ॲरेलिया : (तापमारी कुल—ॲरेलिएसी). या वनस्पति-वंशाचा समावेश फुलझाडांपैकी द्विदलिकित वर्गातील ॲरेलिएसी या लहान कुलात केला असून त्यात सु. ३५ जाती आहेत. त्या काटक, सुगंधी, ⇨ओषधी, क्षुप (झुडूप) किंवा लहान वृक्ष असून काही निसर्गत: जंगलात अथवा काही बागेतून पाना-फुलांच्या शोभेकरिता लावलेल्या आढळतात. त्यांचा प्रसार चीन, जपान, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मलाया इ. प्रदेशांत विशेष आहे. भारतात खासी तसेच नेपाळ, भूतान व सिक्कीम ह्या भागांत तापमारी (ॲरेलिया स्यूडोगिंसेंग) या नावाची ओषधी बऱ्याच उंचीवर आढळते. शिवाय बागेतील अनेक शोभेच्या जाती आयात केलेल्या आहेत त्या बहुतेक सर्व क्षुपे असून काही केसाळ व काही काटेरी आहेत. पाने बहुधा संयुक्त, दले विविध प्रकारे खंडित किंवा दंतुर (दातेरी) असतात. निरनिराळ्या प्रकारचे पांढरट किंवा पिवळसर ठिपके हे बहुतेक पानांचे वैशिष्ट्य असल्याने या क्षुपांचे कुंपण बागेस शोभादायक होते. फुले बहुधा बारीक व चवरीसारख्या फुलोऱ्यात असून त्यामुळेही शोभा वाढते. तापमारी ही उत्तेजक, कामोत्तेजक, कफोत्सारक व ज्वरनाशी आहे. ⇨राइस-पेपर प्लँट (ॲरेलिया पॅपीरीफेरा) ही कागदाकरिता उपयुक्त असून ⇨ गिसेंग (पॅनॅक्स) ही औषधी आहे.

परांडेकर, शं. आ.