सॅपिंडेसी : (अरिष्ट कुल). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] वनस्पतींचे हे एक कुल असून त्याचा ⇨ सॅपिंडेलीझ (अरिष्ट) गणात समावेश केलेला आहे. यात झुडपे [⟶ क्षुप], वृक्ष व काही प्रतानारोही (तणाव्यांच्या मदतीने वर चढणाऱ्या) वेली आहेत मुख्यत्वेकरून या वनस्पती उष्णकटिबंधात आढळतात. यांची पाने एकाआड एक, क्वचित समोरासमोर, साधी किंवा संयुक्त, क्वचित सोपपर्ण (तळाशी उपांगयुक्त) असतात. फुले एकलिंगी किंवा द्विलिंगी संदले ४- ५, सुटी व परिहित (परस्परांना अंशतः झाकणारी) प्रदले ३–५, सुटी, परिहित व त्यांवर खवले अथवा केसाळ उपांगे असतात केसरदले (पुं-केसर) सुटी व दोन मंडलांत आढळतात तीन किंजदले (स्त्री-केसर)जुळून त्यांचा तीन कप्प्यांचा ऊर्ध्वस्थ किंजपुट बनतो. प्रत्येक कप्प्यात बीजके (अपक्व बीजे) १-२ फळ विविध प्रकारचे बी अध्यावरणयुक्त (नित्याच्या बीजावरणावर वाढलेला विशेष प्रकार) व बहुधा पुष्कहीन (गर्भाबाहेरील अन्नांश नसलेले) असते. या कुलात सु. १२० प्रजाती व १,००० जाती असून पुढील उपयुक्त वनस्पती यात अंतर्भूत आहेत : उंब,कपाळफोडी, जखमी, मेंद्री, रिठा, लिची इत्यादी. यूफोर्बिएसी (एरंड) कुलाशी या कुलाचे जवळचे नाते आहे.

पहा : सॅपिंडेलीझ.

जमदाडे, ज. वि.