आ. १ मेड्युलोजा वृक्ष बीजी नेचे: (इ. सीड-फर्न्‌स लॅ. टेरिडोस्पर्मी, सायकॅडो-फिलिकेलीझ).⇨नेचे या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाहिनीवंत (द्रव पदार्थ वाहून नेणाऱ्या घटकांनी युक्त असलेल्या) वनस्पती-सारख्या पण मोठ्या व संयुक्त पानांवर बीजे धारण करणाऱ्या विलुप्त (विद्यमान नसलेल्या) वनस्पतींचा गण. ह्या गणातील वनस्पतींची बीजे उघडी (प्रकट) असल्यामुळे सर्व वनस्पतींच्या वर्गीकरणात त्यांचा अंतर्भाव प्रकटबीज वनस्पतींत केला जातो. पूर्व नेचे व बीजी वनस्पतींचा काही संबंध असावा असे म्हणण्यास प्रत्यक्ष पुरावा नव्हता परंतु नेचासारख्या पानांवर⇨सायकससारख्या वनस्पतींच्या [सायकॅडांच्या ⟶सायकॅडेलीझ]बियांसारखी प्रारंभिक प्रकारची बीजे ह्या वनस्पतींत आढळल्यामुळे नेचे व काही बीजधारी वनस्पती यांचा संबंध असावा, असा अंदाज व्यक्त केला गेला. आकारवैज्ञानिक दृष्ट्या (सजीवांच्या कार्याऐवजी त्यांची संरचना व आकार यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राच्या दृष्ट्या) बीजी नेचांचे स्थान नेचे व सायकॅडे यांच्या मधे असावे, असे कित्येक शास्त्रज्ञ मानतात. १८७७ मध्ये ग्रँड यूरी या शास्त्रज्ञांनी नंतर ज्यांना म्येलोझायलॉन असे नाव दिले गेले  त्या वनस्पतींचे जीवाश्म (शिलारूप अवशेष) अभ्यासले तथापि त्यांचा नेचे आणि सायकॅडे यांच्याशी असलेला संबंध १८८७ मध्ये डब्ल्यू. सी. विल्यमसन यांनी दाखवून दिला. १८७७ — ९९ पर्यंतच्या काळात बीजांशिवाय इतर अवयवांचे जीवाश्म व त्यांचे नेचाशी व सायकॅडांशी साम्य ओळखून त्यांना ‘सायकॅडोफिलिसिस’ हे नाव एच्. पोटॉनी (१८९९) यांनी दिले व त्यांच्या मते हा गट नेचे व बीजी वनस्पती या दोन्हींमधील संक्रमणावस्था दर्शविणारा असावा. १९०३ मध्ये एफ्. डब्ल्यू. ऑलिव्हर व डी. एच्. स्कॉट ह्यांनी सध्या या गणात समाविष्ट केलेल्या एका वंशातील वनस्पतींच्या सुट्या बियांचे (लॅजिनो-स्टोमा लोमॅक्सी) व खोडांचे (लायजिनॉप्टेरीस ओल्डमिया) जीवाश्म यांचे साम्य दर्शविणारी लक्षणे लक्षात घेऊन, त्यांचा निकट संबंध ओळखला आणि ह्या वनस्पतींना ‘टेरिडोस्पर्मी’ हे सार्थ नाव दिले १९०४ मध्ये रॉबर्ट किड्स्टन यांनी न्यूरॉप्टेरीस हेटेरोफायलाच्या बीजधारी पानांचे वर्णन देऊन ऑलिव्हर व स्कॉट यांच्या शोधाला आधार दिला. पुढे १९३० मध्ये वर आधी उल्लेख केलेल्या वंशाची पाने व बिया परस्परांस चिकटलेली असे जीवाश्म आढळले.

