मरुवनस्पति : (लॅ. झेरोफाइट्‍स ). वनस्पतींच्या बाबतीत पाणी हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यांची सर्व जीवनकार्ये आसमंतातील पाण्याच्या कमीजास्त प्रमाणाद्वारे नियंत्रित होतात. त्यांची शारीरिक संरचना व शरीरक्रिया यांवर भूमीतील पाण्याचे प्रमाण व हवेतील आर्द्रता यांचा फारच मोठा प्रभाव पडलेला आढळतो त्यांतील पाण्याच्या अंशाशी त्यांचे अनुकूलन झालेले असते [ त्यांनी जुळवून घेतलेले असते ⟶ अनुकूलन वनस्पति व पाणी ]. आसमंतातील पाणी भरपूर प्रमाणात असणे किंवा ते फारच कमी असणे ही या परिस्थितीची दोन टोके असून एका टोकाच्या परिस्थितीशी समरस झालेल्या वनस्पती दुसऱ्याटोकाच्या परिस्थितीशी अनुकूलन दर्शविणाऱ्यावनस्पतींहून शारीरिक व क्रियात्मक दृष्ट्या बर्‍याच वेगळ्या असतात. सदैव पूर्णत: किंवा अंशत: पाण्यातच वाढणाऱ्यावनस्पतींना ⇨जलवनस्पती म्हणतात या उलट पाण्याचे अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष दुर्भिक्ष असलेल्या ठिकाणी ( मरूस्थले, खडकाळ वा वाळवंटी प्रदेश. समुद्रकिनारे. खारी किंवा अम्‍लीय दलदल,  बर्फाळ प्रदेश इत्यादींत ) वाढू शकणाऱ्यावनस्पतींना ‘मरुवनस्पती’ म्हणतात. जलवनस्पती व मरूवनस्पती या दोन्ही टोकांदरम्यानच्या परिस्थितीत ⇨मध्यवनस्पती हा गट असतो. उपलब्ध होईल तेव्हा व असेल तितके पाणी शरीरात घेणे, कमीजास्त प्रमाणात ते साठविणे, त्याचा अत्यंत काटकसरीने वापर करणे व शक्य तितके पाणी शरीराबाहेर न जाऊ देणे हे मरूवनस्पतींचे वैशिष्ट्य असून त्यासाठी त्यांच्या मूळ, खोड व पाने यांच्यात रूपांतर घडून आलेले आढळते.

