गेवा : (फुंगली, सुरुंद क.हर्स सं. अगरु इं. ब्लाइंडिंग ट्री लॅ, एक्स्कोकॅरिया अगलोचा  कुल – यूफोर्बिएसी). या लहान, सु. ४·५—७·५ मी. उंच, सदापर्णी व विषारी वृक्षाचा प्रसार कोकण, गोवा, उ. कारवार इत्यादींतील कच्छ वनश्रीच्या जंगलात (समुद्रकिनाऱ्याजवळच्या भरतीमुळे बनलेल्या जंगलात) व तसेच श्रीलंका, आशियातील उष्ण प्रदेश, अंदमान बेटे, उत्तर ऑस्ट्रेलिया इ. देशांतही आहे. साल करडी, गुळगुळीत, चकचकीत व अनेक गोल वल्करंध्रांनी (परित्वचेतील सूक्ष्म छिद्रांनी) भरलेली असते. पाने एकाआड एक, जाड, चिवट, साधी, दीर्घवृत्ताकृती, निमुळती व काहीशी दातेरी असतात लहान सुगंधी, पिवळट हिरवी फुले मंजऱ्यांवर जुलै-ऑगस्टमध्ये येतात. छदे मांसल पुं-पुष्पे बिनदेठाची आणि लोंबत्या कणिशावर येतात. स्त्री-पुष्पांना देठ असतात [→ फूल]. बोंड ०·६—२·५ सेंमी. व बी गोलसर, गुळगुळीत असते [→ यूफोर्बिएसी].

पानांचा काढा अपस्मारावर देतात व व्रणावर लावतात. मुळांचा रस हातापायाच्या सुजेवर लावण्याच्या मर्दनलेपात घालतात. साल रेचक व वांतिकारक झाडाचा रस तेलात उकळून संधिवात, महारोग व पक्षाघातावर लावतात. चीक फार कडू व विषारी असून रेचक व गर्भपातक असतो तसेच तो मत्स्यविष आहे व बाणाला लावण्याच्या विषात घालतात. चीक डोळ्यात गेल्यास अंधत्व येते. सालीत १०% टॅनीन असते.

लाकूड पांढरट किंवा पिवळट व हलके, मऊ आणि टिकाऊ असते. खोकी, खेळणी, सजावटी सामान, आगकाड्या, कागदाचा लगदा, लोणारी कोळसा, सरपण इत्यादींकरिता उपयुक्त असते.

पहा :  वनस्पति, विषारी. 

जमदाडे, ज. वि.