सूत्रकृमिजन्य वनस्पति रोग : निसर्गत: दोन प्रकारचे सूत्रकृमी असतात [ → नेमॅटोडा]. मुक्तजीवी (स्वतंत्र रीत्या जगणारे) आणि परजीवी (दुसऱ्यांच्या जीवावर जगणारे) परजीवी सूत्रकृमी (गोलकृमी) प्राण्यांचा किंवा वनस्पतींचा आश्रय घेतात. जरी त्यांची निवासस्थाने भिन्न असली, तरी त्याचा त्यांच्या शरीररचेनवर फारसा परिणाम झालेला आढळून येत नाही. या कृमींचा आकार लांबट नळीप्रमाणे असतो व दोन्ही टोके निमुळती असतात. त्यामुळे त्यांना शरीराची लवचिकपणे हालचाल करता येते. त्यांच्या तोंडात आकड्यासारखे दात असतात त्यायोगे त्यांना वनस्पतीच्या मुळ्या पोखरुन आत शिरकाव करणे सुलभ जाते. नर व मादी यांचा आकार भिन्न असतो. नर आकाराने लहान असतो. साधारणतः प्रजोत्पादन अंड्यांपासून होते, परंतु काही जाती पिलांना जन्म देतात. सूत्रकृमींच्या वेगवेगळ्या ५,००,००० जाती आहेत. त्यांपैकी सु. १२,००० जाती वनस्पतींमध्ये रोग निर्माण करतात.

वनस्पतिरोगकारक सूत्रकृमी सूक्ष्म (सु. १ मिमी. वा त्याहून लहान) असतात. त्यांच्या बहुसंख्य जाती जमिनीत वास्तव्य करुन वनस्पतींच्या मुळात शिरुन तेथे वाढतात, त्यामुळे मुळांवर गाठी उत्पन्न होतात. मुळांवरील सूत्रकृमींमुळे पिकांची वाढ खुंटते व उत्पन्नात घट येते. त्यांच्या काही प्रजाती वनस्पतींच्या कंद, कळ्या, खोड, पाने किंवा फुलांमध्ये राहतात. वांगी, टोमॅटो, कापूस वगैरे वनस्पतींमध्ये मुळांवरील सूत्र कृमिजन्य रोग दिसून येतात.

टी. निडम या शास्त्रज्ञाने १७४३ मध्ये सूत्रकृमींमुळे वनस्पती रोग होतात, हे सर्वप्रथम दाखवून दिले. १८५७ मध्ये कून व १८८५ मध्ये बर्कली यांनी सूत्रकृमींमुळे होणाऱ्या इतर पिकांच्या रोगाची माहिती दिली.

सूत्रकृमींचा वनस्पतीत प्रवेश : सूत्रकृमींची संख्या पुरेशी वाढण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागतो. त्यानंतर त्यांचे परिणाम दिसू लागतात. त्यांची हालचाल अतिशय मंद असते. एका वर्षात ते सु. ७५ सेंमी. इतकीच हालचाल करतात. तरीही त्यांचा प्रसार सहजपणे होतो. सुरुवातीस ते मातीत राहतात, नंतर अंड्यांतून बाहेर पडलेले लहान सूत्रकृमी वनस्पतींमध्ये प्रवेश करतात. ते अवजारे, यंत्रसामग्री, वाहते पाणी, वारा, कपडे, बूट, प्राणी, पक्षी व रोगट रोपे यांमध्ये राहू शकतात.

शेतातील किंवा बागेतील वनस्पतींच्या मुळांभोवती सूत्रकृमी राहतात. ते वनस्पतींच्या कोशिकांत बोगद्यासारखा मार्ग तयार करतात त्यांना (अंतःपरजीवी सूत्रकृमी म्हणतात). काही वेळा वनस्पतीवरील जखमा वा नैसर्गिक छिद्रांद्वारे (रंध्राद्वारे) किंवा मुळांद्वारे ते वनस्पतीत प्रवेश करतात. काही सूत्रकृमी वनस्पतीच्या बाह्य भागावर राहून अन्न ग्रहण करतात, त्यांना बाह्य परजीवी सूत्रकृमी म्हणतात. वनस्पतीच्या मुळाद्वारे बाहेर पडणारी उष्णता व रसायने यांमुळे सूत्रकृमींना मुळाची जागा कळते.