पृथ्वीवरील सु. २० – २५ % पृष्ठभाग मरूस्थल किंवा रूक्ष प्रदेश या सदरात येतो व त्यातील वनस्पतींना मरूवनस्पती म्हणता येईल तथापि उरलेल्या ७५ – ८० % क्षेत्रात अशी लहानमोठी असंख्य स्थाने आहेत की, जेथे वर्षातील बराच काळ पाणी दुर्लभ असते. तेथेही मरूवनस्पती आढळतात एखाद्या खडकावर किंवा झाडांच्या खोडाच्या सालीवर वाढणाऱ्याशैवाक ( दगडफूल ), शेवाळी, शैवले, कवक ( बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती ) इ. वनस्पतींना खऱ्यामरूवनस्पतीइतकीच पाण्याची दुर्मिळता जाणवते. [ ⟶ अपिवनस्पति ]. त्यामुळे इतर मरूवनस्पतींपेरमाणे त्यांच्यातही काही लक्षणे मरूस्थलातील जीवनास सोयीची अशी आढळतात. जलवनस्पतींशी तुलना करता मरूवनस्पतींची संख्या फारच जास्त आहे. ⇨कॅक्टेसी कुल ( नागफणा कुल ) व ⇨यूफोबिंएसी कुल( एरंड कुल )यांसारख्या कुलांत मरूवनस्पतींचा भरणा मोठा आहे तथापि इतर कित्येक कुलांत काही जलवनस्पतीं, काही मरूवनस्पती व अनेक मध्यवनस्पती आढळतात. परिस्थितिसापेक्ष रूक्षतानुकूलित लक्षणे काही वंशांत किंवा जातींत कमी तर काहींत जास्त असतात एकाच वंशातील ( उदा., यूफोबिंया ) काही जाती आत्यांतिकमरूवनस्पती ( उदा., त्रिधारी निवडुंग, वई निवडुंग नांग्या शेर ) , तर काही ( उदा., पानचेटी, गोवर्धन, नायटी इ. ) मध्यवनस्पतींप्रमाणे असतात. ⇨अँस्क्लेपीएडेसी कुलातील ( रूई कुलातील ) भिन्न  वंशांतील काही जाती ( उदा., विलायती वाकुंडी काकतुंडी, शेतकावळी, उतरणी इ.) ( उदा., माकडशिंग, सोमलता इ. ) मरूवनस्पतीपैकी असून इतर कित्येक विलायती वाकुंडी, काकतुंडी, शेतकावळी, उतरणी इ. ) मध्यवनस्पती आणि काही ( उदा., रूई, दूधवेल इ. ) अंशत: मरूवनस्पती आहेत. ⇨क्रमविकासाच्या ( उत्क्रांतीच्या ) सिद्धांताप्रमाणे एकाच कुलातील वा वंशातील जाती समान( उदा.,पूर्वजांपासून अवतरल्या असून भिन्न मरूवनस्पती स्वतंत्रपणे भिन्न नैसर्गिक गटांत ( गण, कुल, वंश इ. ) विकास होत आल्या आहेत त्यांच्या ‘समाभिरूपी क्रविकासा’त [ भिन्न गटांच्या क्रमविकासात समान बदल झाल्याने काही लक्षणांत साम्य येत जाऊन त्यांचे खरे स्वरूप ओळखणे कठीण होण्याइतपत अंतिम स्वरूप एकसारखे होण्याच्या क्रियेत ⟶ क्रमविकास ] कमीजास्त प्रमाणात रूक्षतानुकूलित लक्षणे त्यांना प्राप्त झाली आहेत त्या मूळच्या मध्यवनस्पती असाव्यात.

प्रकार : मरूवनस्पतींत तीन प्रकार ओळखण्यात येत असून त्यांची वैशिष्ट्ये खाली दिल्याप्रमाणे आहेत.

अल्पायुषी : मरूप्रदेशात यांची संख्या मोठी असली, तरी त्यांचे आकारमान लहान असते कारण त्यांचे जीवनचक्र पावसाळ्यातील ४ – ६ महिन्यांत पूर्ण होते वर्षातील उरलेल्या काळात त्या फक्त बीजरूपातच ( किंवा बीजुकरूपात म्हणजे सूक्ष्म प्रजोत्पादक घटकरूपात ) असतात. ( उदा., काही गवते, ऑर्किडे, नेचे, जेरिकोचा गुलाब इ. )वर्षातील रूक्ष काळच त्यांनी टाळल्यामुळे त्यांना ‘रूक्षता टाळणाऱ्या’ किंवा ‘रूक्षेतून निसटणार्‍या’ असे म्हणतात त्यांची वाढ आणि प्रजोत्पादन जलद गतीने होते.