ह्या विलुप्त गणाचे फक्त जीवाश्म आढळतात. पुराजीव महाकल्पातील डेव्होनियन कल्पापासून ते मध्यजीव महाकल्पातील जुरासिक कल्पाच्या मध्यापर्यंतच्या म्हणजे सु. ४० कोटी वर्षांपूर्वीपासून (जास्तीत जास्त २६ कोटी वर्षांपूर्वीपासून) ते १७.५ कोटी वर्षांपूर्वीपर्यंतच्या काळात पृथ्वीवरच्या वनश्रीत बीजी नेचे समाविष्ट होते. भारतातील गोंडवनी खडकांत त्यांचे जीवाश्म आढळतात. कित्येक वंशांत [मेड्युलोजा (आ. १)] हल्लीच्या ⇨ वृक्षी नेचांप्रमाणे सरळ वाढण्याइतके सबल खोड असावे, तर अनेक वंशांत दुर्बलत्वामुळे जवळच्या सबलांचा आधार घेणारे खोड असावे, कारण त्यांच्या खोडात आधार-ऊतके (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांचे — पेशींचे — समूह) फार कमी आढळतात. बहुतेकांच्या खोडांवर फांद्यांचा अभाव असून ती खोडे ३ — ६ मी. उंच होती व त्यांचा व्यास सु. २० सेंमी. होता. खोडांच्या टोकांस मोठ्या व सु. १ — १.५५ मी. लांब, संयुक्त पानांचा झुबका व तळाशी अनेक बारीक आगंतुक मुळे होती. पर्णविन्यास सर्पिल (पाने एकाआड एक) होता. ह्या गणात तीन कुलांचा तात्पुरता समावेश केलेला आढळतो : (१) मेड्युलोजेसी, (२) लायजिनॉप्टेरिडेसी आणि (३) कॅलॅमोपिटिएसी ह्यांपैकी पहिल्या दोन कुलांतील जातींची बरीच माहिती उपलब्ध आहे. अलीकडे एच्. अँड्रूज यांनी ‘टेरिडोस्पर्मोफायटा’ ह्या नवीन विभागवाचक नावाचा पुरस्कार केला असून त्यामध्ये एकूण चार कुले अंतर्भूत केली आहेत.


आ. २. मेड्युलोजाच्या खोडाचा आडवा छेद : (१) परित्वचा, (२) बाह्य मध्यत्वचा, (३) मध्यत्वचा, (४) स्रावक नलिका, (५) वाहक वृंद, (६) पर्णलेश, (७) रंभ, (८) प्राथमिक प्रकाष्ठ, (९) द्वितीयक प्रकाष्ठ, (१०) ऊतककर, (११) द्वितीयक परिकाष्ठ, (१२) आतील परित्वचा, (१३) पर्णतल.मेड्युलोजेसी : यातील खोडांचे तीन वंश (मेड्युलोजा, सट्‌क्‍लिफियाकोल्पोझायलॉन) मानले आहेत. पहिल्या दोन्हींत खोड बहुरंभी [⟶ रंभ] असून तिसऱ्यात फक्त एकच अनियमित व मोठे रंभ आढळते. प्रतेयक खोडावर अनेक ⇨वाहक वृंद (वाहक ऊतकांचे पेड) असलेली पर्णतले सर्पिल पद्धतीने मांडलेली असतात. मेड्युलोजात बहुधा दोन-तीन, क्वचित अधिक, रंभ आढळतात (आ. २). प्रत्येकाच्या मध्यवर्ती आद्यरंभातील [⟶ शारीर]⇨ मृदूतकात विखुरलेले उभयवर्धी प्राथमिक प्रकाष्ठ व त्याबाहेर द्वितीयक प्रकाष्ठ [⟶ प्रकाष्ठ] आणि ⇨ ऊतककर असतो. ऊतक-कराबाहेर द्वितीयक ⇨ परिकाष्ठ आणि सर्वच रंभाभोवती मृदूतक (मध्यत्वचा) व सर्वांत बाहेर ⇨ परित्वचा असते. मध्यत्वचेत अनेक स्त्रावक नलिका व वाहक वृंद असतात. खोडाच्या टोकास अनेक सर्पिल पर्णतलांत अनेक वाहक वृंद व कडेने ⇨ दृढोतकाचे लहान पट्ट असतात. पानांच्या सुट्या देठांच्या जीवाश्मास म्येलोझायलॉन म्हणतात. ते दोनदा किंवा तीनदा द्विशाखा क्रमाने विभागलेले असून अंतिम शाखांवर एकाआड एक दलके असतात. ॲलेथॉप्टेरीस (आ. ३) व न्यूरॉप्टेरीस (आ. ४ आणि खंड ६ मधील चित्रपत्र क्र. ४७) या नावाने पूर्वी ओळखली जाणारी काही दलके म्येलोझायलॉनाची असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मेड्युलोजा वृक्षाची अनेक आगंतुक मुळे पानांच्या तळांमधून उगम पावतात व प्रत्येकात बहिवर्धी व चतुःसूत्र आद्यरंभ असून प्राथमिक व द्वितीयक प्रकाष्ठ एकाआड एक असतात जून मुळात बाहेर परित्वचा आढळते.

