विलायती वाकुंडी : (वाखांडी, कावळी गु. छबक-चुरी, रबर वेल इं. वाइल्ड रबर प्लँट लॅ. क्रिप्टोस्टेजिया ग्रँडिफ्लोसरा कुलॲस्क्लेपीएडेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] ही काष्ठमय आरोहिणी (आधाराने वर चढणारी) वनस्पती कुंपणावर अथवा कालवे व ओहोळ यांच्या आसपास वाढते. ही वनस्पती मूळची मॅलॅगॅसी (मादागास्कर) बेटावरील असून तेथून ती माणसांमार्फत आफ्रिकेत व भारतात आली असावी, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. एकोणिसाव्या व विसाव्या शतकात तिचा प्रसार एक शोभेची वेल म्हणून जगाच्या उष्ण आणि उपोष्ण कटिबंधांतील प्रदेशांत झपाट्याने झाला. मात्र पुष्कळ ठिकाणी तिचा प्रसार उपद्रवी ठरला. रुक्ष प्रदेशातही ती चांगली वाढते. तिला चाबकाच्या आकाराच्या, उंच वाढणाऱ्या फांद्या फुटतात व त्या बांधकाम अथवा झाडांचा आधार घेऊन वाढतात. सुमारे १७ ते २० मी. उंचीच्या झाडाच्या शेंड्यापर्यंतही त्या पोहोचतात. हिच्या खोडावरील पातळ साल सोलून निघते व तिचे तुकडे पडतात. पाने संमुख (समोरासमोर), साधी, ८-१० सेंमी. लांब, दीर्घवृत्ताकृती (लंबगोल), जाड, चकचकीत आणि दोन्ही टोकांकडे निमुळती होत गेलेली असतात. पानांच्या देठांवर आणि मध्यशिरेवर जांभळ्या रंगाची झाक असते. जून ते सप्टेंबरपर्यत फुलांचा बहर असतो. फुलोरे [⟶ पुष्पबंध] कुंठित असून फुले मोठी, घंटेच्या आकाराची, आकर्षक, चमकदार, निळसर, जांभळी किंवा गर्द गुलाबी असतात. झुबक्यात दोन अथवा तीन फुले असतात. पाकळ्यांच्या कडा काहीशा नागमोडी असून तळाशी एक ग्रंथी असते. फुलातील तोरण पाच भागांचे बनलेले असते [⟶ फूल]. दले अंतःस्थित (आत सामावलेली) असून फळे पेटिकासम (पेटीसारखी) १० ते १२ सेंमी. लांब व शुष्क असतात. ती शेंड्याकडे फार निमुळती असून प्रत्येकास तीन बारीक पंख असतात. फळ तडकून त्यातून झुबकेदार केस असलेल्या बिया बाहेर पडतात व त्या वाऱ्याने दूर नेल्या जातात.

विलायती वाकुंडी : फुलासह फांदी

फुलाची तपशीलवार संरचना व वेलीची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ॲस्क्लेयपीएडेसीत (अथवा रुई कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात. हिची नवीन लागवड बिया व छाट कलमे लावून करतात. हिच्या चिकापासून चांगल्या प्रतीचे रबर मिळते. तथापि रबर काढण्याची पद्धत कष्टाची व खर्चाची आहे. मोठ्या प्रमाणावर रबर काढण्याचे प्रयत्नच अंशतःच यशस्वी झाले आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीला या वेलीपासून तयार केलेले रबर बाजारात आले. त्यानंतर सु. ७५ वर्षे जंगलांत वाढणाऱ्या वेलीपासूनच रबर काढले जात असे. बियांवरील केसांचा (कापसाचा) उश्या व लहान गाद्या भरण्यास उपयोग होतो. झाडाच्या सालीपासून भरपूर धागा निघतो व तो मासेमारीत वापरतात. बारीक फांद्यांपासून दुरड्या तयार करतात. 

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. II, Delhi, 1950.

           2. Polhamus, L. G. Rubber, London, 1962.

हर्डीकर, कमला श्री. परांडेकर, शं. आ.