रसाळ वनस्पति : नावाप्रमाणे या बहुवर्षायू ( अनेक वर्षे जगणाऱ्या) वनस्पती उपलब्ध असेल तेव्हा ( पावसाळ्यात ) भरपूर पाणी शोषून घेतात व ते आपल्या शाकीय अवयवांत ( पाने, खोडे व मुळे यांत ) साठवून ठेवतात त्यामुळे ते अवयव रसाळ ( मांसल ) बनतात. एकाच जातींत सर्वच अवयव रसाळ न बनता बहुधा एखाद्या अवयव रसाळ बनतो व त्याप्रमाणे ‘रसालपर्णी’,  ‘रसालस्तंभी’ किंवा ‘रसालमूली’ अशी विशेषने त्यांना देता येतात. उदा., कोरफड, पानफुटी, घोळ, सेडम व कॉटिलेडॉन या ‘रसालपर्णी ’ असून कांडवेल, नागफणा, वई निवडूंग, त्रिधारी निवडुंग, माकडशिंग, माचुरा, माचूल इ. ‘रसालस्तंभी’ आहेत तर पेलारगॉनियम, ऑक्झॅलिस याच्या जाती, वि १२ – ८२ रताळे, मुळा, गाजर, गुलबुश व बीट यांना ‘रसालमूली’ म्हणता येईल. या सर्वच रसाळ अवयवांत जलसंचयी कोशिकांचे ( पेशींचे ) ऊतक ( समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांचा समूह ) असून त्या कोशिका पाण्याने तुडुंब भरलेल्या असतात. मुळे जमिनीच्या वरच्या थरातील पाणी शोषून घेतात व काहींत ते मुळांतच साठविले जाते. रसालपर्णी वनस्पतींचे ⇨त्वग्रंध्रे ( पानांवरील छेद्रे ) दिवसाऐवजी रात्रीच खुली राहत असल्याने बाष्पीभवन कमी होते त्यांनी साठविलेल्यांपैकी २५ % पाण्याचा अटळ नाश सोसून या वनस्पती जगतात. बाहेरून पाणी मिळत नाही, त्या वेळी बाष्पीभवन कमी होते पण मांसलपणा कमी होत नाही. घायपात, कॉटिलेडॉन, कॅक्टेसी कुलातील मॅमिलॉरिया, एकिनोकॅक्टस, सोरियस इ. वंशांतील वनस्पती रसाळ गटात येतात व साठविलेल्या पाण्याचा उपयोग त्या टंचाईच्या काळात करतात. जमिनीतील व हवेतील उष्णतेचा परिणाम म्हणून त्यांच्या शरीरावर काटे येतात त्यामुळे त्यांचे प्राण्यांपासून संरक्षण होते.

रसहीन वनस्पती : या वनस्पती मांसल नसतात. पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे वनस्पती म्‍लान होतात व पूर्ण ग्‍लानता आली असतानाही त्या जगू शकतात. अशा वनस्पतींत जमिनीतील पाणी कमी होण्यापूर्वी आदिमूल फार जलद गतीने वाढते प्ररोहाशी ( कोंबाशी ) तुलना केल्यास मूल – तंत्राचा ( मूल – संस्थेचा ) विस्तार फारच मोठा होतो. उदा., मेस्काइटाची मुळे सु. २० मी. खोल जातात, तर लसूण घासाची ( आल्फाल्फाची ) सु. ४० मी. खोल जातात. राजस्थानच्या मरूस्थलातील रूईची ( मांदाराची ) मुळेही बरीच खोलवर जातात तसेच त्यांचा बाजूचा विस्तारही मोठा असतो. सहारा वाळवंटातील कॅलिगोनम कोमोजम ( पॉलिगोनेसी कुल ) वनस्पतीची मुळे १ मी. खोलीवर पसरतात पण तिच्या प्ररोहाची उंची ४० – ५० सेंमी. च्या वर नसते.


सर्वसाधारण लक्षणे : पुढे दिलेली मरूवनस्पतींची सर्वसाधारण लक्षणे वर दिलेल्या कोणत्याही गटातील मरूवनस्पतींची कमी जास्त प्रमाणात आढळणारी आहेत. त्या लक्षणांमुळे बाष्पोच्छ्वास ( वाफेच्या रूपाने पाणी बाहेर टाकण्याची क्रिया ) कमी होणे व त्याचबरोबरच सूर्यप्रकाशात त्यांची शरीरे तापण्यापासून संरक्षण मिळणे ही उद्दिष्टे मुख्यत : साध्य होतात.

आ. १. काही मरूवनस्पतींच्या पानांच्या भागांचे आडवे छेद : ( अ ) हॅकिया : (१) जाड उपत्वचा, ( २ ) खेलवर गेलेले त्वग्रंध्र, ( ३) दाट स्कंभोतक ( लांबट कोशिकांचा थर ), (४ ) आधार ऊतक (आ) लाल कण्हेर : ( १ ) अपित्वचा, ( २) स्कंभोतक, ( ३) सुविरल मध्योतक [ ⟶ मध्योतक ], ( ४) त्वग्रंध्र ( इ ) स्टायपा कॅपिलॅटा ( गवत ) : ( इ१ ) पान वरच्या बाजूस गुंडाळलेले , ( इ२ ) उघडलेल्या पानाचा डावा अर्धा भाग : ( १) पानाची ( त्वग्रंध्ररहित ) खालची बाजू, ( २ ) पानाची त्वग्रंध्रयुक्त वरची बाजू, ( ३) त्वग्रंध्रे, ( ४ ) सात्मीकारक ऊतक.