बहुतेक सूत्रकृमींच्या प्रजातीत २०– ६० दिवसांत जीवनचक्र पूर्ण होते. काही सूत्रकृमींमध्ये वर्षातून एकच पिढी तयार होते व ते काही शेकडो जीव जन्माला घालतात. मातीतील त्यांची संख्या व वाढीचा वेग हा पिकाच्या वाढीचा कालावधी, तापमान, पाणी व पोषकद्रव्ये यांची उपलब्धता, दमटपणा, मृदेचा प्रकार, तिचा पोत व रचना यांवर अवलंबून असतो. सूत्रकृमींची संख्या परजीवी सूक्ष्मजंतू व विषाणू यांच्या संख्येवरही अवलंबून असते. सूत्रकृमींच्या काही प्रजाती हलक्या व वालुकामय जमिनीत, काही खत असलेल्या मातीत मोठ्या प्रमाणावर तर काही प्रजाती भारी जमिनीत आढळतात. सूत्रकृमींची मोठी संख्या व पिकांचे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान हे भारी जमिनीपेक्षा, हलक्या वालुकामय जमिनीमध्ये जास्त प्रमाणात होते.

वनस्पतींमध्ये राहणारे बहुतेक सूत्रकृमी हे ५–१५ से. व ३०–४०से. तापमानास अकार्यक्षम होतात, तर २०–३० से. तापमानास जास्त कार्यक्षम असतात. हे तापमान सूत्रकृमीची प्रजाती, त्यांची वाढीची अवस्था व पोषकाची वाढ अशा इतर अनेक घटकांवर अवलंबून असते. सूत्रकृमी वनस्पतीच्या ऊतकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. ते वनस्पतीच्या मुळात व कंदात हजारोंच्या संख्येत आढळतात. बहुतेक सूत्रकृमी स्थानिक असतात. काही सूत्रकृमी वनस्पतीच्या बियांतून व कंदातून तर काही वेळा रोपवाटीकेतील मातीद्वारे पसरतात.

सूत्रकृमींचा वनस्पतींवर होणारा परिणाम : सूत्रकृमी त्यांच्या मुखांगांद्वारे (स्पिअर वा स्टायलेट) वनस्पतीच्या कोशिकेत एंझाइम (वितंचक) सोडून त्यातील रस शोषून घेतात. सूत्रकृमींच्या या हल्ल्यामुळे वनस्पतीची वाढ खुंटते (मंदावते) व उत्पन्नात घट होते. सूत्रकृमींनी वनस्पतीमध्ये प्रवेश केल्यानंतर, त्या वनस्पतीत कवक व सूक्ष्मजंतूसहज प्रवेश करु शकतात. रोगग्रस्त वनस्पती अशक्त व निस्तेज दिसतात. त्या दुष्काळातील, दमट मृदेतील, अर्धवट जळालेल्या वा बर्फवृष्टीचा परिणाम झाला असल्यासारख्या दिसतात. त्यांच्यात मूलद्रव्यांची कमतरता वा असंतुलन आढळते. मूळ तसेच खोडावर कीटकांनी जखमा केल्यासारख्या दिसतात.

सूत्रकृमींची लागण झाल्यावर वनस्पतींची वाढ खुंटते. वनस्पतींचा हिरवा रंग कमी होऊन त्या पिवळसर दिसतात. फांद्या व खोड वाळते. त्या पाणी व खते यांना प्रतिसाद देत नाहीत. वनस्पतीस अन्न पुरविणाऱ्या मुळांची संख्या कमी होते. वनस्पतीच्या मुळातील रस सूत्रकृमी शोषतात तेव्हा त्यांच्या लाळेतून काही विषारी पदार्थ कोशिकांवर सोडले जातात, यांमुळेही वनस्पतीच्या मुळांना इजा होते. त्यास प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या कोशिका स्वतःचा आकार वाढवितात किंवा कमी करतात.

सूत्रकृमिजन्य वनस्पतिरोगांचे प्रकार : (१) मुळांवरील गाठी : सूत्रकृमीच्या मेलायडोगाइन  या प्रजातीमुळे हा रोग होतो. यामध्ये वनस्पतींच्या मुळांवर गाठी तयार होतात. दोनशेपेक्षा जास्त वनस्पतींच्या जातींमध्ये या रोगामुळे नुकसान होते असे आढळले आहे. उष्ण प्रदेशात पिकांच्या वाढीचा कालावधी दीर्घ असतो. त्यामुळे तेथे या सूत्रकृमींमुळे जास्त नुकसान होते. नॉर्दन रुटनॉट  हा सूत्रकृमी मातीत सु. १ मी. खोलीपर्यंत सर्वत्र आढळतो. भाजीपाला पिके, कापूस व स्ट्रॉबेरी यांवर हा रोग आढळतो. महाराष्ट्रात नागवेलीवर या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होऊन संपूर्ण पीक नष्ट होते. तसेच बागेतील झाडे व शोभेच्या वनस्पतींचे या रोगामुळे फार नुकसान होते. बऱ्याच वेळा या रोगाचा प्रसार रोपवाटीकेतून होतो.