आ. ३. ॲjलेथॉप्टेरिसाचे दल : (१) दलक, (२) बीज.

बीजे : काही बीजे (उदा., न्यूरॉप्टेरीस) पानांच्या दलांच्या टोकावर, अंतिम दलकाऐवजी, बनलेली आढळतात (आ. ४). ती सु. ४ — ६ सेंमी. लांब व १ — २ सेंमी. व्यासाची असतात. इतर काही बीजे बाजूच्या एका दलकाऐवजी (आ. ३) बनलेली असतात. प्रत्येकावर एक कठीण आवरण असून अशा प्रकारच्या अलगपणे

आ. ४. न्यूरॉप्टेरीस : (१) दलक, (२) बीज

सापडलेल्या सुट्या  बियांस पॅचिटेस्टा (जाड सालीचे) (आ. ५) असे वंशनाम दिले आहे. बीजाच्या टोकास ते तीन शकलांनी उघडलेले आढळते (आ. ४). बीजावरणाच्या आत एका मोठ्या टोकास देठावर बीजक असून त्याच्या टोकास परागसंपुट व त्या त परागकण आढळले आहेत. बीजकात अनेकदा स्त्री-गंतुक-धारी व अंदुककलशात अंदुक आढळते [⟶ गर्भविज्ञान]. ह्या संरचनेत सायकसगिंफो [⟶ गिंकोएलीझ]ह्यांच्या बीजकांशी साम्य दिसते. परागनिर्मिती करणाऱ्या अवयवांस डोलेरोथेका म्हणतात (आ. ६). हे घंटेसारखे असून त्याला एक लांब देठ व वाहक ऊतकयुक्त आवरण असते. आवरणाच्या आतील बाजूस लोंबत्या व संयोगित लघुबीजुक (पराग) कोशांच्या दुहेरी रांगा असतात. परागकण मोठे (सु. २५० मायक्रॉन व्यासाचे १ मायक्रॉ = १०-६ मी.) व द्विपार्श्वसमात्र (दोन बाजू सारख्या असलेले) असून त्यावर एका बाजूस दोन खोबणी व दुसऱ्या बाजूस एक शिवण असते.

  

आ. ५. पॅचिटेस्टा : बीजाचा उभा छेद : (१) बीजावरण, (२) प्रदेह, (३) परागसंपुट, (४) बीजरंध्र लायजिनॉप्टेरिडेसी: ह्यातील जातींच्या खोडांत एकच रंभ असून त्यापासून देठांमध्ये एक किंवा दोन वाहक लेश जातात. हेटेरँजियमलायजिनॉप्टेरीस (आ. ७) हे दोन वंश सामान्य आहेत प्रथम ही नावे (व लायजिनोडेंड्रॉन) फक्त खोडांना दिली जात होती. आर्किऑप्टेरीस, स्फेनोप्टेरिसपेकॉप्टेरिस ही पानांची वंशनामे आहेत. बीजे (लॅजिनोस्पर्ममलॅजिनोस्टोमा किंवा कॅलिमॅटोथेका आ. ८)लहान, ४ — ८ मिमी. लांब असून त्यांना बाहेरून चषिकाकृती (पेल्यासारखे) अवयव आहेत. काही चषिकांवर ग्रंथी (प्रपिंड) दिसतात. (आ. ७). प्रत्येक चषिका पाच छेद तळाशी जुळून बनलेली असते. चषिकेत वाहक वृंद असतात. बीजकांची संरचना बव्हंशी मागे वर्णिलेल्या न्यूरॉप्टेरिसाच्या बीजकाप्रमाणे असते. कॅलिमॅटोथेका हीनिंवौसी ही या कुलातील जाती पूर्णपणे अभ्यासली गेली आहे. हिच्या परागोत्पादक अवयवास क्रॉसोथेका म्हणतात (आ. ९) हे स्फेनोप्टेरीसपेकॉप्टेरिस यांवर

आ.६. डोलेरोथेका : पराग निर्मिणारा अवयव (उभा छेद)

आढळतात. यामध्ये प्रमुख अक्षावर लहान लहान फलनक्षम शाखा असून त्या प्रत्येक शाखेचे टोक सपाट व लांबट चतीसारखे असते त्याखाली त्याच्या किनारीवर दोन कप्पे असणारे परागकोश चिकटलेले असतात. त्यांतील परागकण सु. ४३ — ४८ मायक्रॉन व्यासाचे असतात. 

