खाजकोलती : (कोळती हिं. बरहंता क. तुरची सं. वृश्चिकाली लॅ. ट्रॅजिया इन्व्होल्यूक्रॅटा कुल-यूफोर्बिएसी). ही दिसायला नाजूक पण कातडीला स्पर्श होताच खाज आणणारी ओषधीय [→ ओषधि] लहान वेल भारतातील पहाडी जंगलात, शिवाय श्रीलंका व ब्रह्मदेश ह्या देशांत आढळते. स‌र्वांगावर पांढरे राठ दाहक केस असतात. पाने साधी, लहान, भिन्न आकाराची, प्रकुंचित (निमुळत्या टोकाची) व दंतुर असतात. एकलिंगी, पिवळी, स‌वृंत (देठयुक्त) फुले कक्षास्थ (बगलेतील) किंवा अग्रस्थ (शेंड्यावरील) मंजऱ्यांवर नोव्हेंबर-डिसेंबरात येतात. अनेक पुं-पुष्पे वरच्या भागात आणि थोडी स्त्री-पुष्पे खालच्या भागात अशी मंजऱ्यांवर असतात [→ यूफोर्बिएसी]. बोंड तीन कप्प्यांचे, लहान, पांढरट व केसाळ. बिया गोल व गुळगुळीत असतात. ही वनस्पती नावाप्रमाणे कंडूत्पादक (खाज आणणारी) असते तसेच ती घाम आणणारी व शरीरास जोम आणणारी आहे. कडक तापात हातपाय थंड पडतात किंवा दुखू लागतात तेव्हा हिच्या मुळांचा काढा देतात. रक्तपितीवर मूळ उगाळून लेप देतात नारू काढण्यासही लेप उपयुक्त हिच्या पानांची पूड सुंठ व कायफळ यांसह डोकेदुखीवर देतात. टक्कल पडलेल्या डोक्याला पाण्यांतून फळे चोळतात.                    

पटवर्धन, शां. द.