हरगोविंद खोराना

खोराना, हरगोविंद : (९ जानेवारी १९२२–     ). रेणवीय जीवविज्ञानातील संशोधन, विशेषतः डीएनए (डी-ऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्ल) आणि आरएनए (रिबोन्यूक्लिइक अम्ल) या) ⇨ न्यूक्लिइक अम्लांचे संश्लेषण (कृत्रिम रीत्या तयार करणे) व रासायनिक संश्लेषणाने जनुकांची (आनुवंशिक लक्षणे निर्देशित करणाऱ्या गुणसूत्रांवरील एककांची, जीन) निर्मिती यांबद्दल सुप्रसिद्ध असलेले, मूळचे भारतीय पण आता अमेरिकन नागरिकत्व स्वीकारलेले व १९६८ चे शरीरक्रियाविज्ञान व मानवी वैद्यक या विषयांचे नोबेल पारितोषिकविजेते जीवरसायनशास्त्रज्ञ.

त्यांचा जन्म रायपूर (पाकिस्तान) येथे झाला व बी. एस्‌सी. पर्यंत त्यांचे शिक्षण मुलतानातील डी. ए. व्ही. महाविद्यालयात झाले. त्यानंतर पंजाब विद्यापीठातून १९४५ साली रसायनशास्त्र हा विषय घेऊन ते एम. एस्‌सी. झाले १९४८ साली त्यांनी लिव्हरपूल (इंग्लंड) येथे ए. रॉबर्ट्‌सन यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून पीएच्. डी. पदवी संपादन केली. त्यानंतर भारत सरकारचे पदव्युत्तर फेलो म्हणून त्यांनी १९४८-४९ या वर्षात व्ही. प्रेलॉग यांच्याबरोबर झुरिक येथील स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये संशोधनकार्य केले. पुढे दोन वर्षे त्यांनी नफील्ड फेलो म्हणून केंब्रिज विद्यापीठात अलेक्झांडर टॉड (१९५७ चे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिकविजेते) यांच्याबरोबर संशोधनकार्य केले. १९५२ सालामध्ये त्यांनी ब्रिटिश कोलंबिया रिसर्च कौन्सिल येथील कार्बनी रसायनशास्त्र गटाच्या प्रमुखाची जागा स्वीकारली व तेथील विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ ग्रॅज्युएट स्टडीचे संशोधन प्राध्यापक म्हणूनही काम सुरू केले. १९६० मध्ये ते संशोधन गट प्रमुख व प्राध्यापक म्हणून मॅडिसन येथे विसकॉन्सिन विद्यापीठात इन्स्टिट्यूट ऑफ एंझाइम रिसर्चमध्ये दाखल झाले. १९६२ मध्ये विसकॉन्सिनमध्ये ते जीवरसायनशास्त्राचे प्राध्यापक होते व १९६४ साली त्यांना जीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक नेमण्यात आले. १९६८ पासून ते रॉकफेलर विद्यापीठाचे अभ्यागत अधिव्याख्यातेही आहेत.

१९६६ मध्ये त्यांनी अमेरिकन नागरिकत्व स्वीकारले असून सध्या ते विसकॉन्सिन विद्यापीठाच्या मॅडिसन येथील इन्स्टिट्यूट ऑफ एंझाइम रिसर्च या संस्थेचे सहसंचालक आहेत.

खोराना यांनी रेणवीय विज्ञानात केलेल्या संशोधनामुळे आनुवंशिकतेतील रहस्यावर खूपच प्रकाश पडला आहे. पेप्टाइडे, प्रथिने, जीवविज्ञानातील महत्त्वाची फॉस्फेट एस्टरे इत्यादींच्या रासायनिक संशोधनाबद्दल ते प्रसिद्धी पावले आहेतच, तथापि त्यांचे विशेष संशोधनकार्य को-एंझाइम ए [→ एंझाइमे], न्यूक्लिओटाइडे व पॉलिन्यूक्लिओटाइडे, आरएनए व डीएनए यांसारखी न्यूक्लिइक अम्ले यांचे रासायनिक संश्लेषण व संरचना यांसंबंधी आहे. कोशिकांच्या (पेशींच्या) कार्याचे संचलन करणारी (गुणसूत्रांवरील म्हणजे आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांवरील) जनुके भिन्न जीवरासायनिक विक्रियांद्वारे, कोशिकांतील व जनुकांवर साठविलेली माहिती कोशिकांच्या क्रियांपर्यंत कशी पोहोचवितात याचे स्पष्टीकरण देण्यात ते यशस्वी झाले आहेत. या स्पष्टीकरणाचा उपयोग आनुवंशिकतेची यंत्रणा समजण्यास होत आहे. १९६८ चे नोबेल पारितोषिक या क्षेत्रात बहुमोल कामगिरी केलेल्या एम्. डब्ल्यू. निरेनबर्ग, रॉबर्ट हॉली व खोराना या तिघांत विभागून देण्यात आले.

 खोराना यांना १९६९ च्या जून महिन्यात निर्जीव रसायनापासून प्रयोगशाळेत जनुक बनविण्यात यश मिळाले जनुकातील महत्त्वाचा घटक म्हणजे डीएनए होय. याच्या रेणूंचे संदेश कोशिकांपर्यंत नेण्याचे काम आरएनए रेणू करतात हे रेणू तयार करण्यात महत्त्वाची पायरी म्हणजे त्या रेणूतील न्यूक्लिओटाइड घटक जोडण्याची पद्धत ती त्यांनी प्रथम शोधून काढली. संश्लेषणाने जनुक तयार करण्यासाठी त्यांनी प्रथम चार मूलभूत न्यूक्लिओटाइडे साध्या पद्धतीने तयार केली व नंतर ७७ न्यूक्लिओटाइडे एकत्र गुंफून पहिले मानवनिर्मित जनुक बनविले. हे जनुक म्हणजे यीस्टच्या कोशिकेत आढळणारा अलॅनीन ट्रॅन्स्फर आरएनए जनुक होय. एश्चेरिकिया कोलाय  या सूक्ष्मजंतूत आढळणाऱ्या टायरोसीन सप्रेस ट्रॅन्स्फर आरएनए रेणूंच्या संश्लेषणाचे कार्य खोराना यांनी हाती घेतले आहे. त्यांच्या या संशोधनकार्याचा उपयोग शरीरातून आनुवंशिक रोगांचे उच्चाटन करण्यासाठी होऊ शकेल असा भरवसा दिला जात आहे.

खोराना यांना नोबेल पारितोषिकाखेरीज केमिकल इन्स्टिट्यूट ऑफ कॅनडाचे मर्क पारितोषिक (१९५८), प्रोफेशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅनेडियन पब्लिक सर्व्हिसेसचे सुवर्णपदक (१९६०), गॉटिंगेन अकॅडेमी ऑफ सायन्सेसचे हाइनमान पारितोषिक (१९६७) हे सन्मान मिळालेले आहेत. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण (१९६३) हा किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे. जगातील निरनिराळ्या मान्यवर शास्त्रीय संस्थांचे ते सन्माननीय सदस्य आहेत.

पहा : आनुवंशिकी.

देशपांडे, ज. र.