कॅलॅमोपिटिएसी : ह्या कुलात वर दिलेल्या खेरीज ज्यांत बीजी नेचांची काही लक्षणे आढळतात असे बहुतेक खोडांचे व काही पर्ण-तलांचे जीवाश्म अंतर्भूत केले आहेत. त्यात सु. ७ वंश व १६ जाती आहेत. 

बीजी नेचांच्या सर्व जीवाश्मांच्या तपशीलवार अभ्यासावरून असे दिसून येते की, आधुनिक ⇨ सायकॅडेलीझ व पुरातन सायकॅडिऑइडेलीझ [⟶बेनेटाउटेलीझ] हे विलुप्त बीजी नेचांपासून अवतरले असावे. तसेच फुलझाडांच्या [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] उगमाची समस्या सोडविण्यास ह्या वनस्पतींच्या असंख्य जीवाश्मांचा उपयोग होण्यासारखा आहे. ह्या संबंधात बीजी नेचांशी जवळचे नाते असलेल्या ⇨ केटोनिएलीझ गणाचे महत्त्वही विचारात घेण्यासारखे आहे. 


आ. ७ लायजिनॉप्टेरीस : (अ) खोडाचा आडवा व उभा छेद : (१) आगंतुक मूळ, (२) वाह्य मध्यत्वचा, (३) पर्णलेश, (४) आतील मध्यत्वचा, (५) परिकाष्ठ व परिरंभ, (६) निकाष्ठ (भेंड) किरण, (७) निकाष्ठ, (८) द्वितीयक प्रकाष्ठ (आ) बीज व प्रपिंडयुक्त चषिका : (१) प्रपिंड, (२) चषिका, (३) बीजावरण, (४) गुरुवीजुकाचे आवरण, (५) वाहक वृंद, (६) स्त्री-गंतुकधारीने व्यापलेली पोकळी, (७) प्रदेहाचे टोक, (८) परागसंपुट.

आ. ८. (अ) लॅजिनोस्पर्मम (कॅलिमॅटोथेका) : बीजाच्या चषिकांची जोडी (आ) लॅजिनोस्टोमा लोमॅक्सी : बीजाचा उभा छेद : (१) वाहक वृंद (२) स्त्री-गंतुकधारी, (३) चषिका, (४) परागसंपुट, (५) प्रदेहाचे टोक, (६) बीजकाचे आवरण.

मुख्य लक्षणे: मध्यजीव महाकल्पात (सु. २३ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) आढळलेले काही जीवाश्म वगळून फक्त पुराजीव महाकल्पातील (सु. ६० ते २४.५ कोटी वर्षांपूर्वीच्या  काळातील) बीजी नेचांचे जीवाश्म विचारात घेतल्यास त्यांची मुख्य लक्षणे सारांशरूपाने पुढे दिली आहेत. यांच्या मोठ्या  व संयुक्त पानांच्या भिन्न स्वरूपांवरून त्यांना ॲलेथॉप्टेरीस (आ. ३), स्फेनोप्टेरीस (आ. १०), न्यूरॉप्टेरीस (आ. ४) इ. वंशांत अंतर्भूत केले जाते. त्यांची बीजे शंकू किंवा फुलोरा [⟶ पुष्पबंध] यांवर आधारलेली नसून ती रूपांतरित किंवा रूपांतर न पावलेल्या पानांवर असतात तसेच ती आधुनिक सायकॅडाप्रमाणे असतात. पर्णलेशात एक किंवा अनेक पट्ट व पानांवर रोधक उपत्वचा आढळते. प्राथमिक प्रकाष्ठ भरपूर व उभयवर्धी असून द्वितीयक प्रकाष्ठ व परिकाष्ठ यांची निर्मिती होते. द्वितीयक प्रकाष्ठातील वाहिकांच्या बहुतेक अरीय (त्रिज्येच्या दिशेतील) भिंतीवर अनुलिप्त (सभोवार कडे असलेल्या) खाचा [⟶ कॉनिफेरेलीझ] असतात. परागनिर्मिती करणाऱ्या अवयवांवर स्फोट करणारे वलय नसते. कधी ते अवयव नेचांतल्याप्रमाणे ‘संधानी’ सारखे (अनेक जुळलेल्या बीजुककोशासारखे) एकत्रित वाढलेले असतात [⟶ मॅरॅटिएलीझ]. 

