धामणी : (१) फुलोऱ्यासह फांदी, (२) फुलोरा.

धामणी: (धामण हिं. धामिन, फार्सा सं. गु. धनुर्वृक्ष क. बुटले लॅ. ग्रेविया टिलीफोलिया कुल-टिलिएसी). सु. ९–१२ मी. उंची व २ मी. घेर असलेल्या या मध्यम आकारमानाच्या वृक्षाचा प्रसार उपहिमालयी प्रदेशात यमुना ते नेपाळमध्ये १,२४० मी. उंचीपर्यंत, मध्य प्रदेश, बिहार, ओरिसा, तमिळनाडू, महाराष्ट्र आणि ब्रह्मदेश व श्रीलंका येथे आहे. याचे खोड उंच व सरळ साल कोवळेपणी करडी व जून झाल्यावर गर्द भुरी याचे कोवळे भाग लवदार पाने साधी, गोलसर, एकाआड एका व अंडाकृती, दातेरी, चिवट, तिरपी व हृदयाकृती उपपर्णे रुंद व लवकर गळून पडणारी मार्चमध्ये आरंभी पाने गळतात व एप्रिलमध्ये नवीन पालवी येते. फुले लहान, पिवळी, झुबक्यांनी पानांच्या बगलेत चवरीसारख्या फुलोऱ्यात मार्च–मेमध्ये येतात फळ अश्मगर्मी (आठळीयुक्त) वाटाण्याएवढे असून पिकल्यावर निळसर काळे दिसते. पुष्पस्थली लांबट व तीवर अनेक केसरदले असतात इतर सामान्य लक्षणे ⇨ टिलिएसी कुलात (पुरुषक कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. याची साल आमांशावर उपयुक्त व खाजऱ्या वनस्पतीपासून होणाऱ्या आगीवर बाहेरून लावण्यास चांगली लाकडाचे चूर्ण वांतिकारक व अफूमुळे झालेल्या विषबाधेवर उतारा रसकाष्ठ पांढरे मध्यकाष्ट लालसर, हलके, कठीण, लवचिक व टिकाऊ असून कापण्यास व रंधण्यास चांगले त्यापासून नावा, डोलकाठ्या, वल्ही, धनुष्ये, तेलाची आणि दारूची पिपे, सजावटी वस्तू, शेतीची अवजारे, घराचेखांब, दारे आणि खिडक्यांच्या चौकटी, क्रिकेटच्या दांड्या (स्टंप्स), गोल्फच्या काठ्या इ. विविध वस्तू बनवितात. सालीपासून धागा काढून त्याचे दोर बनवितात. कोवळ्या फांद्या व पाने जनावरांना चारा म्हणून घालतात. आंबट फळे खाद्य असतात.

जमदाडे, ज. वि.