कदंब : (नीव हिं. कदम, करम क. कडुहळे, कडगा सं. कदंब इं. कदम लॅ. अँथोसिफॅलस इंडिकस कुल-रुबिएसी). हा एक उपयुक्त व मोठा पानझडी वृक्ष भारतात सर्वत्र (उत्तर कारवारचे घनदाट जंगल, उपहिमालयाचा प्रदेश, आसाम इ.) तसेच श्रीलंका, जावा, बोर्निओ, ब्रह्मदेश येथेही आढळतो. अनेक ठिकाणी मुद्दाम लावला जातो. खोड सरळ, १२ – २१ मी. उंच व घेर १⋅८ – ४⋅५ मी. फांद्या लांब व जमिनीला समांतर पसरलेल्या कोवळे भाग लवदार पाने साधी, मोठी, चिवट, समोरासमोर, लांब देठाची, दीर्घवृत्ताकृती, प्रकुंचित (निमुळती), वरून चकाकीत व खालून लवदार उपपर्णे कुंतसम (भाल्यासारखी) टोकदार व शीघ्रपाती (लवकर झडणारी) फुलोरे एकेकटे अग्रस्थ (टोकाला), पिवळट, गोलसर स्तबक, फुले नारिंगी, लहान व सुवासिक त्यांची सामान्य लक्षणे ⇨ रुबिएसी कुलाप्रमाणे [→ फूल]. पक्व फळ पिवळे व लहान संत्र्याएवढे, नारिंगी व मांसल पुष्पासनावर बोंडे गर्दीने रचलेली व अल्पबीजी असतात. बिया लहान व खरबरीत असतात. 

हिंदू व बौद्ध या वृक्षाला वंदनीय मानतात आणि देवळाच्या आवारात व बागेत शोभेकरिता लावतात. कालियामर्दनापूर्वी श्रीकृष्ण या वृक्षावर बसले होते असे वर्णन आहे. पवित्र हिंदू स्मृतींना (समाधी वगैरे) याची फुले अर्पण करतात. फळे खाद्य परंतु रुचकर नसतात. पाला गुरांना खाऊ घालतात. लाकूड मजबूत व नरम असून कापण्यास, रंधण्यास वगैरे सोपे परंतु फार टिकाऊ नसते. होड्या, होडगी, खोकी, तक्ते, फळ्या,आगपेट्या व काड्या, स्वस्त कागद, सजावटी सामान, चहाच्या पेट्या, तागाच्या गिरण्यांतील रिळे, कातीव व कोरीव काम इत्यादींकरिता ते उपयुक्त असते. 

याची साल शक्तिवर्धक, ज्वरनाशक व स्तंभक (आकुंचन करणारी) असते. पानांचा काढा मुखरोग व तोंड येणे यांवर गुळण्याकरिता वापरतात. कोकणात तान्ह्या मुलांच्या टाळूवर (ती खोल गेली असता) ताज्या सालीचा रस लावतात आणि जिरे व साखर घालून थोडा रस पाजतात. नेत्रदाहावर सालीच्या रसात तितकाच लिंबूरस, अफू व तुरटी घालून बुबुळाभोवती लावतात. या वनस्पतीत सिंकोटॅनिक अम्‍ल असते. 

रुबिएसी कुलातील दुसऱ्या एका वंशात अंतर्भाव केलेली पण कदंब याच नावाची एक जाती (कळंब हिं. कड्डम क. कुडवाल लॅ. मित्रगायना पार्व्हिफोलिया), ब्रह्मदेश, श्रीलंका, पाकिस्तान व भारत येथे सर्वत्र कोरड्या प्रदेशांत, विशेषतः कोकण, मावळ, द. महाराष्ट्र, गुजरात इ. ठिकाणी पानझडी जंगलांत आढळते. हा १२ – २४ मी. उंच व १⋅८ – ३⋅६ मी. घेराचा पानझडी वृक्ष असून त्याची पाने विविध आकारांची व आकृतींची, गर्द हिरवी, लहान देठाची पण बव्हंशी दीर्घवृत्ताकृती  वा गोल असतात. खोडावर खोबणी व पायथ्याशी आधारमुळे असतात. साल फिकट करडी व पडून गेलेल्या तुकड्यांमुळे खाचदार दिसते. उपपर्णे मोठी, गुलाबी व शीघ्रपाती. फुलोरे अग्रस्थ किंवा कक्षास्थ (बगलेत) परिमंजरीवर रचलेले गोल व सच्छद स्तबक [→ पुष्पबंध] फुले लहान, पिवळसर हिरवी, बिनदेठाची व सुवासिक असून मे-ऑगस्टपर्यंत येतात. फुलांची संरचना साधारणतः वरील कदंबाप्रमाणे असली तरी पुष्पमुकुट व किंजल्काबद्दलचे काही फरक आहेत. बोंड दोन तडकणाऱ्या कुड्यांचे असून बिया अनेक व सपक्ष (पंखासारखा विस्तारित भाग असलेल्या) असतात अनेक बोंडे एकत्र बनतात. 

लाकूड मध्यम कठीण, ऊन-पाऊस न लागल्यास चांगले टिकाऊ घरबांधणी, किरकोळ सजावटी सामान, शेतीची अवजारे, फण्या, कोरीव व  कातीव काम इत्यादींना उपयुक्त असते. पाला गुरांना चारतात. साल व फळे ज्वरावर व शूलावर (तीव्र वेदनांवर) देतात. सालीचे चूर्ण पाण्यात  कालवून स्नायुदुखीवर लावतात. 

पहा : हेदी.

हर्डीकर, कमला श्री.

कदंब