बीजी नेचांचा उगम बहुधा ⇨ सायलोफायटेलीझासारख्या प्रारंभिक वाहक ऊतके असलेल्या पूर्वजांपासून किंवा कार्‌बॉनिफेरस कल्पापूर्वीच्या (सु.३५ — ३१ कोटी वर्षांपूर्वीच्या) नेचांपासून झाला असावा. अलीकडेच आढळलेल्या आर्किऑप्टेरिसामधील (आ. ११) दोन प्रकारच्या बीजुकांवरून दुसरे अनुमान अधिक शक्य वाटते. फक्त बीज धारण करणे हे बीजी वनस्पतींत अंतर्भाव करण्यास पुरेसे लक्षण न मानले, तर बीजी नेचांचा समावेश नेचांतच [⟶ नेचे] करणे योग्य होईल. लेपिडोकार्‌पॉन नावाने बीज धारण करणाऱ्या ⇨ लेपिडोडेंड्रेलीझ ह्या पुराजीव महाकल्पातील वनस्पतींना लायकोपोडिनीमध्येच अंतर्भूत केले जाते [⟶ लायकोपोडिएलीझ वनस्पति, वाहिनीवंत अबीजी विभाग]. पुढे अधिक वर्णन केलेल्या पेकॉप्टेरिस (आ. १३) व स्फेनोप्टेरीस (आ. १०) यांच्या पानांवर   आढळलेल्या प्रजोत्पादक अवयवांचा मॅरॅटिएसी ह्या

आ.९. क्रॉसोथेका : परागोत्पादक अवयव. आ.१०. स्फेनोप्टेरीस : पान व त्यावरील बीजे.

कुलाशी [⟶ मॅरॅटिएलीझ]आप्तभाव स्पष्ट दिसतो तहीरी ते अवयव बीजी वनस्पतींचे नव्हेत, असे सिद्ध झालेले नाही. ह्या प्रजोत्पादक अवयवांपैकी काही बीजी नेचांचे परागोत्पादक अवयव असावे असे दिसते. बीजी नेचांचे इतर नेचांशी असलेल्या आप्तभावांत काही शारीरिक लक्षणे व पानांचे स्वरूप याला महत्त्व आहे परंतु पानांतील स्वरूपसाम्य वरवरचे असते. नेचे व बीजी वनस्पती यांच्या खोडातील संक्रमण-लक्षणांवरून बीजी नेचांना प्रथम ‘सायकॅडोफिलिसिस’ हे नाव दिले होते, हे मागे सांगितलेच आहे. नेचांशी निश्चितपणे आप्तभाव दर्शविणारे प्रजोत्पादक अवयव बीजधारी वपस्पतीवर प्रत्यक्ष आढळल्याशिवाय किंवा त्यांचा संबंध अन्य प्रकारे निश्चित झाल्याशिवाय नेचे आणि बीजी नेचे यांचा संबंध प्रस्थापित करणे कठीण आहे.  

आ.११ आर्किऑप्टेरीस : वंध्य व फलनक्षम भागांतील भेद दर्शविणारी पाने.स्कॉटलंडच्या किलपॅट्रिक टेकड्यांतील पूर्व कार्वानिफेरस (सु. ३५ कोटी वर्षांपूर्वीच्या) थरात आढळलेल्या कॅलॅथोस्पर्मम (आ. १२) ह्या बीजधारी चषिकारूप जीवाश्मांवरून बीजी नेचांचा खऱ्या नेचांशी जवळचा संबंध नसावा असे मानतात तसेच नेचांच्या शिझीएसी कुलात [⟶ नेचे]आढळणाऱ्या बीजुककोशासारख्यांचा अपवाद वगळल्यास, खऱ्या नेचांचे जीवाश्म उत्तर कार्बॉनिफेरस (सु. ३१ कोटी वर्षापूर्वीच्या) खडकांखाली आढळत नाहीत. यावरून नेचे व

आ. १२. कॅलॅथोस्पर्मम स्पॉटिकम : बियांसह चषिकेचा उभा छेद.

