शिया : (हिं. शेवा इं. हनी सकल लॅ. लोनिसेरा ग्लॉका कुल – कॅप्रिफोलिएसी). फुलझाडांपैकी [→ वनस्पती, आवृतबीज उपविभाग] एक उपयुक्त व शोभिवंत झुडूप. ह्याला खूप फांद्या असून ते सरळ उंच वाढते किंवा ते जमिनीसरपट वाढते व त्याला वर चढणाऱ्या फांद्या असतात. ते प. हिमालयात, काश्मीर ते कुमाऊँ या प्रदेशात आढळते. याचा अंतर्भाव ज्या लोनिसेरा ह्या शास्त्रीय प्रजातीत केला जातो, त्यात सु. २०० जाती असून त्यांचा प्रसार उ. गोलार्धातील उपोष्ण व समशीतोष्ण कटिबंधांत आहे. सर्वच जाती हनी सकल ह्या इंग्रजी नावाने ओळखल्या जातात. शियाची पाने फार लहान देठांची किंवा बिनदेठांची, समोरासमोर येणारी, साधी, खालच्या बाजूस पांढुरकी, वरच्या बाजूस गुळगुळीत, बोथट टोकाची व फांद्यांच्या टोकांकडे तळाशी जुळलेली अशी असतात. पानांच्या बगलेत फुलोरा असून फुले लहान, द्विलिंगी, पंचभागी, खाली नळीसारखी व वर पसरट अशी असून त्यांच्या पाकळ्या पिवळसर व सुट्या असतात त्यांपैकी एक पाकळी मागे अधिक वळलेली असल्याने पुष्पमुकुट द्व्योष्ठी दिसतो. मृदुफळ दीर्घवृत्ताकृती, कधी अनेक स्वतंत्र फळे काहीशी जुळून वाढतात.

शिया : (१) पानाफुलांसह फांदी, (२) किंजमंडल, (३) पुष्पमुकुट व केसरदले, (४) मुदुफळे.

याच्या बिया घोड्यांना शूलावर (वेदनांवर) देतात. नवीन लागवड बिया पेरून किंवा कलमे लावून करतात. जमीन झाकण्यास व तिची धूप रोखण्यास बागेत शिया लावतात.

चीन व जपान येथील जपानी हनी सकल (लो. जॅपोनिका) ह्या जातीची सुगंधी फुले प्रथम पांढरी असून नंतर पिवळसर होतात. भारतातील बागांमध्ये ती विशेष लोकप्रिय आहेत. तांबड्या किंवा जांभळ्या फुलांच्या जातीही लावतात. फुलात परपरागण घडवून आणण्याची योजना असते. ट्रंपेट हनी सकल (लो. सेपरव्हिरेन्स) ह्या अमेरिकी जातीला बिनवासाच्या शेंदरी फुलांचे घोस येतात, तेव्हा ती फार सुंदर दिसते. प. चीनमधील लो. निटिडा (इं. श्रबी हनी सकल) कुंपणाकरिता वापरतात. लो. अंगुस्तिफोलिया ह्या हिमालयी जातीच्या फांद्यांतील पांढऱ्या, कठीण व मजबूत लाकडामुळे त्यांचा उपयोग हातातील काठ्यांकरिता करतात. लो. क्विंक्वेलॉक्युलॅरिस ह्या हिमालयी जातीचे लाकूड कठीण व जड असून त्याचा उपयोग कातीव व कोरीव काम, हातातील काठ्या, हत्यारांचे दांडे व नांगर इ. विविध वस्तू बनविण्यासाठी करतात. लो. हायपोल्यूका ह्या हिमालयी झुडपाचा पाला उंट, शेळ्या व बोकड यांना चारा म्हणून घालतात. ह्याचे लाकूड पांढरे व कठीण असते. काही जातींत सॅपोनीन हे ग्लायकोसाइड असते व काही जाती फक्त जळणाकरिता उपयुक्त आहेत.

परांडेकर. शं. आ.