चिल्हार : (चिल्हारी, चिलार-री, शेंबर्टी हिं.रेलू गु.चीलार क. होटसिगे इं. म्हैसूर थॉर्न लॅ. सीसॅल्पिनिया सेपिॲरिया कुल-लेग्युमिनोजी उपकुल-सीसॅल्पिनिऑइडी). ही जलद वाढणारी, आरोही (वर चढणारी), क्षुपीय (झुडपासारखी) व काटेरी वनस्पती भारतात साधारणपणे सर्वत्र (विशेषतः कोकणात आणि दख्खनमध्ये), शिवाय श्रीलंका, मलाया, फिलिपीन्स, चीन व जपान या प्रदेशांत आढळते. कुंपणाकरिता दख्खनमध्ये हिचा उपयोग करण्यात येतो. हिचे खोड बळकट व काष्ठमय असून त्यावर पिवळसर आकडेदार काटे असतात. पाने एकाआड एक, संयुक्त, दोनदा पिसासारखी विभागलेली, २० – २५ सेंमी. लांब असून प्रमुख पर्णाक्षावरही काटे असतात. उपपर्णे तिरपी आणि अंडाकृती. दले ५ – १० जोड्या, ५ – ८ सेंमी. लांब दलके ८ – १२ जोड्या, लहान, आयात, फिकट हिरवी आणि टोकास गोलसर असतात. सच्छद (फुलाच्या तळाशी पानासारखे उपांग असलेली), गर्द पिवळी, १·५ – २ सेंमी. व्यासाची फुले खोडावरील फांद्यांच्या टोकास किंवा पानांच्या बगलेत १५ ते ३० सेंमी लांब मंजऱ्यांवर नोव्हेंबर ते मार्चमध्ये येतात, तेव्हा कुंपण आकर्षक दिसते. फुलांची संरचना व इतर सामान्य लक्षणे ⇨ लेग्युमिनोजी  अथवा शिंबावंत (शेंगा येणाऱ्या वनस्पतींच्या) कुलात (व सीसॅल्पिनिऑइडी उपकुलात) वर्णिल्याप्रमाणे. संदले परिहित व प्रदलसम प्रदले काहीशी गोलसर व पिवळी केसरदले दहा व तंतू खाली केसाळ [→ फूल] शिंबा (शेंग) सरळ, भरीव, ७ – ९ X २·५ – ३ सेंमी., किंचित वाकडी, लांबट टोकाची, पिंगट रंगाची व अरुंद पंखांची (पिसासारख्या विस्तारित भागांची) असून तिच्यात ६ – ८ हिरवट, ठिपकेदार बिया असतात बियांमधील फळावरचा भाग खोलगट असतो. पाने आर्तवजनक (मासिक पाळी सुरू करणारी), पित्तशामक आणि सारक असून भाजलेल्या भागावर लावतात. मुळे रेचक कोवळ्या फळात बाष्पनशील (उडून जाणारे) तेल असते. खोडावरची साल कोकणात कातडी कमाविण्यास वापरतात. टिपू सुलतानाने ह्या आरोही क्षुपाची तटबंदीकरिता मुद्दाम लागवड केली होती म्हणून त्याला म्हैसूर थॉर्न हे नाव पडले, असे म्हणतात. 

परांडेकर, शं. आ.

चिल्हार : फुलोरा व फळे (शिंबा) यांसह फांदी