टोरेनिया एशियाटिका : (कुल-स्क्रोफ्यूलॅरिएसी). ही लहान, वर्षायू (एक वर्ष जगणारी), सरळ किंवा पसरट वाढणारी, शाखायुक्त ⇨ ओषधीय वनस्पती मूळची द. भारतातील (निलगिरी) असून श्रीलंका, जावा, चीन इ. देशांतही आढळते. धर्मोपदेशक टोरेन यांनी चीनच्या प्रवासात पहिल्याने हिची माहिती नोंदविली म्हणून तिच्या वंशाला टोरेनिया नाव दिले गेले. खोड चौधारी पाने साधी, समोरसमोर, अंडाकृती-भाल्यासारखी, २·५–५ सेंमी. लांब, दातेरी व तळाशी थोडी हृदयाकृती असतात. पानांच्या बगलेत एकच फूल येते किंवा शेंड्याकडे आखूड मंजरीवर अनेक फुले येतात. छदे दोन, संवर्त नलिका द्वयोष्ठक, सपक्ष. पुष्पमुकुट मोठा, द्वयोष्ठक नलिका वाकडी आणि वर पसरट, निळसर जांभळट वरचा ओठ निळा किंवा पांढरा, खालचा ओठ मोठा, टोकास गर्द जांभळा खाली लालसर पांढरा, मधल्या भागावर मध्ये पिवळा ठिपका व तोंडाशीही पिवळा असतो. केसरदले चार, द्वयोन्नत किंजपुट दोन कप्प्यांचा [⟶ फूल] असून बोंड अनेकबीजी असते. नवीन लागवड कलमांनी करतात लोंबत्या कुंडीत लावतात पावसाळ्यात आणि हिवाळ्यात बागेत लावतात. परम्यावर पानांचा रस देतात. याचे तीन-चार प्रकार बागेत लोकप्रिय आहेत. टो. फौर्नीरी  (विश-बोन फ्लॉवर) ही वर्षायू जातीही बागेत सामान्यपणे आढळते. हिची फुले निळी असतात संवर्ताचे पंख रुंदट असतात.

पहा : स्क्रोफ्यूलॅरिएसी.

जमदाडे, ज. वि.

टोरेनिया फौर्नीरी