पाने : मरूवनस्पतींची पाने आणि खोडे यांमध्ये रूक्षतानुकूलनार्थ विशेष अनुयोजना आढळतात. कित्येक जातींत पानांचे आकारमान बरेच लहान असून ती अधिक चिवट व सदाहरित असतात आणि त्यांमध्ये पाण्याचे प्रमाण फार कमी असते. त्यांच्या अंतर्रचनेत कठककोशिका ( कठीण आवरणाच्या कोशिका ), लहान कोशिकांनी बनलेली अप्रभेदित ( कार्यविभागणीनुसार रूपांतरण न झालेली ) मध्यत्वचा व तीत अंतराकोशिका ( कोशिका – कोशिकांमधील ) पोकळ्या फार कमी असतात काही पाने समद्विपार्श्व ( दोन्ही पृष्ठभाग सारखे असलेली ) असताता. ⇨अपित्वचेतील कोशिकांची बाहेरची भिंत व ⇨उपत्वाचा जाड असून अपित्वचेत कोशिकांचे थर अनेक असतात   ⇨अभित्वचेत दृढोतक ( कठीण आवरणाच्या कोशिकांचा समूह ) असते ( उदा., सायकस, पाइन ). मेण, रेझिने आणि चूर्णीय कण यांचेही लेप असतात. त्वग्रंध्रे अरूंद झाल्याने व ती खोलवर गेल्याने किंवा त्यांवर लवाच्छादन बनल्याने स्थिर व ओलसर हवा धरून ठेवणाऱ्याजागा अपित्वचेत निर्माण होतात. या प्रकारे वनस्पतींच्या शरीरातील हवेची सतृप्ति – न्यूनता ( तूट ) कमी होते आणि बाष्पीभवनावर मर्यादा पडते. तथापि आतप- पर्णाप्रमाणे ( ज्यावर सूर्यप्रकाश अधिक प्रमाणात पडतो अशा पानाप्रमाणे ) त्वग्रंधे अनेकदा विपुल आढळतात. व हवा फार कोरडी नसेल, त्या वेळी ही रंध्रे उघडी असल्यास प्रकाशसंश्लेषणाला [ ⟶ सूर्यप्रकाशात हरितद्रव्याच्या साहाय्याने पाणी व कार्बन डाय – ऑक्साइड यांच्यापासून साधी कार्बोहायड्रेटे बनविण्याच्या क्रियेला   ⟶ प्रकाशसंश्लेषण ] अधिक चालना मिळते. पानांची पाती उभी असल्यास ( उदा., आयरिस, बाळवेखंड, बेलमकँदा, जखमी )  सूर्यप्रकाशाचे किरण पात्याच्या कडांवर पडल्याने ती तापत नाहीत पाती लोंबती राहण्यानेही हाच परिणाम घडून येतो ( उदा., ऑस्ट्रेलियातील यूकॅलिप्टसच्या काही जाती ) यापुढची पायरी म्हणजे देठाचे पात्यात रूपांतर ( वृंतपर्ण ) व मूळच्या पात्याचा लोप ( उदा., ऑस्ट्रेलियातील एक बाभूळ ) त्याही पुढची पायरी म्हणजे संपूर्ण पानाचा लोप [⟶ नेपती सोमलता ] होतो. यामुळे बाष्पोच्छ्‍वासाला चांगलाच आळा बसतो. कित्येक पानझडी वृक्षांची