बीजी नेचे यांचा उगम स्वतंत्र रीत्या प्रारंभिक नेचांपासून झाला असावा.‘बीजी नेचे’ ह्या संज्ञेचा अर्थ बीजी वनस्पतींचे ‘पूर्वज नेचे’ असा करणे चुकीचे ठरते.

सायकॅडांच्या (सायकससारख्या वनस्पतींच्या) लक्षणाशी असलेल्या साम्यांवरून बीजी नेचांना ‘शंकुहीन सायकॅड’ किंवा बीजे असणारे नेचे असे म्हणणे सारखेच तर्कशुद्ध दिसते. खोडातील रंभ नेचांतील रंभासारखे असले, तरी एकूण सर्वच रचना सायकॅडाच्याप्रमाणे असते. मेड्युलोजाच्या सर्वच अवयवांची लक्षणे सायकॅडांच्याशी जवळचे नाते दर्शविण्यास उपयुक्त आहेत. उच्च दर्जाच्या प्रकटबीजी वनस्पतींच्या पानांवरची उपत्वचा काही बाबतींत बीजी नेचांसारखी असते तथापि ⇨ कॉर्डाइटेलीझ आणि ⇨कॉनिफेरेलीझ यांचे पूर्वज बीजी नेचांपैकी असावेत, असे मानण्यास सबळ पुरावा नाही.⇨ गिंकोएलिझाची पाचरीसारखी पाने पुराजीव महाकल्पातील बीजी नेचांपासून अवतरली असणे शक्य आहे. बीजी नेचांच्या इतिहासात सुरुवातीनंतर त्यांचे अनेक गट अलग झाले असून कदाचित काही गट प्रथमतःच स्वतंत्रपणे उगम पावले असावेत. इतर कित्येक जीवाश्म गटांप्रमाणे बीजी नेचांबद्दल अद्याप बरीच गूढता आहे. आवृतबीज वनस्पतींच्या पूर्वजांचा शोध घेण्यास सर्वांत योग्य उत्पत्तिस्थान बीजी नेचांमध्ये असल्याचे संभवते. 

आ. १३. पेकॉप्टेरिसाचे दलक. पेकॉप्टेरिस : पुराजीव महाकल्पातील पेनसिल्व्हेनियन (सु. ३२ ते २८ कोटी वर्षापूर्वी काळात) व पर्मियन (सु. २७.५ ते २४.५ कोटी वर्षापूर्वीच्या काळात) कल्पांत जीवाश्मरूपाने आढळणाऱ्या व नेचसारख्या दिसणाऱ्या पर्ण-वंशाचे नाव. अनेक नैसर्गिक वंशांशी संबंध असणारा संयुक्त पानांचा हा कृत्रिम व मोठा गट आहे. यांपैकी कित्येकांवर नेचासारखे प्रजोत्पादक अवयव (उदा., ॲस्टेरोथेका, स्कोलेकॉप्टेरीस इ.) असतात, तर काहींत बीजी नेचांसारखी बीजे

अथवा परागोत्पादक अवयव असतात. अशा वेळी त्या जीवाश्मांना या नावाऐवजी ज्या त्या प्रकारच्या प्रजोत्पादक अवयवाचे नाव दिले जाते. पेकॉप्टेरिस या नावाच्या पानांची दलके (आ. १३) बहुधा लहान, कडा समांतर किंवा किंचित वक्र व तळाशी रुंद असून दलाच्या शिरेवर सर्व तळ चिकटलेला असतो तळभाग क्वचित थोडा संकुचित असतो दलकाच्या पात्यातील मध्यशीर एकच असून ती टोकापर्यंत जाते व बाजूच्या शिरा साध्या किंवा दुभंगलेल्या, सरळ किंवा कमानीसारख्या असतात. दलके परस्परांपासून पूर्णपणे स्वतंत्र अथवा कधी बाजूने थोडीफार जुळलेली असतात.पेकॉप्टेरिस प्‍लकेनेटी ह्या जातीत दलकांच्या कडेवर लहान शिरांच्या टोकावर बीजे आढळतात. पेकॉप्टेरिसाच्या पानांवर क्रॉसोथेका सॅजिटाटा (आ. ९) — परागोत्पादक अवयव — आढळले आहेत. भारतात पूर्व गोंडवनी खडकात (राणीगंज माला) पेकॉप्टेरिस फेगोप्टेरॉइड्स ही जाती आढळते.


