स्फेनोफायलेलीझ : हा कॅलॅमोफायटा विभागाच्या एक्विसीटीनी वर्गामधील स्फेनोप्सिडा उपसंघातील एक विलुप्त आणि म्हणून हल्ली फक्त जीवाश्मरूपातच आढळणार्‍या वनस्पतींचा गण आहे [⟶ वनस्पति, वाहिनीवंत अबीजी विभाग ]. यामध्ये स्फेनोफायलम या एकाच प्रजातीची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. उत्तर डेव्होनियन ते ट्रायासिक कल्पापर्यंत ( सु. ३२ ते १५.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात ) या प्रजातीतील जाती अस्तित्वात होत्या व पुढे त्या नामशेष झाल्या. एक्विसीटेलीझ या गणातील वनस्पतींप्रमाणे स्फेनोफायलेलीझ गणातील वनस्पतींच्या बारीक ( व्यास सु. १ सेंमी.) शाखायुक्त खोडावर ( बीजुकधारी ) उभे कंगोरे व खोबण्या आणि पेर्‍यांवर पानांची मंडले होती. पाने तळाशी टोकदार, बिनदेठाची, लांबट त्रिकोणासारखी ( त्यावरून ‘ स्फानपर्णी ’ हे नाव पडले ग्रीक भाषेत स्फेन म्हणजे पाचर ), अखंड किंवा द्विशाखाक्रमाने विभागलेली व तशाच द्विशाखाक्रमी शिरा असलेली, लांबी सु. २ सेंमी. आणि संख्येने बहुधा ६ किंवा ९ व जास्तीत जास्त १८ असून ती प्रकाशसंश्लेषणासाठी उपयुक्त होती. कांड्यावरील कंगोरे एकाआड एक ( एक्विसीटेलीझप्रमाणे ) नसून उपरिस्थित खोडातील प्राथमिक प्रकाष्ठ त्रिसूत्री किंवा षट्सूत्री असून रंभअरीय प्रकारचे द्वितीयक वृद्धीमुळे [ शारीर, वनस्पतींचे ] नवीन द्वितीयक प्रकाष्ठ व परिकाष्ठाची भर पडत असून परित्वचा थरही आढळतात. फांद्यांच्या टोकांस लांबट शंकू (बोमनाइटे ) असून त्यामध्ये बीजुककोशदंडाची व वंध्य छदांची गर्दी आढळते. बीजुककोश देठांच्या टोकांवर असून हे देठ छदांशी तळास चिकटलेले व एकांतरित असत दोन्हींची मांडणी मात्र मंडलाकार असे. बहुतेक जातींत बीजुके एकाच प्रकारची होती. क्वचित काही बीजुककोशात नित्यापेक्षा मोठी बीजुके आढळल्याने काहीसे ( अल्प ) असमबीजुकत्व असावे असे म्हणता येते.

स्फेनोफायलमच्या जाती वेलीप्रमाणे असाव्यात असे मानतात. भारतात बारकर व राणीगंज माला येथे स्फे. स्पेसिओजम ही जाती आढळते.

पहा : एक्विसीटेलीझ कॅलॅमाइटेलीझ वनस्पति, वाहिनीवंत अबीजी विभाग.

संदर्भ : Smith, G. M. Cryptogamic Botany, Vol. II, Tokyo, 1955.

परांडेकर, शं. आ.