[ शुष्कार्द्र वनस्पतींची  ⟶ मध्यवनस्पति ] पाने कोरड्या ऋतूच्या आरंभी गळून पडतात व पुढे पावसाच्या आरंभी येतात. सदापर्णी वृक्षांमध्ये ही पाण्याच्या हानीची समस्या सोडविण्यासाठी पानांचे आकारमान, फांद्यांची संख्या व विस्तार आणि संपूर्ण वृक्षाचे किंवा झुडपाचे आकारमान यांत कपात केली जाते. त्यामुळे वनस्पती खुरटी ( खुजी ) होते. अँझोरेला सेलॅगो ही वनस्पती तर उशीसारखी असते. तिच्या संरचनेत प्रमुख अक्ष पुन : पुन: विभागलेला आढळतो. ( आ. २ ). एरिकेसी [⟶ एरिकेलीझ ] कुलातील काही जातींत पानांच्या कडा मध्यरेषेकडे वळून सुरळी बनते काही वालुकाराशीवर किंवा तृणसंघातात ( स्टेप्समध्ये ) वाढणाऱ्याकाही गवतांत अशी अनुयोजना कोरड्या ऋतूत तात्पुरती झालेली आढळते. आपल्या परिचयातील कित्येक गवतांची पाने उन्हाळ्यात काही वेळ सुरळीसारखी गुंडाळलेली आढळतात. कित्येक मरूवनस्पतींना पाने नसल्यामुळे किंवा ती जाड खवल्यासारखी असल्याने बाष्पोच्छ्‍वास बराच कमी होतो. उदा., झाऊ , थुजा, जुनिपेरस व खाऱ्याजमिनीवर वाढणारी माचुरा व माचूल दलदलीत वाढणारे एक्किसीटम व रूक्ष भूमीत वाढणारी रस्कस व ⇨खडशेरणीसारखी झाडे यांचीही पाने लहान खवल्यासारखी असून खोड व फांद्या हिरव्या असतात. ⇨नागफणा व ⇨निवडुंगाच्या  काही जातींत पानांचे रूपांतर काट्यात झालेले आढळते   ⇨नांग्या शेराची फार लहान हिरवी पाने लवकरच गळून पडतात   ⇨सोमलतेला पानेच नसतात, तर काही निवडूंगाच्या जातींत काही कलानंतर पाने पडून जातात. अशा सर्व वनस्पतींत पानांच्या अभावी त्यांचे कार्य त्यांच्या हिरव्या खोडांनी [ पर्णक्षोड   ⟶ खोड ] केले जाते हे क्षोड कधी सपाट पानांसारखे ( उदा ., वेली निवडूंग, नागफणा , रस्कस, मुहलेनबेकिया ) तर कधी दंडाकृती ( चितीय ) आणि कोनीय असते [ उदा., त्रिधारी व चौधरी निवडूंग, कांडवेल, नांग्या शेर इ.  ⟶ खोड ]. ⇨अपिवनस्पतींतही पाण्याच्या समस्येला जमवून घेण्यास मरूवनस्पतींप्रमाणे काही अनुयोजना आढळतात. कित्येक ऑर्किडांची [ ⟶ऑर्किडेसी ] वायवी मुळे हिरवी बनून अन्ननिर्मितीत भाग घेतात तसेच ती पावसाचे पाणीही शोषून घेतात व त्या वनस्पतींस आधार देतात. हे पाणी त्यांची पाने साठवून ठेवतात. व परिणामही ती मांसल बनतात.

काटे : बहुतेक मरूवनस्पतींमध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन मजबुतपणा कमी होण्याचा धोका अटळ असतो. तो टाळण्याकरिता दृढोतकाचा विकास अधिक होतो त्याचा एक परिणाम म्हणून शरीरावर तीक्ष्ण व कमीअधिक लांबीचे काटे येतात. पाने ( उदा., निवडूंग ) फांद्या ( उदा., मेंदी, डाळिंब, करवंद ), उपपर्णे ( उदा., बोर व बाभूळ ) यांच्या रूपांतरापासून हे काटे बनतात. काहींत ( उदा., काटेधोत्रा व गुलाब ) ते खोड किंवा पाने यांच्या पृष्ठभागावर निर्गमन किंवा उत्थिते ( वरच्या वर वाढून येणारी काही उपांगे ) या स्वरूपात येतात त्यांचा त्या वनस्पतींना काही प्राण्यांपासून संरक्षण मिळण्यास उपयोग होतो. अँकँथोर्‍हायझा या तालवृक्षाच्या खोडावरचे काटे मुळांच्या रूपांतराने बनलेले असताता. मरूस्थलातील जीवनाशी समरस होण्यास फुलांमध्ये फार थोडे फरक फडतात परंतु फळांची संरचना, तडकणे, विकिरण ( विखुरणे ) व बीजे यांमध्ये काही अनुयोजना आढळतात.

