उंब : (१) फुलोऱ्यासह फांदी, (२) फूल, (३) फळ, (४) अध्यावरणासह बी.

उंब : (वुब; हिं. अंशफल; क. कांकिंदेली; इं. लाँगन; लॅ. नेफेलियम लाँगॅना, यूफोरिया लाँगॅना; कुल-सॅपिंडेसी). सु. १०–१२ मी. उंचीचा हा सुंदर व सदापर्णी वृक्ष भारतातील (आसाम, बंगाल, उ. कारवार, कोकण व तिनेवेल्ली येथे) सदापर्णी जंगलात व श्रीलंकेत आढळतो. इतर उष्णकटिबंधीय देशांत ह्याची लागवड करतात; द. चीनमध्ये व मलेशियात फार मोठ्या प्रमाणात फळांकरिता याची लागवड केलेली आढळते. खोडावरची साल पिवळट करडी व गुळगुळीत पाने संयुक्त, समदली किंवा विषमदली पिच्छाकृती; दले चिवट, २–५ जोड्या, चकचकीत, कोवळेपणी तांबूस व लक्षवेधक; कोवळ्या भागांवर तारकाकृती केसांचे आच्छादन असते. फुले लहान, एकलिंगी, पांढरी व परिमंजऱ्यांवर मार्च-मेमध्ये आणि फळे जून-सप्टेंबरात येतात. फळ कपालीसारखे (कठीण, शुष्क व न फुटणारे बदामासारखे), गोल, तांबूस-पिवळट, १·२–२·५ सेंमी. व्यासाचे, सालीवर पुटकुळ्या असलेले, पांढऱ्या, मांसल व गोड मगजाने (अध्यावरणाने) वेढलेले एक गर्द तपकिरी बी त्यात असते. खाद्य फळे, शोभा व सावली ह्यांकरिता हा वृक्ष लोकप्रिय असून नवीन लागवड बियांपासून करतात. भरपूर खत घातल्यास बहार चांगला येतो. फळ पौष्टिक, दीपक (भूक वाढविणारे) व कृमिनाशक असून तापात मगज प्रशीतक (थंडावा देणारा) असतो. लाकूड मध्यम कठीण व तांबूस असून खांब, शेतीची अवजारे, बांधकाम व सजावटी सामानास वापरतात. बियांतील सॅपोनिनामुळे त्या केस धुण्यास उपयुक्त असतात. सालीत १२·२९% टॅनीन व पानांत क्वेर्सिटीन व क्वेर्सिट्रीन असतात.

पहा : रिठा; सॅपिंडेसी.

जमदाडे, ज. वि.