या जागी ४ भाग कॉपर कार्बोनेट, ४ भाग शेंदूर, ५ भाग अळशीचे तेल आणि थोडी डीडीटी किंवा बीएचसी भुकटी यांचे मिश्रण ब्रशाने लावतात. 

काळे ठिपके : हा रोग डिप्लोकार्‌पॉन रोझी  या कवकामुळे उद्‌भवतो. रोगामुळे पानांच्या दोन्ही बाजूंवर काळसर तपकिरी रंगाचे गोलाकार ठिपके दिसू लागतात. रोग दिसू लागताच ०·२ % कॅप्टन हे कवकनाशक दर पंधरवड्यानी दोन-तीन वेळा फवारल्यास रोग आटोक्यात आणता येतो. 

भुरी : हा रोग स्फेरोथेका पॅन्नोसा  कवकामुळे होतो. सबंध झुडपावरील कोवळी पाने मुरडतात. पानांच्या खालच्या भागावर फोडासारखी वाढ होऊन त्यावर कवकाची पांढरी भुरी चढते. रोग दिसू लागताच गंधकाची भुकटी (२५० मेश) पिकावर पिसकारल्यास रोग आटोक्यात येतो. सावली पडत असलेल्या जागी गुलाबाची लागवड करीत नाहीत. 

तांबेरा : फ्रॅग्मिडियम  वंशातील निरनिराळ्या जातींच्या कवकांमुळे हा रोग उद्‌भवतो. यात पानांचे देठ आणि खोड यांवर पिवळसर काळ्या पुटकुळ्या येतात. फरबम, गंधक इ. कवकनाशके वापरल्याने हा रोग हटतो. 

कीड : गुलाबाच्या झाडांना वाळवी, पाने खाणारे भुंगेरे, खवले कीटक, मावा, फुलकिडे, तुडतुडे, माइट (लाल कोळी) आणि सूत्रकृमी यांचा उपद्रव होतो. वाळवी व भुंगेरे यांसाठी बीएचसी अथवा अल्ड्रीन खवले कीटक, तुडतुडे आणि माइट यांसाठी पॅराथिऑन फुलकिड्यांसाठी बीएचसी अथवा लिंडेन व सूत्रकृमींसाठी नेमागॉनचा वापर करतात. 

संदर्भ : 1. Narayan Swami Biswas, Rose Growing Centres and Rose Industry in India, New Delhi, 1957.

           2. Pal, B. P. Rose in India, New Delhi, 1966.

           3. Thomas, A. S. Better Roses, Sydney, 1964.  

परांडेकर, शं. आ. चौधरी, रा. मो. गोखले, वा. पु.

गुलाब