गव्हला : ( गहुला हिं. सं. प्रियंगू क. तोट्टिला लॅ. ॲग्‍लेया राक्सबर्घियाना कुल-मेलिएसी). हा साधारण मोठा वृक्ष (१२ मी. उंच) सह्याद्रीच्या दाट जंगलात आढळतो व श्रीलंकेमध्ये १,८६० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात सापडतो शिवाय अबूचा पहाड (राजस्थान) त्रावणकोर, तिनेवेल्ली इत्यादी द. भारतातील प्रदेशांत व मलेशियातही  तो पसरला आहे. कोवळ्या भागांवर लालसर लव असते. पाने संयुक्त, विषमदली, एकाआड एक, पिसासारखी दले बहुधा सात, क्वचित तीन किंवा पाच फुले एकलिंगी किंवा द्विलिंगी व गोलसर, सुगंधी, लहान, असंख्य, पिवळी, परिमंजरीय व काहीशा त्रिकोणी  फुलोऱ्यावर पानांच्या बगलेत किंवा बगलेवरच्या भागावर नोव्हेंबर ते डिसेंबरात येतात. मृदुफळे सुकी, फिकट पिवळट, एकबीजी  व बोराएवढी असतात [→ मेलिएसी]. ह्या वृक्षाची साल फिकट तपकिरी व लाकूड गर्द लाल, फार कठीण व चिवट असते. फळ खाद्य, थंडावा देणारे, दाहात व कुष्ठात स्तंभक (आकुंचन करणारे) असते. ह्याचा एक सुगंधी प्रकार असून सुवासिक तेले, उदबत्त्या वगैरे करण्याकडे उपयोगात असल्याचा उल्लेख आढळतो. तसेच गव्हला तुरट, शीतल व केसांना हितकारक असून वांती, दाह, पित्त, ज्वर, तृषा (तहानेमुळे होणारा शोष) वगैरे व्याधी  दूर करणारा असल्याचे वर्णन आढळते. गव्हल्याचे (फळाचे) चूर्ण अम्‍लपित्तावर साखरेबरोबर देतात. गव्हल्याची सुगंधी फुले अत्तरे, तेले वगैरेंत वापरतात. प्रियंगू (गव्हला) याच नावाने ॲग्‍लेया वंशातील आणखी एक जाती (ॲ. ओडोरॅटिसिमा ) ओळखली जाते. ही मूळची मलायी जाती असून ती भारतात बागेत लावलेली आढळते.

परांडेकर, शं. आ.