दौंडी : ( १) पान, ( २) फूल,( ३) फळ, ( ४) बी.

दौंडी: (क. अळंगी, अमिंगे लॅ. पॅजानिलिया लाँगिफोलिया, पॅमल्टिजुगा, पॅऱ्हीडी कुल–बिग्नोनिएसी). सु. ९–१८ मी. व अधिकात अधिक २७ मी. उंचीची व २·७ मी. घेराचा हा पानझडी वृक्ष आसामातील टेकड्या, पश्चिम घाट, उ. कारवार ते त्रावणकोर आणि अंदमान बेटे येथे आढळतो भारत ते मलेशिया या प्रदेशात त्याचा प्रसार आहे. साल खरबरीत, भेगाळ व तपकिरी पाने मोठी, विषमदली, पिच्छकल्प (पिसासारखी), संयुक्त, ०·४५–०·९ मी. लांब असतात. दले ९–१२ जोड्या शिवाय टोकास एक असते. ती तिरकस, अंडाकृती–भाल्यसारखी, तळाशी असमान व टोकदार असतात. फुले आकर्षक, साबणासारख्या वासाची, किरमिजी व पिवळ्या पाकळ्यांची आणि मोठी असून ती हिवाळ्यात मोठ्या परिमंजरीवर [⟶ पुष्पबंध] येतात. बोंड सपाट ( ३०–६० X ६–९ सेंमी.) सरळ, कडेने पंखयुक्त असते. बिया चपट्या असून त्यांच्या दोन्ही टोकांस एक किंवा दोन्ही बाजूंस पातळ पंख असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ बिग्नोनिएसी कुलात (टेटू कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.

ताजे कापलेले लाकूड भुरकट तपकिरी, चकचकीत व सागाप्रमाणे सुगंधी पण हलके व नरम आणि वाळवीपासून सुरक्षित असते. फळ्या,घरबांधणी, नावा, तराफे इत्यादीस ते चांगले असते. मिरीच्या वेली चढविण्यास या झाडांची लागवड करतात. मलेशियात ⇨ टेटूप्रमाणे औषधात वापरतात. मूळ व खोडांवरच्या सुक्या सालीत ५% पॅजानिलीन हे कटुद्रव्य व पॅरा हायड्रॉक्सिसिनॅमिक अम्ल असते. पॅजानिलिया ह्या वंशात एकच जाती आहे.

परांडेकर. शं. आ.