 उपाय : या सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी रासायनिक धुरीचा वापर करतात. यासाठी डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरो एथेन (डीडीटी), नेमॅगॉन, नेमॅटॉक्स, वापम व नेमॅफॉज ही रसायने वापरतात.

(२) मुळांवरील चट्टे (रुट लेसिन) : प्रॅटीलेन्चस   या प्रजातीमुळे हा रोग होतो. याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर असून या अंत:परजीवीमुळे पिके व शोभेच्या वनस्पतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. कवक व सूक्ष्मजंतू तसेच सूत्रकृमींच्या हल्ल्यामुळे मुळांमध्ये चट्टे तयार होतात, तसेच कोशिका खराब होणे व मुळे कुजणे ही लक्षणे दिसतात. वर्षायूपिकांतील कोशिका सुकतात परंतु बहुवर्षायू वनस्पती व ऑर्किड यांवर अनेक वर्षे परिणाम होत नाही.

उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी पिकाची फेरपालट तसेच सूत्रकृमिजन्य रोगास बळी न पडणाऱ्या जातींची लागवड करतात. डायक्लोरो डायफिनिल मिश्रण (डीडी) या रसायनाची फवारणी करतात.

(३) बटाट्यावरील सोनेरी पुटी : हेड्रोडेरा रोस्टोविनेसिस  या सूत्रकृमीमुळे होणाऱ्या रोगामुळे यूरोपियन देशांत बटाटा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. या रोगात ठिपक्यासारख्या दिसणाऱ्या सोनेरी पुटी (सिस्ट) वनस्पतींच्या मुळांत आढळतात. प्रत्येक पुटीत सु. ५०० अंडी असतात. या अंड्यांतून तयार झालेले सूत्रकृमी मातीत सोडले जातात. या प्रकारची पुटी तयार करणारी जाती (हेड्रोडेरा सॅचेटी ) बीट पिकामध्ये देखील आढळते. हा रोग यूरोप, आशिया व अमेरिकेत आढळतो.

उपाय : डीडी एथिलीन डायब्रोइड (एडीबी) अथवा १, २-डायब्रोमो-३-क्लोरोप्रोपेन (डीबीसीपी ) या द्रव्यांची धुरी देऊन सूत्रकृमींचा नाश करतात.

(४) लिंबूवर्गीय वनस्पतींवरील रोग : लिंबूवर्गीय वनस्पतींवर टायलेचस सेमिपेनेट्रन्स  या सूत्रकृमीमुळे हा रोग होतो. त्याचा परिणाम फळाची गुणवत्ता व उत्पादनावर होतो. यात झाडाची पाने पिवळसर होऊन गळून पडतात. पंधरा वर्षांपेक्षा मोठ्या झाडाच्या फांद्या वाळतात. दूषित रोपवाटीकेतून या सूत्रकृमीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होतो.

उपाय : लागवडीपूर्वी डीडी मिश्रण किंवा एडीबीचा वापर करतात. डीबीसीपीची फवारणी करतात.

(५) इतर रोग : रॅडोफोलस सिमिलीस  या अंतःपरजीवीमुळे होणारा रोग प्रामुख्याने लिंबूवर्गीय झाडे, केळी, काळी मिरी, ॲव्हकॅडो व शोभेच्या वनस्पती यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतो. तो प्रामुख्याने उष्ण व समशीतोष्ण प्रदेशांत आढळतो.

उपाय : फळझाडाची रोपे लावताना मुळे गरम पाण्यात बुडवितात. सूत्रकृमींचा प्रादुर्भाव झाल्यास रोपांमधील जमीन पालापाचोळ्याने झाकतात.शेतात पाणी सोडतात. शेंग पेंड व हिरवळी खते वापरतात.

पहा : वनस्पतिरोगविज्ञान बटाटा.

संदर्भ : 1. Pelczar, Reid and Chan, Microbiology, New Delhi, 1982.

    2. Sharma, P. D. Microbiology and Plant Pathology, Meerut, 2000.

पाटील, चंद्रकांत प.