मिरिस्टिकेसी : (जातिफल कुल). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित (बियांत दोन दले असलेल्या वनस्पतींचा वर्ग) वनस्पतींचे एक लहान कुल. याचा समावेश ए. एंग्लर व के. प्रांट्‌ल यांनी मोरवेल गणात [⟶ रॅनेलीझ] केला आहे व जे. हचिन्सन यांनी लॉरेलीझमध्ये [⟶ लॉरेसी] केला आहे. जायफळाला संस्कृत नाव ‘जातिफल’ असल्याने व लॅटिन नाव मिरिस्टिका फ्रॅग्रॅन्स (जायफळ) असल्याने या कुलाला ‘जातिफल’ कुल हे नाव आहे. यामध्ये एकूण प्रजाती अठरा व जाती सु. तीनशे (ए. बी. रेंडेल यांच्या मते प्रजाती अकरा आणि जाती अडीचशे तर व्हारबुर्ख यांच्या मते १५ प्रजाती व २६० जाती) असून त्यांचा प्रसार उष्ण कटिबंधात व विशेषेकरून आशिया खंडात आहे. सीताफल कुल [⟶ ॲनोनेसी], चंपक कुल [⟶ मॅग्नोलिएसी], मोरवेल कुल [⟶ रॅनन्क्युलेसी] व गुडूची [⟶ मेनिस्पर्मेसी] आणि कमल [⟶ निंफिएसी] या कुलांशी या कुलाचे आप्तभाव आहेत. या कुलातील बहुतेक सर्व वनस्पती ⇨ वृक्ष असून त्यांना सतत हिरवी राहणारी साधी, चिवट, अखंड व उपपर्णहीन पाने असतात साध्या नरम ऊताकत (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहात) तैल प्रपिंडे (तेलाने भरलेल्या ग्रंथी) असतात, त्यामुळे झाडांना वास येतो आतील सालीतून लालसर द्रव बाहेर येतो. फुलोरे मंजरी, परिमंजरी, वल्लरी किंवा गुच्छ [⟶ पुष्पबंध] असून त्यांवर अचक्रीय, बहुधा तीन (त्रि) भागी, लहान, एकलिंगी व नियमित फुले भिन्न झाडांवर येतात. परिदलमंडल साधे, खाली नळीसारखे किंवा घंटेसारखे आणि वरच्या बाजूस पसरट व बहुधा तीन सुट्या दलांचे असते. नर फुलात केसरदले ३–१८ क्वचित ३० जुळलेली (एकसंघ) परागकोश बाहेरच्या बाजूस फुटणारे, उभे किंवा आडवे (स्तंभाला) चिकटलेले स्त्री-फुलात किंजदल एक, किंजल फार लहान ऊर्ध्वस्थ किंजपुटात एक कप्पा व त्याच एकच अधोमुखी (तळाकडे बीजकाचे रंध्र असलेले) तलस्थ बीजक असते [⟶ फूल]. मृदूफळ मांसल पण तडकणारे व एकबीजी बी अध्यावरणयुक्त व पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश) रेषाभेदित [अनेक रेषांनी विभागलेला ⟶ फळ बीज]. ⇨ जायफळाला औषधी व स्वयंपाकात महत्त्व आहे. मिरिस्टिका प्रजातीतील पाच जाती, ⇨ नीमाच्या चार जाती, हॉर्सफील्डियाच्या तीन किंवा चार जाती भारतात आढळतात. जातिफल कुल प्रारंभिक कुलांपैकी एक मानले जाते.

पहा : जायफळ रॅनेलीझ.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials. Vols. V and VI, New Delhi, 1959 and  1962.

             2. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol. 2, Cambridge, 1963.

परांडेकर, शं. आ.