डेस्मोडियम लॅटिफोलियम : (डेस्मोडियम लॅसिओकार्पम कुल-लेग्युमिनोजी, उपकुल-पॅपिलिऑनेटी). ⇨ सालवणच्या वंशातील या शिंबावंत (शेंगा येणाऱ्या) झुडपाची अनेक शारीरिक लक्षणे, प्रसार व आढळ त्यासारखीच आहेत पण थोडे फरकही आहेत. याचा प्रसार कोकण, दख्खन, कारवार इ. भागांत विशेष असून भारतात सर्वत्र तुरळकपणे शिवाय आफ्रिका, मलाया, श्रीलंका, इ. प्रदेशांतही आहे सिक्कीममध्ये १,२०० मी. उंचीपर्यंत हे सापडते. हे झुडूप सालवणपेक्षा अधिक उंच (एक ते दोन मी.), फांद्या केसाळ, गोलसर व एकच दलाची संयुक्त पाने असतात. लांबीपेक्षा ते अधिक रुंद असते. जुलै ते सप्टेंबरात त्याला मंजऱ्या (फुलोरे) येतात त्या पानांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या टोकांस असतात. फुले थोडी, पतंगरूप, लहान व जांभळी असून शिंबा (शेंग) सरळ व तिचे एकबीजी चार ते सहा भाग लांबी-रुंदीत सारखे आणि अधिक केसाळ असतात. जातिवाचक लॅटिन नावे पानांच्या व फळांच्या लक्षणांवरून दिलेली आहेत. इतर सामान्य लक्षणे शिंबावंत कुलात [⟶ लेग्युमिनोजी] वर्णिल्याप्रमाणे असतात. 

सालीपासून निघणारे धागे कागदनिर्मितीस उपयुक्त पाल्यापासून खत होते व गुरांना खाऊ घालतात. नायजेरियात पाला घोड्यांना चारतात. औषधी गुण साधारणपणे सालवणप्रमाणे आहेत. लघवीतून रक्त जात असल्यास गोल्ड कोस्ट येथे यांची मुळे व मिरची यांचा बस्ती देतात.

परांडेकर, शं. आ.