आ. २. अँझोरेला सेलॅगो : ( १ ) उशीसारखी वनस्पती, ( २) संरचना दर्शविणारी आकृती.


विशिष्ट प्रकारच्या शरीररचनेमुळे रूक्ष प्रदेशांत वाढणाऱ्यावनस्पतींतून बाष्पोच्छ्‍वास कमी वेगाने होतो व त्यामुळे त्यांचे जलनाशापासून संरक्षण होते. असा समज १९१२ पूर्वी व ए. एफ्‍. डब्ल्यू. शिंपर यांच्या गृहीतकाला धरून होता परंतु भरपूर पाणी दिले असता मरूवनस्पती व मध्यवनस्पती यांच्या शरीरावरील समान आकारमानाच्या क्षेत्रातून होणारा बाष्पोच्छ्‍वास मरूवनस्पतींत अधिक होतो, असे त्यानंतर प्रयोगान्ती सिद्ध झाले. ज्या संरचनेमुळे बाष्पोच्छ्‍वास कमी होतो असे वाटले, तिचा उलटा परिणाम व्हावा हे अनपेक्षित आहे. या विरोधाभासाचे गूढ चांगलेसे उकललेले नाही. रूक्षतानुकूलित संरचना मरूवनस्पती आपल्या एकूण संरचनेसंबंधी वापरतात व ही संरचना विशेषकरून जमिनीच्या रूक्षतेशी जमवून घेण्याकरिता असते परंतु खाऱ्यादलदळीत किंवा मूर प्रदेशांतील वनस्पतींची तशी संरचना तेथे भरपूर पाणी असतानाही आढळते [  ⟶ दलदल ]. शिंपर यांच्या मते त्या वनस्पती क्रियात्मक रूक्ष भूमीत असल्याने त्यांना मरूवनस्पतींप्रमाणे रूक्षतेशीच जमवून घ्यावे लागते, ही कल्पनासुद्धा चुकीची ठरली आहे. या वनस्पतींतील तर्षणदाब [  ⟶ तर्षण ] लवण – भूमीतील [  ⟶ लवण वनस्पति ] पाण्याच्या तर्षणदाबापेक्षा अधिक असल्यास नित्याच्या जमिनीतून ज्याप्रमाणे पाणी घेतात, त्याप्रमाणे त्यांचे सहजगत्या शोषण चालते. त्याचे रूक्षतानुकूल कधीकधी अशा जमिनीतील पाणी गोठून खरी ( प्रत्यक्ष ) रूक्षता आल्याने घडून येत असावे. रसाळपणा, दृढपर्णत्व ( पाने जाड असणे ), लघुपर्णत्व  ( फार लहान पाने असणे ) व पर्णहीनता यांचा अंतर्भाव रूक्षतानुकूलनात होतो. मरूवनस्पतींतील बाष्पोच्छ्‍वासाचा वेग मध्यवनस्पतींपेक्षा कमी असतो. याचे कारण त्यांच्याकडे असणाऱ्याकार्बोहायड्रेटांचा विशेष प्रकारचा ⇨चयापचय ( शरीरात सतत चालू असणाऱ्याभौतिक व रासायनिक घडामोडी ) हे असते. रात्री श्वसनामुळे त्यांच्यापासून कार्बनी अम्‍ले ( विशेषत :L – मॅलिक अम्‍ल ) बनतात. दुसऱ्यादिवशी प्रकाशसंश्लेषणात त्या अम्‍लांपासून पुनश्च कार्बोहायड्रेटे बनतात. कार्बोहायड्रेटांच्या चयापचयातील दैनिक बदल हे कार्बन डाय – ऑक्साइडच्या अंतर्ग्रहण व निर्गम यांच्या अधिक प्रमाणांशी संबंधित नसतात. रात्री आर्द्रता सापेक्षत: अधिक असून बाष्पोच्छ्‍वासामुळे होणारा जलव्यय कमीतकमी असतो. त्यामुळे कार्बन – डाय ऑक्साइडाचे मॅलिक