कॅरिकेसी : (पपई-पिपीतक कुल). आवृतबीज (बंदिस्त बीज असलेल्या) वनस्पतींपैकी (द्विदलिकित वर्गातील) परायटेलीझ गणात या वनस्पति-कुलाचा समावेश होतो हचिन्सन यांच्या मते या कुलाचा अंतर्भाव कुकर्विटेलीझ गणात व्हावा. ⇨पपईसारखी वनस्पती यात प्रमुख असल्याने पपई कुल म्हणतात. यात एकूण चार वंश व सु. पन्नास जाती आहेत.

त्या मुख्यतः अमेरिकेच्या उष्ण भागात व आफ्रिकेत आढळतात. भारतात पपईचा प्रसार खूपच झाला आहे. या कुलातील वनस्पती क्षुपे (झुडपे) व वृक्ष आहेत बहुधा शाखा फार थोड्या किंवा नसतात पांढरा चीक व लांब देठाची, मोठी, साधी, अखंड किंवा खंडित कडा असलेली, एकांतरित (एकाआड एक) पाने असतात खोड मऊ व नाजूक, सरळ, क्वचित वेढे देत चढणारे किंवा काटेरी फुले एकलिंगी, एकत्र किंवा विभक्त झाडांवर किंवा द्विलिंगी अरसमात्र, अवकिंज, बहुधा फुलोऱ्यावर येतात. संदले चार-पाच, सुटी किंवा बहुधा जुळलेली प्रदले तशीच एकाच जातीतील दोन भिन्नलिंगी फुलांत कधीकधी फरक असतात. केसरदलांची बहुधा पाचांची दोन मंडले, पण स्त्री-पुष्पात वंध्य केसर अथवा क्वचित त्यांचा पूर्ण अभाव. किंजदले पाच, जुळलेली किंजपुटात एक अथवा क्वचित पाच कप्पे पुं-पुष्पात वंध्य किंजदले किंवा त्यांचा पूर्ण अभाव [→ फूल] बीजके तटलग्‍न. मृदुफळ मोठे व अनेक बीजी बी बहुधा सपुष्क (विकासावस्थेतील बीजातील गर्भाच्या पोषणास मदत करणारा पेशीसमूह असलेले), गुळगुळीत किंवा खरबरीत व काटेरी. या कुलाचे पॅसिफ्लोरेसी, ⇨ कुकर्बिटेसी, बिग्नोनिएसी, ⇨मोरिंगेसी इ. कुलांशी काही लक्षणांत साम्य असल्याने जवळचे नाते आहे.

घवघवे, ब. ग.