टाकळा : (तरोटा हिं. चाकुंदा क. तरगोसी, तगचे सं. चक्रमर्द, दद्रुघ्न इं. फेटिड कॅसिया, सिकल सेन्ना लॅ. कॅसिया तोरा कुल-लेग्युमिनोजी). हे लहान शिंबावंत (शेंगा येणारे) आणि वर्षायू (वर्षभर जगणारे) क्षुप (झुडूप) रस्ताच्या कडेने, शेताच्या कडेने, व इतर पडीक जागी तणासारखे उगवलेले आढळते. याचा प्रसार फक्त आशिया खंडात रानटी अवस्थेत असावा उष्ण कटिबंधांतील भारत, पाकिस्तान, श्रीलंका इ. देशांत ते सामान्यापणे आढळते. त्याची उंची एक मी. पर्यत असते. पाने संयुक्त, एकाआड एक, उपपर्णयुक्त, पिसासारखी व दलांच्या तीन जोड्या असतात. फुले लहान, पिवळी, जोडीने किंवा अधिक व पानांच्या बगलेत सप्टेंबर ते डिसेंबरात येतात. शिंबा (शेंग) बारीक, लहान (१२–२० सेंमी.), प्रथम वाकडी (त्यावरून इंग्रजी नाव सिकल सेन्ना पडले) पण पुढे सरळ आणि किंचित चौकोनी बिया २५–३०, लांबट असून आडव्या पडद्यांनी परस्परांपासून अलग असतात. ‘फेटिड’ हे इंग्रजी विशेषण वनस्पतीच्या नावात दुर्गंधाला उद्देशून वापरले आहे. याच्या कोवळ्या पाल्याची भाजी करतात व भाजलेल्या बियांची पूड करून कोणी कॉफी बनवितात निळीबरोबर मिश्रण करून ती पूड रंगविण्यास वापरतात. चीनमध्ये नेत्ररोगांवर बियांचा उपयोग करतात. भारतात लिंबू-रसात बी उगाळून नायट्यावर लावतात. पाने रेचक, कृमिनाशक असून कातडीच्या रोगावर व पाळीच्या तापावर देतात. पाल्याची भाजी अंगदुखीवर व सांधेदुखीवर गुणकारी असून वनस्पतीचा रस बिब्बा अंगावर उतल्यास वरून लावतात.

टाकळा : (१) फुलाफळांसह फांदी, (२) फुलाचा उभा छेद, (३) फळाचा उभा छेद.

रान टाकळा : (जंगली टाकळा हिं. कासोंदी गु. कासुंद्री क. व सं. कासमर्दा इं. सेन्ना सोफेरा लॅ. कॅसिया सोफेरा). सु. २·५–३ मी. उंचीचे हे शिंबावंत क्षुप उष्ण कटिबंधात सर्वत्र व भारतात सामान्यतः पडीक व नापीक जागी पावसाळ्यात आढळते. हे वर्षायू अथवा बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) असून याची सामान्य शारीरिक लक्षणे शिंबावंत कुलात [⟶ लेग्युमिनोजी] वर्णिल्याप्रमाणे असतात [⟶ तरवड बाहवा]. पाने संयुक्त व पिसासारखी १८–२५ सेंमी. लांब) व दले सहा ते दहा जोड्या फुलोरा तरवडीप्रमाणे फुले पिवळी व साधारणतः ⇨कासोद्याप्रमाणे असतात पण पाकळ्यांवर नारिंगी रेषा नसतात ती नोव्हेंबर जानेवारीत येतात. शिंबा ८–१० सेंमी. लांब, बारीक, थोडी वाकडी व टाकळ्याप्रमाणे पण गोलसर व भरीव बिया तीस–चाळीस, लांबट, पिंगट व चपट्या असतात. औषधी गुणधर्म कासोद्याप्रमाणे मुळे व पानांचा रस चंदनाच्या गंधाबरोबर नायट्यावर लावतात साल, पाने, बिया विरेचक काढा कफोत्सारक (कफ काढून टाकणारा) व मूत्र कमी करण्यास उपयुक्त साल व बियांच्या चूर्णाचा फांट (थंड पाण्यात भिजवून काढलेला अर्क) मधाबरोबर मधुमेहावर व पानांचा काढा दमा व उचकी यांवर गुणकारी असतो.

पहा : लेग्युमिनोजी.

परांडेकर, शं. आ.