अम्‍लात स्थिरीकरण रात्रीच होते. पाण्याच्या काटकसरीमुळे मरूवनस्पती जीवनस्पर्धेत यशस्वी होतात, हे शिंपर यांचे गृहीतक काहींच्या मते स्वीकारण्यायोग्य नसून मरूवनस्पतींच्या या यशाचे श्रेय संरचनेसंबंधीच्या पुढील दोन प्रमुख लक्षणांना आहे : ( १) खोडांची व पानांची शारीरिक मजबुती त्यांची स्फीतता ( पाण्यामुळे तट्ट फुगण्याची वृत्ती ) कमी झाली असताही चांगली टिकू शकते व ( २ ) बरेचसे पाणी कमी झाले असताही फारशी दुखापत न होता त्या जगू शकतात. भरपूर पाणी उपलब्ध झाले असताना मरूवनस्पती मध्यवनस्पतींपेक्षा अधिक जलद बाष्पोच्छ्‍वास करतात. यावरून असे दिसते की. मरुवनस्पतींतील त्वग्रंध्रांच्या मांडणीमुळे बाष्पोच्छ्‍वास कमी होत नाही. संरक्षित त्वग्रंध्रे व पृष्ठवर्ती त्वग्रंध्रे या दोन्हींची विसरणक्षमता ( रेणूंचा विनियम करण्याची क्षमता ) सारखीच असते, असा प्रायोगिक पुरावा मिळाला आहे. त्यामुळे रूक्षतानुकूलनातील वैशिष्ट्यपूर्ण अशा त्वग्रंध्रांच्या मांडणीतील महत्त्व समजून घेणे आवश्यक ठरले आहे. हेतुवाद्यांच्या ( एखाद्या आविष्काराचे स्पष्टीकरण, अंतिम कारणे, हेतू वा निर्सर्गातील योजना यांच्या रूपात शोधले पाहिजे हे तत्व मानणाऱ्याशास्त्रज्ञांच्या ) मते मरूवनस्पतींतील त्वग्रंध्रांच्या संरक्षित स्थानांना अतिजीविता- मूल्य असावे त्या स्थानांमुळे धुळीचे कण किंवा खाळ कण यांपासून किंवा आत्यांतिक निर्जलीकरणापासून ( शरीरातील पाणी प्रमाणाबाहेर निघून जाण्यापासून ) त्यांचे संरक्षण होते. खाऱ्याकिंवा अम्‍लीय जमिनीत वाढणाऱ्यावनस्पतींना जलशोषणाबाबत अडचण भासते त्यामुळे त्यांचा समावेशही मरूवनस्पतींत केला जातो आणि त्यांची अनेक लक्षणे वर दिल्याप्रमाणे असतात. खूप उंच डोंगरमाथ्यावर वेगाने वाहणाऱ्यावार्‍याच्या क्षेत्रांत वाढणाऱ्याव तेथील थंड जलवायुमानाशी ( दीर्घकालीन सरासरी हवामानाशी ) सतत समरस होणाऱ्यावनस्पतीही मरूवनस्पतींची लक्षणे दर्शवितात [  ⟶ लवण वनस्पति दलदल ].

आ. ३. माचूल : ( १ ) वनस्पतीच्या खोडाचा भाग, ( २ ) फुलांसह खोडाचा भाग.

पहा : जलवनस्पतिविज्ञान मध्यवनस्पति वनस्पति व पाणी.

संदर्भ : 1. Harder. R. Schumacher, W. and others : Trans. Bell, P. Coombe, D. Strasburger’s Text-Book of Botany , London, 1965.

            2. Mitra, G. N. Systematic Botnay and Ecology, Calcutta, 1964.

            3. Wilson, C. L. Loomis, W. E. Botany. New York, 1957.

परांडेकर, शं. आ.