फायबर, गमूती : (गमूती पाम, शुगर पाम लॅ. रेंगा पिनाटा, . सॅकॅरिफेरा कुल-पामी). नारळाखालोखाल भव्य, आकर्षक, श्रेष्ठ व बहुगुणी असा हा तालवृक्ष आसाम, ब्रह्मदेश, इंडोनेशिया, कंबोडिया (कांपुचिया), मलाया इ. प्रदेशांत आढळतो. तो मूळचा मलायातील असून तेथे व इतरत्र (भारतातही) लागवडीत आहे. जगात रेंगा वंशाच्या एकूण दहा जाती आहेत व त्या बहुतेक मलाया, आशिया व ऑस्ट्रेलिया येथे आढळतात. . पिनाटा, व . वायटाय ह्या दोन जाती भारतीय आहेत, असे हल्ली मानतात . ऑब्ट्युसिफोलिया ही तिसरी जाती शोभेकरिता लागवडीत आली आहे. गमूती फायबर हा वृक्षसुद्धा शहरातील अनेक उद्यानांत शोभेकरिता लावलेला आढळतो. याची उंची सु. १० मी. (क्वचित १५ मी.) असून त्याच्या खोडावर शेंड्याकडे मोठ्या, साध्या, अपूर्णपणे पिसासारख्या विभागलेल्या गर्द हिरव्या व चकचकीत २०-२८ पानांचा झुबका असतो. प्रत्येक पान सु. ५-९ मी. लांब असून त्यावर अनेक (सु. ६०-१०० व कधी ११५) दले दोन्ही बाजूंस ४-५ च्या झुबक्यांत असतात प्रत्येक दल १-१·५ मी. लांब, तरवारीसारखे व तळाशी सकर्णिक (कानाच्या पाळीसारखे खंड असलेले) असते. पर्णतल आवरक (खोडाभोवती वेढणारा) असून तो दाट धाग्यांनी आच्छादिलेला असतो खोडावरचा बराच भाग असा आच्छादित असतो लावल्यापासून सु. ६ ते १० क्वचित १५ वर्षांनी वृक्ष फुलतो आणि शाखायुक्त लोंबते व एकलिंगी (सु. १·८-३ मी. लांब) स्थूलकणिश [→ पुष्पबंध] प्रकारचे फुलोरे वृक्षांच्या शेंड्याकडून खाली अशा क्रमाने पानांच्या बगलेतून महाछदासह येतात. फुले असंख्य व सच्छद दोन्ही पुं -व स्त्री-प्रकारची फुले एकाच झाडावर पण स्वतंत्र अक्षावर (पुष्पबंधाक्षावर) येतात क्वचित दोन्ही प्रकारची ⇨ भेर्ली माडातल्याप्रमाणे एका स्त्री -पुष्पाजवळ दोन पुं-पुष्पे असतात. पुं-पुष्पात केसरदले अनेक असून ती फुले २·५ सेंमी. लांब व जांभळी असतात [→ फूल] स्त्री- पुष्पात तीन किंजदले असतात. मृदुफळ ५-६ सेंमी., गोलसर पण लांबट व पिवळट असून त्यात २-३ तपकिरी व आयताकार बिया असतात. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ताल कुलात [→ पामी] वर्णिल्याप्रमाणे असतात. फुलोरे येऊन गेल्यावर हा वृक्ष मरतो.

पुं-फुलोरा सु. ७० दिवसांत पक्व होतो त्यासुमारास त्याच्या अक्षाला जखम करून ⇨ नीरेसारखा गोड रस काढतात [→ शिंदी]. स्त्री-फुलोऱ्यापासून तसा रस मिळत नाही. दर झाडापासून दर दिवशी सु. ४-५ लिटर रस मिळतो. तो आंबवून मादक द्रव्य (पेय) व शिरका (व्हिनेगर) बनवितात किंवा त्याचा गूळ आणि पिवळट स्फटिकी साखर बनवितात. दोन-तीन वर्षे नव्याने उमलणाऱ्या फुलोऱ्यांपासून रसाचे उत्पादन करतात. मलयातील लोक सरासरीने दर सु. ४·५ लिटर रसापासून अर्धा किग्रॅ. व वर्षभरात १२ किग्रॅ. १२ किग्रॅ. गूळ करतात व तो आवडीने खातात तसेच रसापासून ‘अरक’ नावाची दारू तयार करतात. जावा व मलायात खोडातील पिठूळ पदार्थापासून ⇨ साबुदाणा बनवितात. दर खोडापासून सु. ७७ किग्रॅ. साबुदाणा मिळतो. फिलीपीन्समध्ये एका खोडापासून सु. १०० किग्रॅ. साबुदाणा काढतात. कोवळी पालवी स्थानिक लोक भाजीकरिता वापरतात. जून पाने चट्या, छपरे, टोपल्या इत्यादींकरिता वापरतात. पानांच्या आवरक तळांपासून उत्तम धागा काढून त्यापासून दोऱ्या व कुंचले (ब्रश) तयार करतात. चीनमध्ये आवरकांचा उपयोग बोटीमध्ये फटी बंद करण्यासाठी करतात. तसेच ते सहज पेट घेत असल्याने त्यांच्या चुड्या पेटवणास वापरतात गाळण्याकरिताही आवरक वापरतात. फळांतील मगज (गर) खाद्य असतो. फळाच्या बाहेरील सालीचा रस कातडीस लागल्यास वेदना व आग होते तो रस मत्स्यविष आहे तो मनुष्यालाही विषारी असतो. खोड कठिण व टिकाऊ असून जून झाडात ते पोकळ असते त्याचा उपयोग पन्हळासारखा करतात. ह्या झाडांना खोल जमीन आणि सखल व ओलसर प्रदेश मानवतो आणि सु. ६०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशांत ती चांगली वाढतात. या वृक्षाचे मूळ श्वासनलिकादाहावर व अग्निमांद्यावर गुणकारी आहे.

ॲ. वायटाय ही जाती त्रावणकोर, म्हैसूर, कोईमतूर व निलगिरी भागांत आढळते. हिची व ॲ. ऑब्ट्युसिफोलिया या जातीची कोवळी पाने खातात व त्यांच्या खोडातील भेंडही गोड व खाद्य असतो. . वायटायच्या फुलोऱ्याच्या अक्षातून ताडीसारखा रस मिळतो.

पहा: पामी, पामेलीझ साबुदाणा.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. 1, Delhi. 1948.

2. MacMillan. H. F. Tropical Planting and Gardening, New York, 1956.

पाटील, शा. दा. परांडेकर, शं. आ.