कवठ: (हिं. कविठ, कैठ, बिलिन गु. कवीट, कोठु क. बळुवल, मालुरा सं. कपित्थ, दधिफल, कपिप्रिय इं. एलेफंट ऑर वुड ऍपल, मंकी फ्रूट लॅ. फेरोनिया एलेफंटम, फे. लिमोनम कुल-रूटेसी). ह्या काटेरी व पानझडी वृक्षाचे मूलस्थान दक्षिण भारत असून त्याचा प्रसार भारतात सर्वत्र, तसाच पाकिस्तान, श्रीलंका, जावा, ब्रह्मदेश, बांगला देश इ. प्रदेशांतही आहे याची फळांकरिता लागवड करतात. उंची ६-९ मी. साल काळी खरबरीत, जाड व भेगाळलेली, पाने संयुक्त, विषमदली पिच्छाकृती (पिसासारखी), एकाआड एक, गुळगुळीत व चकचकीत दले ३-९, बिनदेठांची, समोरासमोर, अखंड व गोल टोकांची उन्हाळ्यात पाने गळतात. फुले पंचभागी, बहुयुतिक, फिकट लाल, आखूड देठांची असून फांद्यांच्या टोकास किंवा पानांच्या बगलेत, विरळ परिमंजरीवर फेब्रुवारी-एप्रिलमध्ये येतात. पुं-पुष्पात व स्त्री-पुष्पांत काही फरक असतात [→ फल]. घनकवची मृदुफळ मोठे, ५-७.५ सेंमी. व्यासाचे, गोलसर, कठीण व करडे असून मगजात (गरात) अनेक बिया असतात.

कवठ : (१)पानेव फुलोऱ्यासह फांदी, (२) फूल, (३) फळ, (४) बी

फळातील मगज आंबटगोड व खाद्य असून त्याची चटणी, बर्फी, मुरंबा व सरबते करतात. तो स्तंभक (आकुंचन करणारा), उत्तेजक, दीपक (भूक वाढविणारा) असून अतिसार, आमांश इ. पोटाच्या तक्रारींवर चांगला विषारी कीटकदंशावर बाहेरून लावतात. बियांतील तेल खाजेवर लावतात. साल पित्तावर उपयुक्त पाने सुवासिक, वायुनाशी व अंगावर पित्त उठल्यास त्यांचा रस लावतात. वाळलेली फुले उकळून त्यांपासून रंग मिळतो. साल कातडी कमाविण्यास व रंगविण्यास वापरतात. ह्या झाडापासून पाझरणारा डिंक अर्धपारदर्शक, तांबूस भुरा असून चित्रकाराचे जलरंग व इतर रंग-रोगणे यांकरिता उपयुक्त तो बाभळीच्या डिंकाऐवजी वापरतात. शेळ्या व मेंढ्या पाला खातात. फळाच्या कठीण कवचापासून काही शोभिवंत वस्तू (उदा., तपकिरीची डबी) बनवितात. लाकूड पिवळसर किंवा करडे पांढरे, कठीण, मजबूत व टिकाऊ असल्याने त्याचा उपयोग घरबांधणी, तेलाचे घाणे, चाकाचे आरे, शेतीची अवजारे इत्यादींसाठी होतो. नवीन लागवड बियांपासून करतात. 

पहा : रूटेसी.                                                        

जमदाडे, ज.वि.