ग्‍लॉसोप्टेरीस : पुराजीव महाकल्पातील पर्मियन कल्पात आपल्या विशेषत्वाने, वैपुल्याने व जीवाश्मरूपाने परिचित झालेल्या वनस्पतींचा वंश. त्या वेळच्या उत्तर अक्षांशांत असलेल्या

आ. १४. ग्‍लॉसोप्टेरीस : (१) पान, (२) सिराविन्यास (शिरांची मांडणी).

इतर  वनस्पतींहून ह्या वंशातील जाती बऱ्याच भिन्न होत्या. त्यांचे जीवाश्म विशेषेकरूप भारतात, द. गोलार्धातील मध्य व द. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, द. अमेरिका व अंटार्क्टिका (द. ध्रुव प्रदेश) यांतील मोठ्या प्रदेशांत (प्राचीन गोंडवन भूमी) आढळतात. पर्मियन काळी दक्षिण गोलार्धातील बऱ्याच मोठ्या क्षेत्रात पसरलेल्या हिमनद-जलवायुमानाशी (दीर्धकालीन सरासरी हवामानाशी) त्या वनस्पती समरस होऊन विकास पावल्या. ऑस्ट्रेलियातील तरंगणार्या बर्फाने निपेक्षित केलेल्या (साचलेल्या) टीलाइटांतील (एक प्रकारच्या गाळाच्या खडकांतील) सपक्ष परागांसंबंधी अलीकडे झालेल्या शोधामुळे ग्‍लॉसोप्टेरीस वनस्पतींचा विकास हिमनदनापूर्वी झालेला नसून त्यातच झाला ही गोष्ट वादातीत झाली आहे. हे सपक्ष पराग ग्‍लॉसोप्टेरिसा बरोबर इतरत्रही आढळतात.

ह्या वनस्पतींची पाने साधी, अखंड, बिनदेठांची किंवा आखूड देठाची, चमच्यासारखी किंवा लंबगोल किंवा रेखाकृती असून मध्यशीर स्पष्ट व बाजूच्या शिरा कमानीसारख्या, जवळजवळ आणि सर्व शिरांची मांडणी जाळीदार होती (आ. १४). त्यांची मांडणी काहींमध्ये मंडलाकृती असे. पानांच्या जिभेसारख्या आकारावरून या वंशाचे ‘जिव्हापर्ण’ हे नाव सार्थ वाटते (ग्‍लॉसा = जिव्हा). अनेकदा ही पाने मूलक्षोडावर [व्हर्टिब्रॅरिया ⟶ खोड] आढळली आहेत. द. आफ्रिकेत आढळणाऱ्या काही जातींत प्रजोत्पादक अवयव आढळतात हे द्विपार्श्वसमात्र चषकासारखे असून पानाच्या तळाजवळ मध्यशिरेवर व आखूड देठावर आधारित होते. त्यांच्या आतील अर्धपृष्ठावर अनेक लहान लंबगोल कोश असून त्यांत बीजे असावी, असा समज आहे. यावरून ह्या वनस्पती बीजी नेचांपैकी असाव्यात असे समजतात [⟶ पुरावनस्पतिविज्ञान].भारतात (दामोदर दरीत आढळणाऱ्या — दामुदा माला) ग्‍लॉसोप्टेरिसाच्या १६ जाती आढळतात. भारतात ह्यासंबंधीची बरीच माहिती लखनौ येथील कृ. रा. सुरंगे यांनी प्रसिद्ध केली आहे.

पहा : नेचे पर्मियन व पर्मो-ट्रायासिक पादपजाति पुरावनस्पतिविज्ञान वनस्पति, बीजी विभाग वनस्पति, आवृतबीज उपविभाग वनस्पति, प्रकटबीज उपविभाग शारीर, वनस्पतींचे सायकॅडेलीझ.

संदर्भ :  1. Andrews, H. N. Studies in Palaeobotany, New York, 1967.

             2. Arnold, C.A. An Introduction to Palaeobotany, New York, 1947.

             3. Dey, A. K. Geology of India, New Delhi, 1968.

             4. Davis, A. M. An Introduction to Palaeontology, London, 1961.

             5. Dittmer, H, J. Phylogeny and Form in the Plant Kingdom, Princeton, 1964.

             6. Mukherji, H. Ganguli, A. K. Plant Groups, Calcutta, 1964.

             7. Surange, K. R. Indian Fossil Pteridophyta, New Delhi, 1966.

परांडेकार, शं. आ.